भाेपाळ वायुगळती शतकातील सर्वात भीषण, संयुक्त राष्ट्राचा अहवाल, माहिती; दरवर्षी कामादरम्यान २७.८ लाख लोकांचा मृत्यू

दिव्य मराठी

Apr 22,2019 11:01:00 AM IST

संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्राच्या अहवालात हजाराे लाेकांना मृत्यूच्या खाईत लाेटणाऱ्या १९८४ च्या भोपाळ वायुगळती घटनेला शतकातील सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे. दरवर्षी औद्योगिक ठिकाणच्या दुर्घटना किंवा कामादरम्यान झालेल्या आजारामुळे किमान २७.८ लाख कामगारांचा मृत्यू हाेतो, असा दावा अहवालाद्वारे करण्यात आला आहे.


संयुक्त राष्ट्राची कामगार संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलआे) द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क- ‘बिल्डिंग ऑन १०० इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स’ हा अहवाल जारी केला आहे. मध्य प्रदेशच्या राजधानीत युनियन कार्बाइड प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) गॅसची गळती होऊन किमान ६ लाखांहून अधिक मजूर व परिसरातील रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार १५ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. हजारो पीडित व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे. वायुगळतीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्तीचे नुुकसान झाले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१९१९ नंतर भोपाळ वायुगळती ही जगातील सर्वात भीषण वायुगळतीची घटना ठरते. १९१९ नंतर इतर नऊ आैद्योगिक घटनांमध्ये फुकुशिमा किरणोत्सर्ग तसेच ढाक्यातील राणा प्लाझा इमारत कोसळण्याच्या घटनांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे. व्यवसायाशी संबंधित विविध घटनांमागे तणााव, काम तसेच दीर्घकालीन कामाचा दबाव आणि आजारपण ही कारणे असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे. अहवालानुसार जगभरात ३६ टक्के कामगारांना आठवड्याला ४८ तासांहून जास्त वेेळ काम करावे लागत आहे.

हिरोशिमा-नागासाकीवरील बाॅम्बवर्षावापेक्षा १०० पट जास्त किरणोत्सर्ग युक्रेनच्या घटनेत
एप्रिल १९८६ मध्ये युक्रेनमध्ये एका वीज केंद्रावर चार अणुसंयंत्रांमध्ये स्फोट झाला होता. त्यातून नागासाकी व हिरोशिमावर करण्यात आलेल्या बाॅम्बवर्षावापेक्षा १०० पट जास्त किरणोत्सर्ग झाला होता. स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या किरणोत्सर्गाने मात्र हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. त्याशिवाय एप्रिल २०१३ मध्ये ढाक्यात राणा प्लाझा इमारत कोसळल्याने १ हजार १३२ जण मृत्युमुखी पडले होते.

X