Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Bhanudas Kotkar get bail

केडगाव हत्याकांड : अखेर भानुदास कोतकरला जामीन; जिल्हाबंदी कायम

प्रतिनिधी | Update - Aug 15, 2018, 11:43 AM IST

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी मंगळवारी मंजूर क

  • Bhanudas Kotkar get bail

    नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी मंगळवारी मंजूर केला. कोतकरची प्रकृती ठीक नसून तो दुर्धर आजाराने त्रस्त आहे. जिल्हाबंदीची अट कायम ठेवत एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.


    अशोक लांडे खूनप्रकरणात वैद्यकीय जामिनावर सुटलेल्या कोतकरला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. मागील काही दिवसांपासून तो न्यायालयीन कोठडीत होता. मात्र, त्याने प्रकृतीचे कारण पुढे करत जामीन अर्ज केला होता. या अर्जाबाबत तपासी अधिकारी व सरकारी वकिलांनी म्हणणे सादर केले. त्यानंतर वेळोवेळी सुनावणी झाली. केडगाव हत्याकांडानंतर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर व सुवर्णा कोतकर हे तिघे एक तास संपर्कात होते.


    भानुदास कोतकर याची प्रकृती ठणठणीत अाहे, तसा जबाब स्वत: त्याने सीअायडी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे कोतकरचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील केदार केसकर यांनी न्यायालयासमोर केला होता. आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. नितीन गवारे यांनी युक्तिवाद केला. भानुदास कोतकर याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्याला राजकीय षडयंत्रातून या गुन्ह्यात गोवले आहे. त्याची प्रकृतीदेखील ठीक नाही, दुर्धर आजाराने तो ग्रासला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी हत्याकांड घडले, तेव्हा कोतकर बाहेरगावी होता. त्यांचे मोबाइलवरून संभाषण झाले आहे. मात्र, त्यांच्या या संभाषणावरून खुनाचा कट रचल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अॅड. गवारे यांनी केला होता. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश माने यांनी कोतकरचा जामीन अर्ज मंगळवारी सशर्त मंजूर केला.

Trending