लेकीच्या माहेरासाठी

दिव्य मराठी

Apr 23,2019 12:02:00 AM IST


साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट. संपूर्ण उन्हाळा नाशिकला घालवून मुला- सुनेसोबत आम्हीं दोघे चेन्नईला निघालो. पुण्यापर्यंत गाडीने जाऊन मुलीकडे जेवण करून नंतर लगेच दुपारी विमानाने चेन्नईला जाण्याचा प्लॅन होता.हे सर्व नेहमीप्रमाणेच होतं. पण आदल्या दिवशी दुपारी ऐंशी वर्षांची माझी आई तोल जाऊन पडली. नाशिकला आई, भाऊ आणि आम्ही शेजारी शेजारी राहतो. मी सकाळ संध्याकाळ तिची विचारपूस करणे ओघाने आलेच. पण या वेळेस आमच्या जाण्याच्या गडबडीत आपली चिंता नको म्हणून फार काही लागले नसल्याचा आव आणला तिनं, तरीही मी जाण्याचं रहित करते म्हणून वारंवार सुचवलं, पण तिनं मानलं नाही. तिथं सगळे तिची काळजी घ्यायला आहेत म्हणून मीही थोडीशी निश्चिंतपणे जायला निघाले, पण सकाळी जेव्हा तिचा निरोप घ्यायला गेले तेव्हा तिला खुर्चीवर बसतानासुद्धा ज्या वेदना झाल्या त्या पाहून मात्र माझं मन चलबिचल झालं. अशा विमनस्क स्थितीतच मी गाडीत जाऊन बसले खरी, गाडी पुण्याच्या दिशेने धावू लागली आणि माझं मन मात्र उलट नाशिकच्या दिशेने पळू लागलं. रेल्वेतून जाताना झाडं उलट्या दिशेने पळताना दिसतात ना तसं. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर एका ठिकाणी चहापाण्याला थांबलो. मी मनाशी माझ्या स्वभावाविरुद्ध काहीतरी ‘ठाम' ठरवलं होतं. विमानाचं तिकीट, आत्तापर्यंतचा प्रवास, घरी एकटं राहावं लागणं, ह्या कशाचाच विचार न करता मी सांगून टाकलं, मी याच गाडीत परत नाशिकला जाणार, एकटी. सगळे जण आश्चर्याने पाहू लागले. मी नाशिकला परत निघाले होते. एअरपोर्टवर सगळ्यांना सोडून गाडीने संध्याकाळी नाशिकला घरी पोहोचले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आईच्या डोळ्यात मात्र किंचित आनंदाची छटा कदाचित मलाच जाणवली असावी. अशा रीतीने दिवसभर आईजवळ आणि रात्री आपल्या घरी असा माझा दिनक्रम सुरू झाला. अशीच एक दिवस संध्याकाळी ओसरीवरील झोपाळ्यावर निवांत बसले होते. फोनची रिंग वाजली, लेकीचा फोन होता. दोन-तीन वाक्यं खुशालीचे बोलल्यावर ती म्हणाली, ‘जरा समोर बघ ना' म्हणून बघितलं, तर साक्षात लेकच सुटकेस घेऊन समोर उभी.

"अशी अचानक कशी आलीस?’
"आले, फक्त तुझ्याजवळ राहण्यासाठी’ लेक उत्तरली.


सर्वांना तिच्या अनपेक्षित येण्याने खूपच आनंद झाला. हे असं माझं एकटीनं राहणं, तिनंही बारावी झालेल्या मुलीला, नवऱ्याला घरी ठेवून अचानक एकटीनंच येणं हा अनुभव आम्हा सर्वांनाच नवीन होता. त्या चार-पाच दिवसांत आम्ही दोघी जणी जणू फक्त एकमेकींसाठीच होतो. तासन््तास गप्पा, फिरायला जाणं, कुठलेही कामाचे बंधन नाही, जेवणखाणं भावाकडेच त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही, वहिनीनेही हे माझं माहेरपण आणि भाचीचं आजोळपण मनापासून हौसेनं केलं. आईही आपलं आजारपण जरासं विसरली होती. ऐष केली अगदी दोघींनी. एरवीही ते सगळे जण येतात तेव्हा सगळं व्यवस्थित होईल असा प्रयत्न असतोच आमचा, पण या वेळच्या भावना काही वेगळ्याच होत्या. आजकालच्या युगात हे असं आईचंही माहेरपण गरजेचं आहे, नाही कां? बऱ्याच जणांना फक्त मुलगीच असते आणि मुलीलाही आपल्या आईसाठी काही तरी करावं वाटतं, आईवडील आपल्या घरी स्वतंत्र असतात, सुखीही असतात,पण कधी तरी हातांत आयता चहाचा कप हवासा वाटतो,एखादा आवडीचा पदार्थ कुणी खाऊ घालावासा वाटतो,कधी. मग एखादी लेक ‘मी आईची व्हावे आई' या गाण्याच्या शब्दांप्रमाणे वागते तेव्हा वरच्या ओळीत थोडासा बदल करून असं म्हणावं वाटतं, ‘आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते.'

भारती महाजन-रायबागकर

X