आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले होण्यासाठी स्मशानातील राख देणारा भोंदूबाबा गजाआड, अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीने गुन्हे शाखेची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुलगा होण्यासाठी तसेच मुलींना वश करण्यासाठी जादुटोणा करत स्मशानातील राख देणाऱ्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील भोंदूबाबासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. बबन सीताराम ठुबे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

जादुटोणा करत तसेच आपण डॉक्टर असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करणाऱ्या ठुबे याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तक्रार दिली होती. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे येथील कार्यकर्ते अश्विन जनार्धन भागवत यांनी स्वत: पोलिस अधीक्षक शर्मा यांची भेट घेतली होती. शर्मा यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पुढील कारवाईचे आदेश दिले.


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना बनावट ग्राहक बनून या भोंदूबाबाकडे पाठवले. कान्हूर पठार येथील त्याच्या घरी छापा टाकला असता काळ्या बाहुल्या, पंचांगणचे चित्र, एक स्टेथेस्कोप, पांढऱ्या कवड्या, काळे बिबे, आक्रोड, लाल-पिवळा दोरा, अश्वगंध पावडर, त्रिफळा चूर्ण असे जादूटोण्याचे साहित्य मिळून आले. अश्विन भागवत यांच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा ठुबे याच्यासह त्याचे साथीदार लताबाई बबन ठुबे, विजय बबन ठुबे, सुनीता खोडदे, रोहिणी खोडदे, माधव सोनावळे, अण्णा सोनावळे (सर्व कान्हूर पठार) यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ४२० सह जादूटोणा कायदा कलम २ (२), २ (१०) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, मोहन गाजरे, रवींद्र कर्डिले, सागर सुलाने, योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांनी ही कामगिरी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते भागवत यांच्यासह मनीषा म्हात्रे, अलका आरळकर यांनी पोलिसांना सहकार्य केले.

 

औषध म्हणून स्मशानातील राख
भोंदूबाबा ठुबे याने परिसरातील लोकांचा विश्वास संपादन केला होता. स्वत: डॉक्टर असल्याचे तो लोकांना सांगत होता. मुलगा होण्यासाठी, मुलगी नांदत नसल्याचे, तसेच मुलीला वश करण्यासाठी आपल्याकडे रामबाण औषध असल्याचे तो लाेकांना सांगत होता. जादूटोणा करत तो लोकांना स्मशानातील राख व कोळसा, तसेच इतर औषधे देत होता. मागील अनेक दिवसांपासून परिसरात या भोंदूबाबाची दुकानदारी सुरू होती.

 

तक्रारीची वाट न पाहता कारवाई हवी
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतरच पोलिस बुवाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतात. तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील अशा बुवाबाजीला बळी पडू नये, आपण विज्ञान युगात जगत असतानाही, असे प्रकार घडतात, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
- रंजना गवांदे, राज्य कार्यवाह, बुवाबाजी संघर्ष विभाग, अंनिस.

 

पोलिसांसाठी कार्यशाळा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पोलिसांसाठी सहा विभागात कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याबाबत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा झालेली आहे. जादुटोणा विरोधी कायदा, तसेच बुवाबाजीसंदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहती गवांदे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

 

बातम्या आणखी आहेत...