आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहेश रामदासी
शिर्डीत साईबाबांच्या माहात्म्याएवढेच तेथील अर्थकारणावर राजकीय नेत्यांचे जास्त लक्ष असते. ताेच 'प्रसाद' पाथरीपर्यंत यावा, असा उद्देश परभणीकर नेत्यांचाही असावा.
एकीकडे गुलाबी थंडीच्या अाल्हाददायक वातावरणाचा अानंद मराठवाडा घेत असताना परभणी जिल्ह्यातील पाथरी या छाेट्याशा शहरातील वातावरण मात्र तापलंय... संपूर्ण विश्वाला श्रद्धा अन् सबुरीचा संदेश देणारे साईबाबा 'तुमचे की अामचे..' हा वाद त्यामागचं कारण... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाथरीला १०० काेटींचा विकास निधी जाहीर करताना हे स्थळ साईबाबांचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख केला अन् शिर्डीकरांचा पारा चढला. त्यांचा अाक्षेप १०० काेटींना नाहीच. अायुष्यभर फकिराप्रमाणे जगलेल्या बाबांच्या नावावर राेज लाखाे-काेटींची कमाई करणाऱ्या शिर्डी संस्थानसाठी ही रक्कम म्हणजे 'दर्या में खसखस.' मात्र, मुख्यमंत्र्यांनीच पाथरीला जन्मस्थान जाहीर केल्याने शिर्डीचे महत्त्व कमी हाेईल, अशी धास्ती तेथील 'संस्थानिकां'ना वाटू लागलीय. म्हणूनच त्यांनी बंद पुकारला. त्यांना समर्थन देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवत मुख्यमंत्र्यांना अापले शब्द मागे घ्यायला भाग पाडले. यातूनच सरकारदरबारीही असलेले शिर्डीचे 'माहात्म्य' लक्षात येते.
नगरच्या नेत्यांचा हा कित्ता अाता परभणीचे नेतेही गिरवत अाहेत. खरे तर वर्षानुवर्षे दुष्काळ, टंचाईचे संकट झेलणाऱ्या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पक्षीय मतभेद विसरून अशी एकी या नेत्यांनी कधीच दाखवल्याचे स्मरणात नाही. मात्र जर नगरचे नेते धार्मिक श्रद्धेचे राजकारण करून अापली पाेळी भाजून घेत असतील तर अापणही त्यात मागे का राहावे, असा विचार करून परभणी, पाथरीच्या नेतेमंडळींनीही या वादात उडी घेतलीय. शिर्डीत साईंच्या माहात्म्याएवढेच तेथील अर्थकारणावर राजकीय नेत्यांचे जास्त लक्ष असते. ताेच 'प्रसाद' पाथरीपर्यंतही यावा, असा उद्देशही परभणीकर नेत्यांचा असावा. बरं, या वादात अाता बीडकरांनीही उडी घेतली. म्हणे-साईबाबा अामच्या गावात नाेकरीला हाेते, अाम्हालाही १०० काेटींचा विकास निधी द्या. या दाव्याखातर त्यांनीही पुरावे दिले. पैठण तालुक्यातील धुपखेडा हे गावही साईंची प्रकटभूमी मानले जाते. या छाेट्याशा गावालाही अाता १०० काेटींचा विकास निधी हवाय.
एकूणच काय, तर साईबाबांच्या नावावर सरकारकडे विकास निधी मागण्याची जणू अाता स्पर्धाच लागलीय. तिजाेरीत खडखडाट असलेले सरकार ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याची खात्री सर्वांनाच अाहे. मात्र अशा दाव्यांमुळे प्रसिद्धी मिळते, हे कळून चुकले अाहे. म्हणूनच साईंच्या वास्तव्याने पुनीत झालेली अजूनही काही गावे या स्पर्धेत उतरली तर अाश्चर्य वाटायला नकाे.
नगर जिल्ह्याशी मराठवाड्याचा वाद नवा नाही. यापूर्वीही पाण्याच्या मुद्द्यावरून या दाेन्ही विभागांचे तंटे काेर्टकचेऱ्यापर्यंत गेले. एकीकडे मराठवाडा दुष्काळाने हाेरपळून निघत असताना नगरचे नेते मात्र तिकडे जाणारे हक्काचे पाणी राेखून अापल्या चाऱ्या, कालवे भरभरून घेत हाेते, हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी पक्षीय गटतट विसरून एकीही दाखवत हाेते. मराठवाड्यातील नेत्यांमध्ये मात्र जनतेच्या प्रश्नावर अशी एकी कधी दिसली नाही, हे दुर्दैव. 'भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी व गरजूंना कपडे द्या, तरच देव तुम्हाला प्रसन्न हाेईल,' ही साईबाबांची शिकवणही दुष्काळाच्या काळात नगरकर नेतेमंडळी विसरलेली दिसली. साईबाबांच्या नावावरच अाज शिर्डीचे संपूर्ण अर्थकारण चालते. भाविकांच्या दानामुळे संस्थानच्या तिजाेऱ्या तुडुंब भरल्या आहेत. काही सामाजिक कामेही या संस्थानमार्फत चालवली जातात. मात्र, याच तिजाेऱ्यांच्या जिवावर येथील राजकीय मंडळी 'संस्थानिक' झालीय हे अाता लपून राहिलेले नाही. 'तुम्ही जर धनाढ्य असाल तर कृपाळूही बना, ज्या झाडांना फळे लागतात ते वाकतेच...' ही शिकवणही बाबांचीच. त्याचाही या संस्थानिकांना विसर पडलाय, असे या वादाच्या निमित्ताने दिसून येते. 'मी फक्त शिर्डीचा आहे, असे ज्यांना वाटते, त्या लाेकांना अजून मी उमजलेलाेच नाही,' असे साईबाबा त्या काळी सांगत असल्याचे त्यांच्याशी संबंधित काही साहित्यात नमूद अाहे. किमान या वादाच्या पार्श्वभूमीवर तरी बाबांची ही शिकवण शिर्डीकरांना उमजण्याची सद्बुद्धी यावी, एवढीच यानिमित्ताने साईचरणी प्रार्थना.
महेश रामदासी
mahesh.ramdasi@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.