उपद्रवी विद्वान! / उपद्रवी विद्वान!

भाऊसाहेब आजबे

Dec 14,2018 02:04:00 PM IST

अगदी कालपरवापर्यंत "वन मॅन-वन पार्टी' अशी ओळख असलेले आणि नंतर आपल्या जनता पार्टीचे विसर्जन करून भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे नेमके आहेत कोण? हार्वर्डचे विद्मान प्राध्यापक? राजीव गांधींचे विश्वासू मित्र? सोनिया-राहुल गांधींचे कट्टर शत्रू, नरेंद्र मोंदींचे हितचिंतक की अरुण जेटलींचे हितशत्रू? हिंदुत्वाचे कट्टर समर्थक की सेक्युलॅरिझमचे दुश्मन? कोणते स्वामी वाईट? कोणते स्वामी चांगले? कोणते स्वामी विघातक ? कोणते स्वामी विधायक? भारतीय राजकारणात इतक्या परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांची गोळाबेरीज असलेला स्वामींसारखा राजकारणी विरळाच. त्यांच्या बोलण्यात विखार असतो, कृतीत आत्मघाती आवेश. ते मित्र म्हणूनही कुणाला नको असतात, शत्रू म्हणून त्यांना सहन करण्याची कुणामध्ये हिंमत नसते. असा हा राजकारणी घडला कसा? स्थिरावला कसा आणि प्रस्थापित होऊन अपरिहार्य बनला कसा? ही एकट्या स्वामींची कहाणी नव्हे तर काळानुरुप विद्वेषी होत गेलेल्या भारतीय राजकारण-समाजकारणाचाही हा एक इतिहास आहे....

टी.एन.शेषन. हे एकेकाळचे मुख्य निवडणूक आयुक्त.निवडणुकांदरम्यान लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले नोकरशहा. त्यांचा दरारा इतका मोठा की, भले भले नेते त्यांच्या पुढ्यात चळाचळा कापत ही वदंता. अशा या ‘स्वयंभू’ प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याने निवडणूक प्रक्रियेला शिस्त लावली. बेबंद नेत्यांना वेसण घातली .या कामगिरीमुळे शेषन नाकासमोर चालणाऱ्या, पण भ्रष्ट राजकारण्यांविषयी चीड असलेल्या मध्यमवर्गयांचे डार्लिंग बनले. सत्तेच्या, प्रशासनाच्या वर्तुळात त्यांच्या नावाला मोठेच वलय आले. मात्र निवृत्तीनंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची ही करारी प्रतिमा भंगली. त्यांच्या प्रतिमेच्या ठिकऱ्या उडवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते - डॉ. सुब्रमण्यम स्वामी.

स्वामींनी आरोपांच्या एका पाठोपाठ ेक फैरीच झाडल्या होत्या. या स्वामींचे आरोप काय होते?
१. ते कायदा मंत्री असताना, शेषन यांनी त्यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी अक्षरश: भीक मागितली होती.
२. शेषन यांनी बडे हॉटेलिअर ललित सुरी यांचा पाहुणचार झोडताना महागडा कॅनन लॅपटॉप आणि सॅटेलाइट डिश अँटेना मागितला होता. तांत्रिक गुरू चंद्रास्वामींकडून फॅक्स मशिन्स, टीव्ही आणि माणिक मोत्याची अंगठी मागितली होती.
३. शेषन यांनी एकदा कांचिपुरमहून परतताना स्वामींकडे खासगी विमानाची मागणी केली, ती नाकारली म्हणून शेषन यांनी थेट धीरूभाई अंबानींकडे चार्टर्ड विमान मागितले होते.
या तीनही आरोपांनी ९०च्या दशकात शेषणसारखा विक्षिप्त स्वभावाचा नोकरशहा पुरता हडबडला होता. वरवर त्यांच्या बोलण्यात बेफिकीरी जाणवत असली तरीही प्रतिमेला मोठीच खोच पडलीय, हे त्यांच्या सिनिकल वागण्याबोलण्यातून जाणवत होते. जातील तिथे हे प्रश्न त्यांना विचारले जात होते, त्यांचे प्रत्येक प्रश्नाला स्वभावाप्रमाणे एकच तिरसट उत्तर होते. - सुब्रमण्यम स्वामी इज इंटेलिजंट मॅन... सुब्रमण्यम स्वामी इज इंटेलिजंट मॅन... सुब्रमण्यम स्वामी इज इंटेलिजंट मॅन... ही म्हटली तर सरळसरळ शेषन यांची बदनामी होती. या बदनामीमागचे हेतू काय होते? कुणाचे त्यामागे हात होते, हे अनेकांसाठी तेव्हा गूढ असले तरीही सुब्रमण्याम स्वामींनीच शेषनना बदनामीच्या वादळात ढकलेले हे पुरेसे स्पष्ट होते. पुन्हा एकदा स्वामी नावाच्या हार्वर्ड विद्यापीठात टी. एन. शेषन यांचे शिक्षक असलेल्या या विद्वानाचे उपद्रवमूल्य जगापुढे आले होते.

सत्तरच्या दशकात भारतातील राजकारण कूस बदलू लागले. भ्रष्टाचार हा पहिल्यांदाच व्यापक राजकीय चर्चेचा विषय बनला होता. गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमधील जेपीप्रणित आंदोलनाची सुरुवात या मुद्याला केंद्रीभूत ठेवूनच झाली होती. मात्र पुढील दशकात हिंदुत्व ही विचारधारा राजकारणाच्या परिघावरून केंद्राकडे प्रवास करू लागली, त्याची पायाभरणी मुख्यत: याच दशकात झाली. आणि काँग्रेसी राजकारणाची पडझडही याच काळात सुरु झाली. आणीबाणीने एकमेकांशी वैचारिक सख्य नसलेल्या विरोधकांना एकत्र आणले. त्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सत्तेपर्यंत पोचवलेही. या काळात प्रकाशझोतात आलेल्या नेत्यांनी पुढील काळात त्या त्या राज्याच्या वा देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. अशा नेत्यांची यादी एका नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे, सुब्रमण्यम स्वामी! १९७४मध्ये सुब्रमण्यम स्वामी, नानाजी देशमुख यांच्या आशीर्वादाने जनसंघाकडून राज्यसभेवर निवडले गेले. आणीबाणी लागू झाल्यांनतर घडलेल्या एका घटनेमुळे सुब्रमण्यम स्वामी विशेष चर्चेत आले.

जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदींना अटक झालेली होती. सुब्रमण्यम स्वामी मात्र श्रीलंकेमार्गे लंडनला पोचले होते. सलग ६० दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास सदस्यपद रद्द होते. त्यामुळे स्वामींनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. जाणीवपूर्वक बँकॉकला जाणारे पण दिल्लीत थांबा घेणारे विमान पकडले. विमानतळावरून थेट संसद गाठली. नोंदवहीत आपले नाव नोंदवून त्यांनी राज्यसभेच्या सभागृहात प्रवेश केला. त्या वेळी सदनाचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती निधन पावलेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांची नावे वाचवून दाखवत होते. स्वामींनी त्या यादीत ‘लोकशाही’चे नाव समाविष्ट करावे, अशी मागणी केली. दोन मिनिटे शांतता पाळण्याचे अध्यक्षांनी आवाहन करताच, ते सभागृहातून निसटले. शीख पुरुषासारखा पेहराव करून आधी मुंबई आणि मग नेपाळमार्गे अमेरिकेला परागंदा झाले. तिथून त्यांनी इंदिरा गांधीविरोधात जोरदार मोहीम उघडली. ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया’ या नावाने एक संघटनाही स्थापली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होऊ लागल्यामुळे इंदिरा गांधींनी १९७७ला निवडणुका जाहीर केल्या, असा दावा स्वामी करतात. आणीबाणी आणि जयप्रकाश नारायण यांचा अजोड संबंध आहे. त्यांनीच संपूर्ण क्रांतीची हाक दिली होती. जयप्रकाश नारायण यांनी १९५३ मध्ये सक्रीय राजकारण थांबवून केवळ ‘सर्वोदय’चे सामाजिक काम चालू ठेवले होते. इंदिरा गांधींना काय प्रकारे विरोध करता येईल, अशी जेपींनी विचारणा केल्यांनतर त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश करावा, असा सल्ला आपण दिला, असे स्वामी म्हणतात. त्यामुळे पुढे जेपींच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन पुढे सुरु झाले, त्याचे बीजारोपण आपल्याकडून झाले, असा त्यांचा ठाम दावा आहे .
तत्पूर्वी १९७२-७३ ला आयआयटी दिल्लीमधून प्राध्यापक या पदावरून बडतर्फ केल्यावर सुब्रमण्यम स्वामी पुन्हा अमेरिकेला जाण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयापर्यंत पोचले होते. परंतु त्याच काळात मिळालेली खासदारकी आणि त्यानंतरच्या आणीबाणीने त्यांना मोठाच हात दिला. १९७७ च्या आणीबाणी पश्चात झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाच्या तिकिटावर ते मुंबईमधून लोकसभेवर निवडून गेले. मात्र, आणीबाणीच्या संघर्षात प्रकाशझोतात आलेले इतर नेते ज्याप्रमाणे सत्तारूपी राजकारणाच्या पटलावर चमकले, यशस्वी होत गेले, त्यासारखे यश सुब्रमण्यम स्वामींना आजतागायत मिळालेले नाही.


आजपर्यंतची १९ वर्षांची स्वामी यांची संसदेतील कारकीर्द आहे. चंद्रशेखर पंतप्रधान असताना सात महिने ते कायदा आणि वाणिज्य व उद्योग मंत्री होते. परंतु १९९९ ते २०१६ पर्यंत ते संसदेबाहेरच राहिले. पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा आणि ज्योतिषाने आपल्याला २००० मधेच आपण पंतप्रधान होऊ असे सांगितले आहे, असे जगजाहीर करणाऱ्या नेत्याचा सत्तेच्या परीघावर ठेवणारा राजकीय प्रवास अचंबित करणारा वाटू शकतो. यामागचे एक कारण म्हणजे लोकनेता होणे, हा स्वामींचा पिंड नाही. त्यामुळे लोकांमधे जाऊन लोकांचे राजकारण स्वामींनी कधी केले नाही. १९९९ ची लोकसभा निवडणूक ते स्वबळावर जनता पक्षाकडून लढले आणि ज्या मतदारसंघातून १९९८च्या निवडणुकीत जयललिता यांच्या मदतीने ते निवडून आले. त्याच मतदारसंघात त्यांना केवळ १२ हजार मते मिळाली. दुसरे कारण म्हणजे, त्यांचा स्वभावदोष. त्यांचा स्वभाव इतका फटकळ आहे, की फटकळ शब्दही सौम्य वाटावा. त्यांच्याकडून केले जाणारे वैयक्तिक आरोप, हे बेबंद असतात. त्याला तारतम्याचे कुंपणच नसते. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ याला मान्यता असणाऱ्या भारताच्या राजकारणात असा स्वभाव म्हणजे, आत्मघातच! अजातशत्रू असणे किंवा पक्षांतर्गत प्रभावी गटाचा भाग असणे हे सत्तालाभाचे भारतातील एक सूत्र आहे. ‘अजातशत्रू’ हा शब्द स्वामींपासून कैक मैल दूर आहे. स्वामींनी राजकारणात शत्रू कमावले असे म्हणावे, अशी स्थिती आहे.
अमेरिकेतून भारतात परतल्यावर १९६९ पासून सुब्रमण्यम स्वामी भारतीय जनसंघाच्या संपर्कात होते. १९७७ मध्ये सत्ता आल्यानंतर स्वामी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील कडवटपणा वाढत गेला. वाजपेयी आपल्याला स्पर्धक समजत होते, त्यामुळे त्यांनी जनता सरकारच्या काळात आपल्याला वित्त राज्यमंत्रीपद मिळू दिले नाही, असा स्वामी आरोप करतात. तसेच १९८० मध्ये भाजपची स्थापना करताना वाजपेयींनी स्वामींसाठी पक्षाचे दरवाजे बंद ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबतीत वाजपेयींचा शब्द मोडला नाही. १९९८ मध्ये सुब्रमण्यम स्वामी जयललितांबरोबर आघाडी करून मदुराई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यावेळी जयललिता यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. परंतु या सरकारमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांना वित्त मंत्री करावे, या जयललिता यांच्या मागणीला वाजपेयींनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यावेळी ‘स्वामी हे चपराशी म्हणून ठेवण्याच्याही पात्रतेचे नाहीत’ असे उद्गार वाजपेयी यांनी काढल्याचे म्हटले जाते. कडवट वैर असण्याचा स्वामींना असा फटका बसला. हे वैर आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी वैयक्तिक पातळीवर नेले होते. अटलबिहारी वाजपेयी कसे स्त्रीलंपट आहेत, दारूचा त्यांना कसा शौक आहे. एकदा मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान असताना दारू पिण्यावरून वाजपेयींना कसे चारचौघात झापले होते आदी बदनामीकारक तपशीलांची चर्चा स्वामी सार्वजनिकरित्या करत राहिले. १९९९ मध्ये १३ महिने झाल्यावर वाजपेयी सरकार केवळ एका मताने कोसळले, त्यामागचे कारण सुब्रमण्यम स्वामीच! जयललिता व सोनिया गांधी यांना चहा पार्टीला एकत्र आणत अविश्वासदर्शक ठरावाची सहमती त्यांनी घडवून आणली.


२००५ मध्ये वाजपेयींचा पक्षातील प्रभाव ओसरू लागल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुब्रमण्यम स्वामींची दखल घेण्यास सुरुवात केली . त्या वर्षी तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी राम माधवांमार्फत निरोप पाठवून स्वामींना भेटायला बोलावले. त्यांना भाजप मध्ये प्रवेश मात्र एका तपानंतर २०१३ मध्ये मिळाला. स्वामींनी केवळ वाजपेयींनाच लक्ष्य केले असे नाही. २००० मध्ये ‘फ्रंटलाइन’ या पाक्षिकात त्यांनी ‘दी आरएसएस गेम प्लॅन’ शीर्षकांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एक दीर्घ लेख लिहिला. त्यात त्यांनी संघ ही फासिस्ट संघटना आहे व ती नाझींपेक्षाही भयानक आहे, अशा प्रकारची मांडणी केली होती. आता अर्थातच आपण त्या मतांशी सहमत नसल्याची भूमिका स्वामी घेतात. प्रश्न असा आहे की, हे सर्व माहीत असूनही संघाला सुब्रमण्यम स्वामी हवेहवेसे का झाले आहेत? यामागचे एक कारण म्हणजे, स्वामींचे उपद्रवमूल्य. आणि उपद्रवमूल्य हीच स्वामींची उपयुक्तता आहे. काँग्रेस पक्षाला उपद्रव पोचवण्याची पुरेपूर क्षमता सुब्रमण्यम स्वामी बाळगून आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघ-भाजपला सुब्रमण्यम स्वामी उपयुक्त आहेत. काँग्रेसला २०१४च्या निवडणुकीत युपीए सरकारची भ्रष्ट प्रतिमा असण्याचा जोरदार फटका बसला. ही भ्रष्ट प्रतिमा प्रामुख्याने कथित टूजी घोटाळ्यामुळे निर्माण झाली. टुजी घोटाळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका स्वामी यांनीच दाखल केली होती. या शिवाय सुब्रमण्यम स्वामी यांना नेहरू गांधी कुटुंबाचा असणारा तिटकारा संघ भाजपला उपयुक्त ठरणारी अशी गोष्ट आहे.
वस्तुत: राजीव गांधीशी स्वामींचे जवळचे संबंध होते. आणि त्यांच्याविषयी स्वामी आजही गौरोद्गार काढतात. परंतु जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी पराकोटीचा वैरभाव त्यांच्या बोलण्यात दिसतो . नेहरू गांधी परिवार देशविरोधी आहे, या परीवारातील कोणत्याही व्यक्तीने महाविद्यालयीन शिक्षण घेतेलेले नाही, सोनिया गांधीच्या वडिलाकडील कुटुंबाला सोविएत युनिअनच्या ‘केजेबी’ या गुप्तचर संस्थेकडून आर्थिक मदत मिळत होती, राहुल गांधी कोकेनचे सेवन करतात, ते बुद्धू आहेत पासून ते असंसदीय भाषेत बदनामीकारक वक्तव्ये सुब्रमण्यम स्वामी सर्रास करताना आढळतात.


मुळात, नेहरू-गांधी परिवाराविषयी सुब्रमण्यम स्वामींना इतका द्वेष का आहे?याचे एक कारण म्हणजे, असा द्वेष राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरतो आहे. दुसरे कारण इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेल्या प्रतिकूल अनुभवांमध्ये शोधता येते. आपली आर्थिक विचारधारा उजवी असल्यामुळे इंदिरा गांधींनी आपल्याला ‘आयआयटी’मधून बडतर्फ केले, असे आरोप स्वामी करतात. (नंतर न्यायाल्याने ही बडतर्फी अयोग्य ठरवली) आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधीविषयी वैमनस्य त्यांच्या मनात निर्माण झाले असावे. राजीव गांधींशी आपले संबंध घनिष्ट होते, असा दावा स्वामी करतात. बोफोर्समध्ये राजीव गांधीना लाभ मिळाला नाही, असेही ते म्हणतात. १९९९ पर्यंत सोनिया गांधींविषयी त्यांचे मत नकारात्मक नव्हते. परंतु वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होईल आणि आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी स्वामींना अपेक्षा होती. परंतु सुब्रमण्यम स्वामी यांच्या मते, बोफोर्स प्रकरणातील आरोपी क्वात्रोचीला वाचविण्यासाठी वाजपेयी व सोनिया गांधी यांच्यामध्ये सहमती झाली. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होऊ शकले नाही.त्यानंतर स्वामी बेछूटपणे सोनिया गांधींवर आरोप करताना दिसतात. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अडचणीत आणू शकेल, अशा ‘नेशनल हेराल्ड’ प्रकरणातील याचिका ही सुब्रमण्यम स्वामी यांनीच दाखल केली आहे. नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यापासून आजतागायत फेसबुक, ट्वीटर आदी समाजमाध्यमांवर सत्ताधारी पक्षाचे ट्रोल्स ज्याप्रमाणे गांधी-नेहरू परिवाराची बदनामी करताना दिसतात, ते पाहता सुब्रमण्यम स्वामी संघपरिवाराला उपयुक्त कसे ठरतात, हे लक्षात येते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुब्रमण्यम स्वामी उपयुक्त असण्याचे दुसरे कारण म्हणजे- हिंदुत्व. स्वामी हिंदुत्वाचा अत्यंत आक्रमक आणि तर्कशुद्ध वाटावा, असा प्रचार करतात. देश-परदेशातील इंग्रजी भाषेतून व्यवहार करणाऱ्या मध्यमवर्गीय भारतीयांमधे हिंदुत्वाला मान्यता मिळवून देण्याचे काम सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून होते आहे. ‘हिंदुज अंडर सीज : द वे आउट’ (२००६), ‘हिंदुत्व अँड नेशनल रेनासन्स’ (२०१०) ‘विराट हिंदू आयडेनटीटी : कनसेप्ट अँड पावर’ (२०१३) या पुस्तकांतून त्यांनी हिंदुत्व संदर्भातील आपली भूमिका विशद केली आहे . ज्यांची पितृभूमी, पुण्यभूमी भारत आहे, ते सर्व हिंदू -अशी मांडणी वि. दा. सावरकर यांनी केली. स्वामी याच मांडणीला प्रमाण मानतात. जे मुस्लिम आपले पूर्वज हिंदू आहेत, हे स्वीकारतील त्यांचा ‘बृहद हिंदू समाजात’ म्हणजेच हिंदुस्थानात स्वीकार केला जाईल. पण जे मुस्लिम हिंदूंना पूर्वज मानत नाहीत, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यायला हवा, असे ते बेधडकपणे म्हणतात. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे, भारतात धर्मांतर प्रतिबंधित करणारा कायदा लागू करावा, समान नागरी कायद्याची अंमलबजवानी सुरु करावी, काशी विश्वनाथ मंदिरातील मशिदीसह इतर ३०० मंदिर परिसरातील मशिदी हटवाव्यात, ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे, जम्मू आणि काश्मीर ला विशेष अधिकार देणारे घटनेतील कलम ३७० रद्द करावे, आणि माजी सैनिकांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करावे व पंडितांसाठी ‘पनून काश्मीर’ची निर्मिती व्हावी, अशा स्वरुपात स्वामी मनातले हिंदुत्व प्रकट करतात.


२०११ मध्ये ‘दहशतवादाचा खात्मा कसा करावा’ या विषयावर त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात लेख लिहिला. त्यात मुस्लिमांविषयी अत्यंत कडवट भाष्य त्यांनी केले. त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाने सुब्रमण्यम स्वामी विद्यापीठात शिकवत असलेले दोन कोर्सेस रद्द केले. प्राचीन काळाचे गौरवीकरण करणे, हे हिंदुत्ववाद्यांचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते सुब्रमण्यम स्वामी यांनाही लागू आहे. संस्कृत भाषेचेही गौरवीकरण स्वामी करतात. मातृभाषेशिवाय संस्कृत भाषेची सक्तीची हवी, असा ते आग्रह धरतात. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’साठी सर्वात लाभदायक भाषा संस्कृत आहे, असा ‘नासा’च्या संशाधनाचा दाखला ते देतात. तमिळ या आपल्या मातृभाषेतील ४०% शब्द हे संस्कृत आहेत, असा ते दावा करतात. हिंदी भाषा बोलताना ती अधिकाधिक संस्कुतप्रचुर बोलायला हवी, असा आग्रह धरतात. द्रविड आणि आर्यन असा कृत्रिम भेद ब्रिटिशांनी आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी तयार केला, अशी मांडणी करत द्रविड अस्मिता हिंदुत्वात गुंफण्याचा चलाख प्रयत्नही ते करतात. कोणतीही गोष्ट सुब्रमण्यम स्वामी सुलभ , मुद्देसूद आणि आग्रही पद्धतीने मांडतात. त्यांची हिंदुत्वाची मांडणीसुद्धा अशीच आहे . त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांमध्ये स्वामी विशेष लोकप्रिय आहेत. एवढे नव्हे तर नरेंद्र मोदींनंतर आपणच लोकप्रिय आहोत, असा दावाही स्वतः सुब्रमण्यम स्वामी वारंवार केला आहे.
कुशाग्र बुद्धिमता हे सुब्रमण्यम स्वामींचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे वडील सीताराम सुब्रमण्यम भारतीय सांख्यिकी सेवेत होते.ते गणितामध्ये पारंगत. त्यांच्या सल्ल्यावरून सुब्रमण्यम स्वामींनी गणित या विषयात दिल्लीतील ‘हिंदू कॉलेज’मधून पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी कलकत्ता येथील भारतीय सांख्यिकी संथेत प्रवेश घेतला. त्याचे प्रमुख पी. सी. महालनोबीस होते. नेहरूंच्या विश्वासातले हे तेच महालनोबीस, ज्यांनी पंचवार्षिक योजनेचे प्रारूप बनवले. मात्र पी. सी. महालनोबीस आणि सीताराम सुब्रमण्यम यांच्यामध्ये वैर होते. त्यामुळे महालनोबीस आपल्याला कमी गुण देत असा स्वामींचा आरोप असतो. एकदा महालनोबीस यांचा ‘इकोनेमीट्रिका’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधनात्मक लेख छापून आला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या गणिताच्या ज्ञानाचा वापर करून तो लेख तीनशे वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या, लोरेंझ संशोधानमधून कसा उचलला आहे, हे दाखवून दिले. स्वामींचा प्रतिवादही या जर्नल मधून छापून आला. त्यावेळी त्यांचे वय २२ होते. ज्यांनी स्वामींच्या लेखाचे मूल्यमापन केले, ते रेफ्री हार्वर्ड विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. त्यांनी स्वामींना हार्वर्ड विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी निमंत्रित केले. आणि रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवत स्वामींनी हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला. हार्वर्ड मध्ये असतानाच त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते पॉल सॅम्युअलसन आणि सायमन कुझनेट्स यांच्याबरोबर संशोधनात भागीदारी केली . स्वामींनी त्यांच्या ‘इंडेक्स नम्बर्स’ सिद्धांतावर अधिक काम केल्यास त्यांनाही नोबेल पारितोषिक मिळेल, असे हे दोन्हीही विजेते म्हणाल्याचे स्वामी सांगतात. पण त्यानंतर स्वामींची जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर हार्वर्डमधेच भेट झाली. आणि जेपींच्या सांगण्यावरून ते भारतात परतले. उलट्या दिशेच्या प्रवासाला तिथून सुरुवात झाली.


हे तर उघडच आहे की, आर्थिक धोरणांच्या बाबत सुब्रमण्यम स्वामी उजव्या विचारांचे ठरतात. भारताचा आर्थिक वाढीचा दर ३.५% होता. तो १०% शक्य आहे. त्यासाठी राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण हटवायला हवे, अशी भांडवलशाहीपूरक मांडणी स्वामी भारतात परतल्यानंतर करू लागले. १९७१ मध्ये त्यांनी ‘इंडियन इकोनॉमिक प्लॅनिंग - ऑल्टरनेटिव्ह अप्रोच’ हे पुस्तक लिहिले. तो ‘गरिबी हटावो’ चा काळ होता. त्याच काळात पुढे इंदिरा गांधींनी ‘समाजवाद’ हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करून घेतला. सुब्रमण्यम स्वामी यांच्या आर्थिक मांडणीची इंदिरा गांधींनी ‘अवास्तव कल्पना असणारे सान्ताक्लॉज’ असे म्हणत संसदेत दखल घेतली. पुढे १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर भारताने आर्थिक सुधारणा सुरु केल्या. त्याची ब्लू प्रिंट आपणच बनविली होती, असे स्वामी सांगतात. त्यापूर्वी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात वाणिज्य मंत्री असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यापार धोरणातील सुधारणेस सुरवात केली होती. पी .व्ही. नरसिंहराव यांनीही ‘कमिशन ऑफ लेबर स्टॅंडर्ड्स अँड इंटरनॅशनल ट्रेड’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुब्रमण्यम स्वामींकडे दिली. त्यामुळे आर्थिक सुधारणा काळात स्वामींचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान होते, हे निश्चित. नरसिंहराव यांच्यानंतर हा आर्थिक सुधारणांचा गाडा स्वामींना पुढे न्यायचा होता म्हणूनच १९९८च्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना वित्तमंत्रीपद हवे होते. २०१४ नंतर देखील आपली वित्तमंत्रीपदाची आशा त्यांनी लपवून ठेवलेली नाही. आपल्याला मंत्रीपद मिळणार हे शपथविधीच्या आदल्या दिवशी सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्ष नाव घोषित झाले नाही, असा दावा सुब्रमण्यम स्वामी करतात.


आर्थिक नीतीबाबत सुब्रमण्यम स्वामींची स्वतःची म्हणून एक दृष्टी आहे. ते मुक्त बाजारपेठेचे समर्थक आहेत. परंतु मुक्त बाजापेठेचे सूत्र आपल्या स्वदेशी गरजा लक्षात घेत लागू करायला हवे, असे ते म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, किरकोळ विक्री क्षेत्रात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत (एफडीआय) त्यांची भूमिका. अशा गुंतवणुकीला स्वामी विरोध करतात. २% व्याजदराने वित्त घेऊन आलेल्या परकीय गुंतवणूकदारांसमोर १२-१५% व्याजदराने वित्त घेणारे स्वदेशी स्पर्धक टिकू शकत नाहीत, असा ते प्रतिवाद करतात. त्याचप्रमाणे ‘एअर इंडिया’ या हवाई वाहतूक करणाऱ्या सरकारी कंपनीच्या निर्गुंतवणुुकीलाही सुब्रमण्यम स्वामी विरोध करतात.


आयकर पूर्णतः हटवायला हवा, या ठाम मताचे सुब्रमण्यम स्वामी आहेत. ही मध्यमवर्गाला भावणारी मागणी आहे .१०% आर्थिक विकास दर १० वर्षे झाल्यास भारत चीनला मागे टाकेल असे भाकीत स्वामी करतात. उद्योगांना विशेषतः मध्यम व लघु उद्योगांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे असे, म्हणतात. त्यामुळेच रघुराम राजन ‘आरबीआय’ चे गवर्नर असताना स्वामींनी राजन यांच्यावर अनिर्बंध शाब्दिक हल्ला चढवला होता. राजन यांचे व्याजदर वाढवण्याचे धोरण हे मध्यम व लघु उद्योगांना उध्वस्त करणारे आहे, असे म्हणत त्याच्या अर्थतज्ज्ञ असण्यावर आणि भारतीय असण्यावरच स्वामींनी शंका उपस्थित केली होती. तसाच हल्ला आता ते वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर करताना दिसतात. जेटली यांना अर्थशास्त्र कळत नाही, त्यांनी कोट व टाय घालू नये ते बट्लर (घरातील मुख्य सेवक) सारखे दिसतात अशा वक्तव्यांनी जेटलींना स्वामींनी हैराण केले आहे. मोदींनी ज्या योजनेचं महाउत्सवी थाटात ऐन मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधून उद््घाटन केलं, त्या जीएसटीला स्वामींनी कडाडून विरोध केला. जीएसटीच्या अकार्यक्षम अंमलबजावणीसाठी ते जेटलींना दोषी धरतात. त्याचप्रमाणे नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, हे अधोरेखित करताना त्यासाठी योग्य नियोजन न करण्याचा ठपका, ते जेटलींवर ठेवतात. जेटलींविषयी सुब्रमण्यम स्वामींमध्ये वैरभाव असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमधून स्वामींना भाजपची उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. ही उमेदवारी जेटलींमुळे त्यांना मिळू शकली नाही, असा वहीम होता. स्वामींचा मंत्रिमंडळातील समावेश न होण्यासही जेटलीच जबाबदार होते, अशीही त्या वेळी खमंग चर्चा होती.


सत्तरच्या दशकात सुब्रमण्यम स्वामींनी भारत आणि चीन यांच्या १९५२-१९७० मधील आर्थिक विकास दर वाढीवर तुलानात्मक अभ्यास प्रसिध्द केला . राज्यनियंत्रित अर्थव्यवस्था असल्यामुळे दोन्ही देशांचा विकास दर सारखाच असल्याचा निष्कर्ष त्यांनी यामध्ये काढला . १९८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून सॉफ्ट लोन मिळवताना चीनने सुब्रमण्यम स्वामींच्या अभ्यासाचा आधार घेतला. स्वामींचे चिनी भाषेवर प्रभुत्व आहे. चिनी भाषा शिकण्यास अत्यंत अवघड मानली जाते. स्वामींना एका वर्षात ही भाषा शिकण्याचे आव्हान मिळाले असता, त्यांनी केवळ ३ महिन्यांमध्ये ही भाषा अवगत केली. १९८१ ला इंदिरा गांधींनी स्वामींना तत्कालीन चीनचे राष्ट्राध्यक्षांच्या भेटीस पाठवले होते. त्यांच्या या भेटीनंतर कैलास मानसरोवरच्या यात्रेचा मार्ग चीनने खुला केला .


इस्राइल व भारतामध्ये घनिष्ट संबंध असावेत, या मताचे सुब्रमण्यम स्वामी आहेत . १९८२ सालीच इस्राइलला राजकीय भेट देणारे ते पहिले राजकारणी / खासदार ठरले. आज दोन्ही देशांमध्ये जवळीक निर्माण झालेली दिसून येते. सुब्रमण्यम स्वामी शिक्षणाने अर्थतज्ज्ञ व गणिततज्ज्ञ आहेत. परंतु बऱ्याच लोकांना ते सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत, असे वाटते. त्याचे कारणही तसे आहे. आजतागायत ७५ पेक्षा अधिक खटले त्यांनी न्यायालयात लढले आहेत. त्यांना वकील न ठेवता वकिली करायला लावण्याचे, श्रेय राम जेठमलानी यांना जाते. १९८२ ला जेठमलानी यांनी स्वामींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यावेळी इतर कोणी त्यांच्याबाजूने लढायला तयार नव्हते. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी स्वतः स्वतःची केस लढले. त्यात विजयी झाले. त्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. जयललिता यांनी मुख्यमंत्री असताना तब्बल १०० मानहानीचे खटले त्यांच्याविरोधात दाखल केले होते. आजतागायत सर्व मानहानीच्या खटल्यांमधून ते निर्दोष सुटले आहेत. याशिवाय जनहित याचिकांच्या माध्यमातून त्यांचा न्यायालयाशी संबंध आला. जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झाली, त्याची तक्रार स्वामींनीच दाखल केली होती. ‘टुजी’ प्रकरण, पी. चिदंबरम यांना अडचणीत आणणारे एअरसेल-माक्सिस प्रकरण, नेशनल हेराल्ड प्रकरण, राम सेतू, अयोध्या येथील राम मंदिर अशा कितीतरी प्रकरणातील याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनीच दाखल केल्या होत्या वा आहेत. यातील बहुतेक प्रकरणे ही भ्रष्टाचारासंबंधी आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून भ्रष्टाचारासंबधी प्रकरणे तडीस लावण्याचे इतके व्यापक काम इतर कोणी केलेले दिसत नाही.
खरे तर भारतीय मानिसकता ओळखूनच सुब्रमण्यम स्वामी हे आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप आणि चारित्र्यहनन या दोन पातळ्यांवर अत्यंत निर्दयीपणे राजकारण खेळत आले आहेत. तरीही स्वामी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, हेही नाकारता न येणारे वास्तव आहे. अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, प्राचीन इतिहास, धर्म, भ्रष्टाचारविरोधी लढा, न्यायालय, राजकारण अशा व्यापक पटलावर त्यांचा वावर आहे. त्यांनी अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित ते दावा करतात, तसा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारही त्यांना मिळाला असता. पण अंतःप्रेरणेने (इंस्टिक्टिवली) जगणारा हा माणूस आहे.


जयप्रकाश नारायण यांच्या एका शब्दावर ते भारतात परतले. संघर्ष हा स्वामींचा स्थायीभाव आहे. भगवद् गीतेतील कर्मसिद्धांतवर त्यांची श्रद्धा आहे. हा आपला मित्र नसला, तरी हरकत नाही, पण शत्रू नको अशी त्यांच्याविषयी इतर राजकारण्यांची भावना आहे. उघड बदला घेण्याची त्यांची वृत्ती ‘सिसिलियन’( इटलीतल्या सिसिली प्रांतातून अनेक माफिया जन्मले त्या अर्थाने)या विशेषणानेच अधोरेखित होऊ शकते. बोलण्यातील बेछुटपणा इतका की स्वामींची त्यांचे लाडके अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशीच स्पर्धा होऊ शकेल. विरोधाभासांनी त्यांचे व्यक्तिमत्व पुरेपूर व्यापले आहे. त्यामुळे जयललितांचे ते कधी मित्र झाले, तर कधी शत्रू. हिंदुत्वाची त्यांची मांडणी कधी संघापेक्षाही कट्टर, मुस्लिमांविषयी त्यांची मते इतकी कडवट तरीही त्यांचा एक जावई मुस्लिम आहे आणि त्यांची स्वतः ची पत्नी पारसी आहे. राजकारणातील दीर्घ प्रवासात त्यांना सत्तापदांनी वंचित ठेवले. आताही संघ भाजपशी असणारे त्यांचे सख्य त्यांना मंत्रिपदापर्यंत घेऊन जाईल, का याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. परंतु आणीबाणीनंतरच्या काळात बदलत गेलेले अर्थकारण आणि परराष्ट्र धोरण, हिंदुत्वाचा वाढत गेलेला राजकीय प्रभाव , राज्यसंस्थेला उत्तरदायी बनवण्यासाठी वाढत गेलेला नागरी समाजाचा दबाव या आयामांची चर्चा मात्र सुब्रमण्यम स्वामी हे नाव वगळून होऊ शकणार नाही, हे निश्चित. यू मे लव्ह स्वामी, यू मे हेट स्वामी, बट यू काण्ट इग्नोर स्वामी!

[email protected]

X
COMMENT