आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेत परतलेल्या भास्कर जाधव यांचा संघर्ष स्वकीय-मित्रपक्षाशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक ताम्हणकर 

रायगड - कोकणातील दिग्गज नेते माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवबंधन बांधले आहे. ते गुहागरमधून निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले असून आदित्य ठाकरेंनी तसे संकेत जनआशीर्वाद यात्रेच्या गुहागर येथील सभेत दिले आहेत. २००४ मध्ये मातोश्रीवर ताटकळत ठेवल्यानंतर अत्यंत नाराज झालेल्या जाधवांनी सेना सोडली. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले जाधव १५ वर्षांनी पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यामुळे कोकणात सेनेचे बळ वाढले आहे. जाधव यांचा लोकसंपर्क दांडगा आहे, परंतु सेनेतील गट व रामदास कदमांसोबतचा असलेला ३६ चा आकडा कसा जुळतो, त्यात मित्रपक्ष भाजपच्या दाव्यावर काय मार्ग काढला जातो यावर जाधव यांच्या गणिते अवलंबून आहेत. कारण भाजपच्या विनय नातू यांनीही तयारी केली आहे. युती झाली नाही तर जाधवांना फटका बसू शकतो. गुहागरमध्ये रामदास कदम यांचा चांगला दबदबा आहे. .

खरं तर भास्कर जाधव हे कोकणातील सेनेचे संस्थापक सदस्यच. १९९५ आणि १९९९ मध्ये ते चिपळूणमधून शिवसेनेचे आमदार बनले. २००४ मध्ये सेनेने तिकीट कापल्याने अपक्ष म्हणून लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर जाधव राष्ट्रवादीत गेले. २००९ मध्ये त्यांनी रामदास कदम यांचा पराभव केला होता. जाधव यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची मंत्रिपदे सांभाळली.
 

भाजपची हवा व सेना कार्यकर्त्यांनी नाराजी डोकेदुखी ठरणार?
गुहागर मतदारसंघाची रचना अत्यंत विचित्र आहे. गुहागर तालुक्यासोबत चिपळूण आणि खेड तालुक्यांचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. उत्तर रत्नागिरीतील गुहागर मतदारसंघाबरोबरच चिपळूण, खेड या भागात जाधवांचे चांगले वर्चस्व आहे. शिवसेनेत असतानाही ते होते आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतरही ते टिकले होते. आता राज्यात असलेली भाजपची हवा व मतदारसंघातील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांची जाधव यांच्याबाबत असलेली नाराजी त्यांची डोकेदुखी ठरू शकते. 
 

जातीय समीकरणे : गुहागर मतदारसंघात कुणबी समाजाची संख्या जास्त
कुणबी समाज हा प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार आहे. विकासाच्या राजकारणात तो अजूनही मागे आहे. परंतु हातावर पोट असलेला हाच समाज येथील आमदार निवडतो हे अद्यापही त्याला माहीत नाही. देवावर आणि गावकीवर या समाजाचा मोठा विश्वास आहे. याचाच फायदा उमेदवार करून घेतात. 
 

काय झाले होते २००४ मध्ये ?
२००४ मध्ये सेनेच्या सर्व्हेत जाधवांच्या पराभवाची शक्यता व्यक्त केल्याने त्यांचे तिकीट कटले. उद्धवांकडे सूत्रे आल्यानंतर सेना सोडणारे जाधव हे पहिले महत्त्वाचे नेते होते. कोकणात सेनेत राणेंनंतरचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जाधव मराठा समाजाचे असल्याने राणेंसाठी ते आव्हान ठरू शकले असते. यामुळे २००४ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे म्हणतात.
 

जाधव पुन्हा शिवसेनेतच का परतले? 
राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपत विलीनीकरणाच्या मार्गावर आहे. अशा वेळी राणेंना शह देताना कोकणातील मराठा चेहरा म्हणून जाधवांच्या रूपाने सेनेला नेता मिळाला आहे. सध्यातरी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाधवांच्या तोडीचा उमेदवार नाही. त्यामुळे जाधवांसमोर आव्हान आहे ते स्वकीयांचे व मित्रपक्षाचेच.

बातम्या आणखी आहेत...