आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांचीही साक्ष नोंदवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - कोरेगाव भीमा प्रकरण हे पूर्वनियोजित आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिंब्यानेच झाले अाहे. या प्रकरणामध्ये सर्व सत्यस्थिती समोर येण्यासाठी आणि प्रकरणाचा भंडाफोड होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी आयोगासमोर साक्ष घेण्याची मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता श्रीमंत कोकाटे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. 

 

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता श्रीमंत कोकाटे हे कळमनुरी येथे आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली मते मांडली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप सरकारमुळे भारतातील सीबीआय, आरबीआय सारख्या स्वायत्त संस्था धोक्यात आल्या असून यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊन देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे चालू आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार हे कट्टर हिंदुत्ववादी सरकार असून हे सरकार केवळ धार्मिकता पसरवण्याचे काम समाजात करीत आहे, आरोपही कोकाटे यांनी केला. कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मनोहर भिडे यांना अटक न करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. यावरून या सरकारची नीतिमत्ता काय आहे हे स्पष्ट होते, असेही कोकाटे यांनी नमूद केले. भीमा कोरेगाव प्रकरण हे पूर्वनियोजित आणि अतिगंभीर असून या घटनेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचाही पाठीमागून सक्रिय सहभाग होता. त्यामुळे फडणवीस यांचीही चौकशी आयोगासमोर साक्ष घेण्याची गरज कोकाटे यांनी व्यक्त केली. 

 

त्यांना राज्यघटना उलथवून लावायची आहे 
देशाची स्थिती पाहता देशात विविध राज्यांत जातीयवाद, धार्मिकता निर्माण करणारे सरकार असून या सरकारांना राज्यघटना उलथवून लावायची आहे. परंतु या मानसिकतेच्या विरोधात लढण्याची जबाबदारी फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयायांची असून त्यासाठी या अनुयायांनी वेळप्रसंगी दोन हात तयार करण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. 

 

रामजन्मभूमीच्या वादात कोणीच पडू नका 
राम जन्मभूमी अयोध्या प्रश्नावर कोकाटे म्हणाले, की रामजन्मभूमीचा मुद्दा हा वादाचा मुद्दाच नाही. मुळात रामायण हे काल्पनिक असून हिंदुत्ववादी लोक मतांच्या राजकारणासाठी त्याचा फायदा घेत आहेत. रामायण काल्पनिक असेल तर राम कुठून आला आणि रामजन्मभूमी कुठून आली असा सवालही कोकाटे यांनी केला. त्यामुळे छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने शिवसेना-भाजपच्या रामजन्मभूमीच्या राम मंदिराच्या आंदोलनात न पडण्याचे आवाहनही कोकाटे यांनी केले. 

 

बातम्या आणखी आहेत...