योजना तयार करताना / योजना तयार करताना अाम्ही लाेकांचाच नव्हे तर प्राण्यांचाही विचार करतो

दिव्य मराठी वेब टीम

Jan 21,2019 01:43:00 PM IST

थिंपू. मी १९७० पासून भूतानमध्ये बदल घडत असताना पाहतोय. मी दोन वर्षांचा असल्यापासून, देशात जीडीपी (विकासदर) वाढीपेक्षा जीएनएचवर (ग्रॉस नॅशनल हॅपिनेस) भर देण्यात येताे. मी डॉक्टर झालो. परंतु शिक्षणावर माझ्या पदरचा एकही पैसा खर्च झालेला नाही. येथे शिक्षण व औषधे मोफत मिळतात. ते जर मोफत नसले असते तर पंतप्रधानपद सोडाच, मी डाॅक्टरही होऊ शकलाे नसतो. असे केवळ माझ्याबाबतीत घडले असे नाही. भूतानमधील सर्व लोकांचा आनंद माझ्यासारखाच आहे. कारण येथे सर्वांना समान संधी मिळते. गरज आणि लालसा यातील फरक समजणे आवश्यक आहे. आमच्या सरकारचेे हेच मूळ धोरण आहे. आमच्याकडे सेंटर फाॅर भूतान स्टडीज अँड जीएनएच रिसर्च आहे. लाेकांची आनंदाची पातळी किती उंचीवर आहे, ती कशी वाढवावी यावर हे सेंटर सतत सर्व्हे करत असते.


लाेकांच्या ख्यालीखुशालीची हमी सरकार तर देऊ शकत नाही, परंतु तशी परिस्थिती निर्माण करू शकते. या माध्यमातून लोक आपला आनंद शोधू शकतील. अशी परिस्थिती शिक्षण, आरोग्य, पाणी, जंगल व सामाजिक समरसता कायमच राहायला हवी असे नव्हे, तर ती सातत्याने वाढायला हवी. आमचे सरकार आनंद वाढवण्यासाठी यावर भर देते. १९७९ मधील एक घटना. भूतानचे चौथे राजे जिग्मे शिंग्ये वांगचूक कार्यक्रमाहून परतत होते. मुंबई विमानतळावर त्यांना एका पत्रकाराने विचारले, भूतानचा जीएनपी (ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट) किती आहे? राजाने उत्तरात म्हटले, भूतानसाठी जीएनपीपेक्षा जीएनएच म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपिनेस महत्त्वाचा आहे. यानंतर आनंद हा आंतरराष्ट्रीय विषय ठरला. प्रकल्प गरजेवर आधारित असावा, केवळ दिखावा नसावा, यासाठी आम्ही काही मानके निश्चित केली आहेत. पंचवार्षिक योजनांत सामाजिक व आर्थिक घडामोडींचे मूल्यांकन याच मानकांच्या आधारे होते. अन्यथा सरकार त्याला मंजुरीच देत नाही. उदाहरण सांगायचे झाल्यास एखादा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या योग्य असेल, पण निसर्गाची हानी करणारा असेल तर तो रद्द केला जातो. वाघ व हत्तीसारख्या प्राण्यांच्या मार्गात अडथळा आणणारे प्रकल्प कधीच मंजूर केले जात नाहीत. भूतानमध्ये ५७ टक्के लोक शेती करतात. शेतीमधून यांच्या आनंदाची पातळी वाढवण्यासाठी सरकार व्यावसायिक शेती करण्याकडे वाटचाल करते आहे. येत्या काही काळात भूतान आता संख्येपेक्षा गुणवत्तेकडे लक्ष देणार आहे. भूतानमधील प्रत्येक तरुण किमान पदवीधर असावा, असेही एक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता आमच्याकडे प्रत्येक व्यक्ती १० वी अथवा १२ वी पास आहे. मोफत शिक्षण व आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात म्हणून आम्ही शिक्षण व आरोग्यासाठी ३० टक्के वाटा ठेवला आहे. त्याचबरोबर सर्वात दुर्बल घटकांचे राहणीमान चांगले व्हावे, हाही उद्देश आहे. मी जगातील सर्व तरुण पिढीला आवाहन करतो की, त्यांनी SMART व्हावे. येथे स्मार्टचा अर्थ S (सिन्सियर म्हणजे निष्ठावान) M (माइंडफुल म्हणजे हुशार) A (अस्ट्यूट म्हणजे निपुण) R (रेजिलियंट म्हणजे हार न मानणारा) व T (टाइमलेस म्हणजे प्रत्येक कामात उपयुक्त) व्हावा.

पंतप्रधान,भूतान
लोतेय त्शेरिंग

X
COMMENT