आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानलेलं नातं

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारती मोगली

शेजार हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. शेजारी राहणाऱ्या मानलेल्या भावाबद्दल बहिणीनं व्यक्त केलेल्या या भावना...
 
नात्यामध्ये प्रेम, विश्वास या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पण सध्याच्या जगात सख्य असूनही माणसांबद्दल जवळीकता वाटत नाही. पण दूरचा, शेजारचा, प्रवासाच्या ठिकाणी भेटलेला वाटेतला माणूस मात्र कधी कधी सख्ख्यापेक्षा अधिक जवळचा वाटतो. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी काका-काकू आणि त्यांची दोन मुलं असं कुटुंब राहायचं. माझी आई नेहमी आजारी असायची. वेगवेगळ्या कारणामुळे आमचे नातेवाईक आमच्याजवळ नव्हते. मात्र शेजारची ही दोन मुलं आणि काका-काकू आम्हाला नेहमी मदत करत. ही मुलं राखीपौर्णिमेला माझ्याकडून राखी बांधून घ्यायचे. ओवाळणी म्हणून ती दोघं त्यांच्या आईकडून भांडून एक रुपया घेऊन यायचे आणि त्याची ओवाळणी टाकायचे. आम्ही सोबतच लहानाचे मोठे झालो. माझ्या लग्नात या दोघा भावंडांनी खूप मदत केली आम्हाला. आम्ही जिथं असू तिथं ही भावंडं आमच्या मदतीला यायची. आईची विचारपूस करायची. सख्ख्या भावांपेक्षाही या भावांनी अधिक मदत केली आम्हाला. सुखात-दु:खात त्यांनी कधीच आमची साथ सोडली नाही. माझ्या लग्नाच्या वेळचा प्रसंग तर आजही जसाच्या तसा आठवतो. माझ्या लग्नाची सगळी तयारी झालेली होती. कार्यालय, दागदागिने, कपडालत्ता अशी जोरदार तयारी सुरू असताना माझे वडील गेले. तो धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. मात्र त्या वेळी हीच भावंडं माझ्या मदतीला धावून आली. त्यांनी मला आधार दिला. विश्वास दिला. माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या अशा पाठिंब्यामुळे मी आजही त्यांची ऋणी आहे. समाधानाची बाब म्हणजे ही नाती आजही टिकून आहेत. आजही त्यांच्याकडे जाऊन मनमोकळं बोलावं, गप्पा माराव्या वाटतात. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यापामुळे ते शक्य होत नाही ही खंत आहे...