आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञासूर्याच्या विचारतेजाने तळपणारी काव्यभाषा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भरत यादव

युवाकवी विहाग वैभव यांची कविता समाजातील अभावग्रस्त,उपेक्षित जनतेचा आवाज आहे. शोषितांवरील अन्यायाविरोधात प्रस्थापित अ-व्यवस्थेला आणि इतिहास-संस्कृतीला चढ्या आवाजात जाब विचारण्यास ती कचरत नाही. 


युवाकवी विहाग वैभव यांची कविता समाजातील अभावग्रस्त, उपेक्षित जनतेचा आवाज आहे. प्रज्ञासूर्याच्या विचारतेजाने तळपणारी ही काव्यभाषा जमिनीशी जोडल्या गेलेल्या समूहांची प्राणांतिक वेदना पोटतिडकीने मांडते. माणूस कवितेच्या आधीपासून होता आणि कवितेच्या नंतरही तो असणार, याचे भान बाळगत कष्टकरी, मजूर, शेतकरी, महिला यांच्या भावनांना वाचा फोडणारी ही कविता आहे. धर्मांध आणि सत्तांध उन्मत्तांविरोधात कविता आयुध बनून कशी सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यास पुढे झेपावते, त्यांचे संरक्षणकवच बनू पाहते हे या कवितांमधून प्रकर्षाने प्रत्ययास येते.
जौनपूर, उत्तर प्रदेश येथील विहाग वैभव सध्या "बनारस हिंदू विद्यापीठा'मधून पीएचडी करत आहेत. अलीकडेच प्रतिष्ठेच्या "भारतभूषण अग्रवाल' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हिंदीतील अनेक नियतकालिकांमधून कविता प्रकाशित होत असतात. 

फारच किरकोळ गोष्टी 


मागितल्या होत्या त्यांनी


माझ्या पूर्वजांनी एक छत


मागितले होते


ऊन,थंडी आणि पावसापासून


बचाव होण्यासाठी


लेकरं जेव्हा लटपटत असत थंडीने


तेव्हा बापाचा आत्मा कापल्या 


पतंगासारखा हेलकावे खात


कोसळू पाहात असे वेदनेच्या महासागरात


शेताचा एवढासाच तुकडा हवा होता 


ज्यामुळे मूठभर भूकेच्या उद्ध्वस्त


वाड्यावर वेठबिगार न होता


कुटुंबाला जिवंत राखता येऊ शकेल


आणि कमीतकमी आत्माभिमानाचा


सौदा करुन आणल्या गेलेल्या अन्नाने 


पोराबाळांना क्रूर-निष्ठुर


मृत्यूपासून स्थगित ठेवता येऊ 


जाऊ शकेल


जे की त्यांना माहीत होते माणसाच्या 


नागवेपणापुढे शारीरिक नग्नता काहीच नाही,


तरिही पोरा-बाळांचे,


पत्नीचे शरीर झाकता येईल


ज्यामुळे संस्कृती वाचवली जाऊ शकेल नागवी होण्यापासून,


एवढेच कापड हवे होते


माझ्या पूर्वजांना


काहीजण असे होते ज्यांनी या सगळ्यातून
 
सावरत एका राष्ट्राची


इच्छा व्यक्त केली होती


चाबकापासून जीवे मारले न जाता 


ज्यांना ते


आपले म्हणू शकणार होते


पण धर्माच्या आगीवर भाजलेल्या


न जन्मलेल्या पिढ्यांचे गर्भ-शिशु


खाल्लेल्या मद्यपींच्या उलट्यांप्रमाणे


असलेल्या या संस्कृतीचा शतकांपासून मी


दुरुनच दुर्गंध सोसतोय


मी पाहतो आहे की तिथे,


ऐय्याशी इतिहासाच्या कोठारांमध्ये 


अपरिमित धान्य सडून वास मारत आहे


सडलेल्या संस्कृतीच्या संग्रहालयात


ठेवलेली ती बुट्टेदार शेरवानी


माझ्या पूर्वजांच्या हाडांपासून बनविलेली आहे


एक भूक शतकांपासून माझा पाठलाग 


करते आहे


एक आदीम कण्हणं उरात सारंगीप्रमाणे
 
वाजत राहतंय


तू लक्षपूर्वक पाहिलेस तर


तुला माझ्या पाठीवर फटक्यांच्या हजारो 


खुणा दिसतील


माय म्हणते,


या जन्मखुणा आहेत


भुकेपुरते अन्न


उन्हापुरते छत


तहानेपुरते पाणी अशा


फारच किरकोळ गोष्टी मागितल्या होत्या


माझ्या पूर्वजांनी


पण घृणेच्या सामग्रीच्या खतावर पोसून


डोलणाऱ्‍या तुमच्या संस्कृतीने त्यांना


भुकेत बुडवून मारले


पाण्याने बांधून मारले


इतिहासाचे छत उभारले आणि


छतात चिनून मारले


-------------------------------------------------------------------------------------------------------------------


संस्कृतीच्या न्यायालयात


तटस्थता एक अपराध आहे


जर आपण मारेकऱ्यांच्या विरोधात उभे राहाणे निवडणार नसाल तर मारेकरी


तुम्हाला आपले समर्थक मानतात


जर आपण भुकेलेल्याला साथ देत नसाल तर तुम्ही चंगळवादी श्रीमंतीच्यासोबतचे होऊन जाता


जर आपण माणूस बनण्याकरिता


राहाणार नसाल उत्सुक


तर अमानुषांची सेना तुम्हाला 


गिनते त्यांच्यात


जर आपण प्रेमाला निवडत नसाल


तर घृणा तुम्हांला निवडत असते


संस्कृतीच्या न्यायालयात तटस्थता एक अपराध आहे


जर आपण उभे नसता स्वातंत्र्य, समता, न्याय आणि प्रेमाच्या बाजूने 


तर तमाम मृतप्राय युक्तिवादांच्या व्यतिरिक्त आपण या मूल्यांच्या विरोधात असलेल्यांच्यात सामील


झालेले असता


-----------------------------------------------------------------------------------------------------------


याच धरतीच्या गर्भातले पाणी 


शरीरात रक्त बनून धावते आहे


याच शेतात पिकलेले अन्न मांस-रक्त 


बनून वाढते आहे


कधी कष्टाच्या घाण्याला जुंपलेल्या


आईने उतरवून खाली ठेवलं तर


याच धरतीच्या ओटीत बेफिकीरपणे


पसरलो


आपल्या जखमांवर इथल्याच मातीला


थापले


आणि सगळे नीट, बरे होण्याच्या 
भरवशावर जिवंत राहिलो


पण धर्मांबाबतच्या घृणा 


नरसंहारानेही संपत नाहीयेत


त्या न जन्मलेल्या पिढ्यांपर्यंत पाठलाग 


करत राहतात


आता संघटित घृणेचे वंशज


आम्हाला जेव्हा नागरिकत्वाचे 


पुरावे मागत आहेत


तेव्हा मी एका अशा लॅबला शोधत फिरतो आहे जी माझ्या आत्म्याचा एक्सरे काढू शकेल


पण नाही


नागरिकता आत्म्याचा नव्हे शरीराचा मामला आहे


आणि शरीराला तर गोळी मारली जाऊ शकते


सरकारची गोळी,


घृणेचा बारुद भलेही


आम्हांला संपवून टाकू शकेल


पण आम्ही लढू,थकू,तुटू,रडू लागू


आमची कबर खोदू आणि 


पूर्वजांच्या बाजूला जाऊन निजू


पण आम्ही इतर कुठेही जाणार नाही


याच देशात जन्मलो


याच देशात मरणार


इथेच आमचे शरीर


या देशातच राहणारसंपर्क - ९८९०१४०५००

बातम्या आणखी आहेत...