आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा देश तुझ्या घृणेची प्रयोगशाळा नाहीये...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरत यादव
देशात कट्टरतावादाची भीतिदायक सावली वरचेवर विस्तारत चाललेली असताना आम जनतेच्या हिताची पाठराखण करत सत्ताधाऱ्यांना खणखणीतपणे सवाल करण्याचेच नव्हे तर प्रसंगी खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य दिनकर कुमार यांची कविता दाखवते.


दिनकर कुमार यांच्या कविता देशातील सद्य:स्थितीवर जळजळीत भाष्य करतात. नुकतेच सामाजिक आणि राजकीय अस्वस्थतेच्या आगीत होरपळून निघालेल्या आसाम राज्यातील दिनकर कुमार मागील अठ्ठावीस वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, कवी, अनुवादक या भूमिका चोखपणे पार पाडत आहेत.  नऊ कवितासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन चरित्रं आणि आसामीतून अनुवादित केलेली ५५ पुस्तकं अशी त्यांची विपुल साहित्यनिर्मिती आहे. पुढील कवितांमधून कवीची सामाजिक-राजकीय प्रश्नांविषयीची सखोल समज तीव्रपणे लक्षात येते. विषयाच्या मुळाशी जात सत्याची परखड व निर्भीड मांडणी करणारी त्यांंची कविता खोटारडेपणाची चिरफाड करायला कचरत नाही. देशात कट्टरतावादाची भीतिदायक सावली वरचेवर विस्तारत चाललेली असताना आम जनतेच्या हिताची पाठराखण करत सत्ताधाऱ्यांना खणखणीतपणे सवाल करण्याचेच नव्हे तर प्रसंगी खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य ही कविता दाखवते.भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकाराच्या कक्षेत राहूनच दिनकर कुमार यांची लेखणी वंचितांची जीवघेणी तसेच प्राणांतिक कैफियत  मांडताना दिसते. भाटशाही आणि सत्ताभक्तीच्या सध्याच्या किडक्या वातावरणात लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना थेटपणे भिडण्याचे हे लेखनधैर्य दुर्मीळच होय. सामान्यांच्या मना-मेंदूला रात्रंदिवस छळणाऱ्या प्रश्नांना कवितेतून व्यक्त करणाऱ्या या कवीला लोकधर्मी कवी म्हटल्यास वावगे ठरु नये. आसामी मातीचा सुगंध त्यांच्या लेखनात पदोपदी जाणवतो. 

माझा देश तुझ्या घृणेची प्रयोगशाळा नाहीये
तुला या गोष्टीची परवानगी 
मिळू शकणार नाही की,
तु लोकशाहीच्या उद्यानाला
यातनागृहात बदलावेस
तुला या बाबीची अनुमती 
मिळू शकणार नाही की,
तु स्वतंत्र ओठांवरती 
पहारे बसवावेस
माझा देश तुझ्या घृणेची 
प्रयोगशाळा नाहीये
तुला या गोष्टीची परवानगी
मिळणार नाही की तु अल्पसंख्याकांना 
शत्रू ठरवून त्यांचा सुनियोजित पद्धतीने
नरसंहार घडवावास
तुला या गोष्टीची अनुमती 
मिळणार नाही की,
तु आपल्या धनदांडग्या
मालकांना खुश करण्यासाठी
कष्टकऱ्यांना आभासी 
विकासरथाच्या चाकाखाली 
चिरडून टाकावेस
माझा देश तुझ्या घृणेची
प्रयोगशाळा नाहीये
तुला या बाबीची परवानगी
नाही मिळू शकत की,
तु धार्मिक उन्माद पसरवून
"जात-वंश-धर्म' यांच्या 
भिंती उभ्या करुन 
या देशाच्या नागरिकांच्या 
आयुष्याशी खेळावेस
तुला या गोष्टीची परवानगी
नाही मिळू शकत की,
तु जनादेशाला धुडकावून
या देशातल्या गंगाजमुनी 
महान वारशाची वासलात 
लावून टाकावीस.

सायबर सेल
अव्याहतपणे लिहिली जात आहे
कटाची पटकथा
शिव्या-शापांचं केलं जात आहे उत्पादन
खोट्याचं पालनपोषण करुन 
त्याला तरुण केलं जात आहे
इतिहासाच्या बरगड्या तोडल्या
जात आहेत
मग किश्शांच्या तबकडीत संविधानाला
भाजलं-शिजवलं जात आहे
विकृत शब्दचित्रांना विद्युतवेगाने
पसरवलं जात आहे
अडाणचोट कूपमंडूक गर्दीला
आणखी काय हवं?
कपोलकल्पित शत्रू मिळाला तर
त्वरित हाणल्या जातात नैराश्यातून
लाथा-बुक्क्या
सायबर सेलजवळ आपल्या मालकाच्या सेवेसाठी मौलिक असत्याचे सृजन करणारे अगणित कारागीर आहेत
जे भूक-भाकरीच्या प्रश्नाला
पापण्या लवायच्या आत
हिंदू-मुस्लिम  प्रश्नामध्ये
बदलवू शकतात
जे मर्यादाशील जगण्याचा हक्क मागणाऱ्या नागरिकांवर देशद्रोही फितुरीचा पोशाख चढवू शकतात

एनआरसी
तुम्ही लोकांनी प्रेमाऐवजी
निवडलीये घृणा
आणि ज्यावेळी अग्रेसर व्हायचे होते
तेव्हा राहिलात तटस्थ
तुम्ही नरसंहाराला मानले
फिल्मी दृश्य
आणि मानलेत तमाम रत्नाकर
बनू शकतात वाल्मिकी
प्रजाजनहो,
आता तुमची खैर नाही
यातना शिबिर तुमची प्रतीक्षा करतं
आहे!
एका रजिस्टरमध्ये क्रमांकाच्या रूपात
नोंदले जाईल तुमचे जीवन
सिद्ध करावे लागेल याच मातीत
जन्मले होते तुमचे पूर्वज
नाव उच्चारण्याच्या जराशा फरकाने
जमिनीच्या कागदपत्रातील सरकारी कारकुनाची जराशी बेजबाबदारी
हिसकावून घेईल तुमची नागरिकता
तुम्हाला फरफटत नेतील एक दिवस
मग तुमच्या मुलांना फरफटत कुठल्याशा अन्य कारागृहात डांबण्यात येईल
तुमची किंकाळी लोकशाहीच्या काळोख्या विहिरीत फेस बनून
तरंगत राहील
त्या रजिस्टरला किरकोळ समजू नका
त्या रजिस्टरच्या कारागिराने ठरवलं आहे की तुम्हाला कसेही करुन जिवंतपणीच मारून टाकायचे
कसे तुमच्या असहमतीला गंभीर गुन्ह्यामध्ये बदलायचे..!
ते तुम्हाला एका क्षणात माणसाऐवजी
एक वाळवी घोषित करतील
तुम्हांला जेव्हा चिरडण्यात येईल
तेव्हा ते राष्ट्रहिताचे एक अनुपम्य
उदाहरण असल्याचे सांगितले 
जाईल.

संपर्क - ९८९०१४०५००

बातम्या आणखी आहेत...