Kolhapur Rain / भीमा-कृष्णाचा प्रकोप ; नदीखोऱ्यात पुराचे थैमान, कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, प्रथमच नौदलाला पाचारण

पंढरपूरमध्ये २.६० लाख  क्युसेकने चंद्रभागेत पाणी, 

दिव्य मराठी

Aug 08,2019 07:49:00 AM IST

सांगली/ कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा व भीमा नदीखोऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने पुणे विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. कोल्हापूर आता फक्त वायुमार्गानेच संपर्क क्षेत्रात आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांतून वाहणाऱ्या कृष्णा, कोयना व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात अतिवृष्टी सुरूच आहे. कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर व वाई, सातारा जिल्ह्यातील भागात पाऊस पडत असल्याने कराड येथील कृष्णा-कोयना संगमापासून पुढे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पुराच्या पाण्यात आहे. मात्र, हवामान खात्याने १० ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले असून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी विमानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने पाण्याचा विसर्ग वाढवल्यास पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली.

कोल्हापुरात ४० बोटी, १६६ जवान बचावकार्यात तैनात
सांगली जिल्ह्यात ३ बचाव पथकांतील ९४ जवान ११ बोटींसह बचावकार्य करत आहेत. सातारा जिल्ह्यातील फक्त एका बचाव पथकातील १२ लोक २८ बोटींसह लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. सर्वाधिक पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ७ बचाव पथकांचे १६६ जवान ४० बोटींच्या साहाय्याने लोकांना मदत करत आहेत. मात्र, रस्तेमार्गाने जगाशी संपर्क तुटल्याने कोल्हापुरात नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे.

महामार्गावर ५ हजारहून अधिक ट्रक, इतर वाहने अडकली
महामार्गावर ५ हजारहून अधिक मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १२९ गावांतील ३५ हजार ५१४ लोकांचा संपर्क तुटला आहे.

भीमाकाठच्या ७७४९ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील १० हजार वीज रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बंद पडल्याने २ लाख ५६ हजार ७९५ नागरिक अंधारात आहेत. त्यांना मेणबत्त्या व तत्सम साहित्य पुरवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुणे जिल्ह्यातील १३,३३६, सातारा ६२६२, सांगली ५३,२२८, तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणी सोडल्याने भीमा नदीकाठच्या ७,७४९ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रतिव्यक्ती १० किलो तांदूळ व १० किलो गहू, अन्न पाकिटे दिली आहेत.


महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकले
नवी दिल्ली | पावसाच्या बाबतीत महाबळेश्वरने सलग दुसऱ्या वर्षी चेरापुंजीला मागे टाकले आहे. यंदा एक जून ते सहा ऑगस्टपर्यंत महाबळेश्वरमध्ये ५७५५ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजी येथे ५१८४ मिमी पाऊस झाला आहे.

X