आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर आझादांची मुंबईतील सभा रद्द, पुण्याला जाण्यासही बंदी, भीम आर्मीच्या 400 कार्यकर्त्यांची धरपकड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नयेत, म्हणून मुंबई पोलिसांनी 300 ते 400 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद यांना पुण्याला जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी येथील पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही सभा होणारच असा निर्धार भीम आर्मीने केला होता.

 

दरम्यान, हॉटेल मनालीच्या 500 मिटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील सर्व पोलिस स्टेशन हायअलर्ट देण्यात आला आहे.

 

चंद्रशेखर आझाद यांना अज्ञातस्थळी हलविले..

चंद्रशेखर आझाद मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सभा घेऊ नये म्हणून पोलिस आम्हाला ताब्यात घेत आहेत, अशी माहिती भीम आर्मीकडून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मनाली हाॅटेल परिसर व आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

 

भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनील गायकवाड, मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड.सचिन पट्टेबहादूर, अॅड.अखिल शाक्य (सोलापूर) प्रवीण बनसोडे (बुलडाणा) यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हाॅटेल येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भीम आर्मीच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची शनिवारी (ता.29) रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता सभा होणार होती.

 

'आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे', चंद्रशेखर यांचा व्हिडिओ व्हायरल..
पोलिसांनी आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. मोदी सरकारने हे युद्ध सुरु केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशाराही चंद्रशेखर यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.

 

असा होता चंद्रशेखर आझाद यांचा नियोजित कार्यक्रम..

- पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता

- 30 डिसेंबरला पुण्यात सभा

- 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान

- 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

- 2 जानेवारीला लातूर येथे सभा

- 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा

 

बातम्या आणखी आहेत...