शिक्षक दिन / प्रोफेसर हरारी यांची ही मुलाखत... त्यांच्या पुस्तकाच्या २ कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या

जगातील सर्वात लोकप्रिय शिक्षक हरारी म्हणतात, तंत्रज्ञान माणसाला हॅक करेल, कोणतीही नोकरी ५ वर्षेही टिकणार नाही

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 17,2019 03:05:58 PM IST

झुकेरबर्ग, लेगार्ड यांच्यापासून हॉलीवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी घेतल्या मुलाखती
इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठातील प्रोफेसर युवाल नोआ हरारी यांची मुलाखत आजपर्यंत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, माजी आयएमएफचे प्रमुख ख्रिस्टीन लेगार्ड व प्रसिद्ध अभिनेत्री नेटली पोर्टमन यांनीही घेतली आहे. १९७६ मध्ये जन्मलेल्या हरारी यांच्या सॅम्पियस, होमो डायस आणि २१ लेन्सेस फॉर २१ सेंच्युरीसारख्या पुस्तकाच्या दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. भास्करचे रितेश शुक्ला यांनी तंत्रज्ञान, रोजगार आणि मानवाच्या भविष्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

> तंत्रज्ञानाने जग बदलत आहे, अशा काळात राजकीय राष्ट्रवाद किती टिकाव धरेल?
आण्विक युद्ध, पर्यावरण रक्षण आणि तंत्रज्ञान ही माणसांसमोरील आव्हाने आहेत. पहिली दोन आव्हाने सर्व देश मिळून पेलू शकतील. परंतु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जैव अभियांत्रिकी रोजगारासह आपली मनोवृत्ती बदलून टाकेल. अमेरिका, चीन, भारतासारख्या मोठ्या देशांनी मिळून रोबोट तसेच जनुकीय अभियांत्रिकीच्या आधारे तयार सुपर मानवांना नियंत्रित करावे लागेल. यात राष्ट्रवादाचे जागतिकीकरण महत्त्वाचे ठरते.


> हे नवे तंत्रज्ञान इस्लामिक राष्ट्रवादी किंवा अतिरेक्यांच्या हाती लागली तर?
धार्मिक कट्टरवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या हाती हे तंत्रज्ञान लागण्याचा धोका आहेच. इतिहासात कट्टरवाद्यांनी नेहमी महिला आणि कमजोर लोकांवरच अत्याचार केले आहेत. जनुकीय अभियांत्रिकीने मानव जर कारखान्यात घडू लागला तर महिलांची गरजच संपेल. या धार्मिक कट्टरवाद्यांपासून तंत्रज्ञान वाचवणे गरजेचे आहे.


> माणूस यंत्रांकडून हरला तर अर्थव्यवस्था व नोकरीत त्याची भूमिका काय उरेल?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने माणसाच्या बुद्धीलाही मागे टाकले आहे. भविष्यात जुन्या काळातील रोजगार नष्ट होतील. आॅटोमेशनमुळे जेवढ्या वेगात नोकऱ्या मिळतील तेवढ्याच वेगाने जातील. तीन-चार वर्षांतच नव्या नोकरीसाठी प्रशिक्षित होऊन सज्ज राहावे लागेल. आजची शिक्षण व्यवस्था यासाठी पूरक नाही. नवे ते शिकत राहावे लागेल.


> भविष्यात शाळा, शिक्षक कसे असतील?
तंत्रज्ञान एवढ्या वेगाने बदलत आहे की आजची नोकरी दोन वर्षानंतर राहील की नाही सांगता येत नाही. इंटरनेमुळे शाळांत शिक्षकांची गरज आहे का, असा विचार येईल. स्मार्टफोनवरच मुले जगातील उत्तम शिक्षकांकडून शिकू शकतील. मग शाळेतील शिक्षकांचे काय, असा प्रश्न आहे. म्हणूनच भावनिक शक्ती आणि बदलाशी लढण्याचे मनोबल येथे आवश्यक ठरते. अन्यथा सारे कठीणच आहे...

> तंत्रज्ञान लोकशाहीला कमकुवत बनवेल? :

प्रत्येक राजकीय परंपरेला तंत्रज्ञान कमकुवत करू शकते. मग ती लोकशाही असो, वा समाजवाद किंवा भांडवलशाही. २१व्या शतकात तंत्रज्ञान मनुष्यालाही हॅक करू शकते. हॅकचा अर्थ असा की, कॉम्प्युटरला युजरबद्दल इतकी माहिती आहे की युजरलाही स्वत:मधील हे गुण माहिती नाहीत. यातून एखादे सरकार किंवा कंपनी आपल्यामार्फत त्यांच्या फायद्याचे निर्णय करवून घेऊ शकते.


> तिसरे महायुद्ध २१ व्या शतकात होईल? झालेच तर कारण काय असेल? :

खरे तर आज आपण इतिहासातील सर्वात शांत युगात जगत आहोत. छोटी-मोठी युद्धे होत असली तरी जगाच्या बहुतांश भागांत शांतता आहे. प्राचीन काळात १५ टक्के मृत्यू मानवी हिंसेमुळे होत होते. आज ही संख्या १.५ टक्के आहे. यापेक्षा अधिक मृत्यू आज अति सेवन आणि स्थूलतेमुळे होत आहेत. आज साखर स्फोटकांपेक्षा धोकादायक आहे. १९४५ ला संपलेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठी युद्धे थांबली. याचे कारण देवतांची कृपा हे नव्हे, तर मानवाने सद््सद््विवेकबुद्धीने निर्णय घेतले. भविष्यातील काही सांगता येत नाही. मानवी मुर्खपणापेक्षा शक्तीशाली दुसरे काहीच नाही. युद्ध झालेच तर त्याचे हेच कारण असेल. तो मुर्खपणा काय असेल, असे विचाराल तर त्याचे उत्तर पहिल्या दोन महायुद्धांतून मिळू शकेल. या मुर्खांना व्यापारापेक्षा युद्ध फायद्याचे ठरू शकते, असे वाटले तर युद्ध कुणीच थांबवू शकणार नाही.


> मग आमच्याकडे आता काय उपाय आहेत? :

उपाय कठीण आणि दीर्घकालीन आहेत. संपूर्ण जीवन एखाद्या धार्मिक ग्रंथाच्या आधारे जगणे आता शक्य नाही. ध्यानधारणेचा लाभ घ्यावा लागेल. मी रोज दोन तास ध्यान करतो. दरवर्षी दोन महिने विपश्यनाही करतो. आज आपण सोशल मीडियावर सहजपणे आवडी-निवडी सांगतो. खरे तर आपण आपल्याबद्दलचा डाटा फुकटात दान करत आहोत. याबद्दल नेते आणि कार्पाेरेट कंपन्या अनभिज्ञ राहाव्यात, असा उपाय करायला हवा.

X
COMMENT