आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जेएनयू’ साठी..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरत यादव   देशात पुन्हा एकदा ‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय’ (जेएनयू) चर्चेत आले आहे. इथले विद्यार्थी ‘नवीन वसतिगृह नियमावली’ने लादलेल्या वसतिगृह शुल्कवृद्धीच्या विरोधात, तसेच इतरही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत... लाठ्या खात आहेत. हे आंदोलन केवळ ‘उजव्या विचारसरणीच्या विरुद्धचा राजकीय लढा’ नसून ‘सरकारी शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध गोरगरीब, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती, शेतकरी आणि मजुरांच्या पोरांचा सांस्कृतिक आणि सामाजिक लढा’ आहे. नवीन वसतिगृह नियमावली’ लादताना प्रशासनाने ९९९ टक्के शुल्कवृद्धी केली आहे. हे प्रशासन प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रातून सतत खोटी आणि चुकीची माहिती पसरवत आहे. ‘जेएनयू’मध्येच गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी केलेल्या एका आर्थिक सर्वेक्षणानुसार ४० टक्के विद्यार्थ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ४० टक्क्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ५० हजारांपेक्षादेखील कमी आहे. म्हणजेच, शुल्कवृद्धी झाली तर याचे थेट परिणाम जवळपास किमान ४० टक्के विद्यार्थ्यांवर होणार आहेत. याची जाणीव असल्यानेच सारे विद्यार्थी  पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खात आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर अभिषेक रामाशंकर आणि शैलजा पाठक यांच्या हिंदी कवितांचा भरत यादव यांनी केलेला हा अनुवाद खास ‘दिव्य मराठी रसिक’च्या वाचकांसाठी... ..................( १ ).................. ते प्रगतीची निव्वळ स्वप्नं पाहतात कारण त्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना हवं आहे प्रार्थनालय हजारो-करोडोंचे पुतळे-मूर्ती ज्यामुळे भरु शकतील त्यांच्या तिजोऱ्या एक मऊशार बिछाना गरम चहा, उंच-दिमाखदार स्टेज  आणि मोठे कॅमेरे आणि झेंडे आणि झेंडे आणि न मोजता येणारी गर्दी आणि  जयजयकार आणि सभा ढंग नाही ढोंग पाहिजे त्यांना त्यांना नकोयत शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये  शेता-रानांऐवजी अंथरलेली पुस्तकं मजुरांच्या हातात लेखणी रात्री अडीच वाजता ग्रंथालयात  बसलेल्या मुली त्यांना नकोय कुठलेच बंड कुठली आव्हाने कुठले आंदोलन कुठला प्रश्न नकोयत त्यांना आपल्या  घासात खडे त्यांना हवीय फक्त  गर्दी-झुंड आपले भक्त आपले चमचे आपले समर्थक ते भितात क्रांतीला ओठांवरच्या इन्कलाब घोषणेला वळलेल्या मुठींना काॅम्रेड! ते भितात आपल्या झेंड्याला आमच्या ताठ मणक्याच्या हाडांना जर पडलोच तर साथी तू उचलावेस... तू उचलावेस की तुला माझ्यासारख्यांना  उचलायचेय तू उठावेस की आपणांस मिळून सत्ताधुंद राजसत्तेला उलथायचे आहे तू उठावेस यासाठी की आपणांस झुंजायचे आहे त्यांच्यासाठी जे लढू-झुंजू शकत नाहीत  आपल्या वाट्याची लढाई तुम्ही पुढे सरसावायचं आहे तुमच्यासारख्यांसाठी जे येतच असतील तुमच्या मागोमाग तुमच्या विद्यापीठांमध्ये दूर देश-प्रदेशातून दूर देशासाठी मूळ हिंदी कविता :  अभिषेक रामाशंकर   ..................( २ ).................. न बोलणाऱ्या मुली बोलत आहेत न शिकणाऱ्या मुली शिकत आहेत प्रत्येक गोष्टीला भिऊन राहणाऱ्या मुली भिववत आहेत “मुलांप्रमाणेच मुलगी’ मुलीच्या टणक पाठीवर मुलांप्रमाणेच काठ्या खाते आहे काठीला डोळे असत नाहीत काठीला विचारही असत नाही काठीची ठराविक दिशाही नसते कुठली व्यवस्था जेव्हा रिकाम्या डोक्याचे  कंटेनर आणायला तेल आणायला निघून जाते तेव्हा काठ्या स्वैर आणि दिशाहीन व्हायला हव्यात प्रत्येक आवाजावर काठी प्रत्येक निरागसावर काठी काठी बोलत आहे तिची भाषाच रक्तरंजित आहे काठीला रोखणारा कोणी नाही राजाला उंदराच्या बिळात  राहायला हवे आमची मुलं रस्त्यावर मार  खात आहेत ती झुंजायला शिकली आहेत हारत नाहीयेत इतिहासाच्या वाटेवर आमच्याच लेकरांचे रक्त आहे ते आपल्या हक्क-अधिकाराच्या मार्गावरचे बॅरिकेटर हटवताहेत ते एकमुखाने ओरडत घोषणा देताहेत आंधळ्या बहिऱ्या व्यवस्थेचा  जय असो सत्य आणि असत्याचा जय असो महाविद्यालये विद्यापीठांचा  विजय असो बाकी सारे स्वाहा होऊन जावो राजाला आणखी खोल खोल बिळात  निघून जायला हवे..! मूळ हिंदी कविता :  शैलजा पाठक अनुवाद - भरत यादव,   संपर्क - ९८९०१४०५००