आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या नियोजित वेळेपूर्वी २० मिनिटे आधी जंक्शनवर जावे लागणार, चारचाकीच्या पार्किंगमध्ये भूमिगत कॅमेरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ - आगामी काळात जंक्शनवरील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली जाणार आहे. त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्थेतून जाण्यासाठी प्रवाशांना रेल्वेगाडीच्या नियोजित वेळेपुर्वी २० मिनिटे आधी स्थानकावर यावे लागेल. तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगमध्ये भूमीगत कॅमेरे लावले जातील. दुचाकी पार्किंगदेखील भविष्यात भूमीगत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरपीएफचे वरीष्ठ आयुक्त अजय दुबे यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. 


मुंबईतील २६ / ११ च्या हल्ल्यानंतर रेल्वे प्रशानसाने एक समिती नियुक्त केली हाेती. त्या समितीच्या अहवालात देशातील २०२ रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्त करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशातील २०२ रेल्वे स्थानकांमध्ये विभागातील भुसावळसह सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विभागातील आठ रेल्वे स्थानकांची सुरक्षा अधिक कडक केली जाणार आहे. विमानतळावरील सुरक्षेव्यवस्थेप्रमाणे या स्थानकांवर सुरक्षेचे उपाय योजले जाणार आहेत. त्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा बलातर्फे नियाेजन केले जात आहे. डीआरएम आर.के.यादव आणि रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे यांच्यासह आरपीएफ अधिकाऱ्यांची गुरुवारी सुरक्षेसंदर्भात नियोजन बैठक झाली. रेल्वे स्थानकातील अतिसूक्ष्म नियाेजन करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. रेल्वे स्थानकात येणाऱ्या सर्व चोरवाटा बंद करण्याचे नियाजेन करण्यात आले. यापुर्वीदेखील चोरवाटा बंद केल्या आहेत. तरीही पुन्हा एकदा सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या दृष्टीने जळगाव मार्ग, नागपूर मार्ग आणि खंडवा मार्गावरील आऊटरवर पाहणी केली जाईल. या मार्गावरील आऊटरवर उतरणारे प्रवासी कुठे उतरतात, याचा शोध घेऊन चोरवाटांची माहिती काढली जाणार आहे. 

 

या स्थानकांचा समावेश 
भारतीय रेल्वेतील २०२ रेल्वे स्थानकांच्या यादीत भुसावळ विभागातील भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा या सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर मध्य रेल्वेतील नागपूर, पुणे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, ठाणे व कल्याण स्थानकांचाही समावेश केला आहे.  


संरक्षण भिंतींची उंची वाढवणार 
बैठकीतील नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांच्या परिसरातील संरक्षण भिंतींची उंची वाढवली जाणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग वगळता, अनावश्यक मार्ग बंद केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांचा येण्याचा आणि स्थानकातून बाहेर पडण्याचा मार्ग याचे नियोजन केले जाईल. 


स्कॅनरद्वारे होणार तपासणी

विमानतळावरील सुरक्षेव्यवस्थेप्रमाणे स्थानकांची सुरक्षा वाढवली जाईल. त्यामुळे स्थानकांच्या प्रवेशद्वारातच प्रवाशांच्या बॅगांची स्कॅनरद्वारे तसेच श्वान पथकाकडून तपासणी होईल. तसेच प्रवाशांना मेटल डिटेक्टरमधून जावे लागेल. यासोबत अन्य उपायांची सुरक्षा यंत्रणेकडून चोख पडताळणी केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना गाडीच्या नियोजित वेळेपुर्वी २० मिनिटे आधी स्थानकावर यावे लागेल. मध्य रेल्वेतील भुसावळ, मुंबई, नागपूर, पुणे आणि साेलापूर या पाचही विभागांमधील स्थानकांवर सुरक्षा वाढवली जाणार आहे. 


दुसऱ्या टप्प्यातील नियाेजन अशाप्रकारे 
दुसऱ्या टप्प्यात स्थानकाबाहेरील पार्किंगच्या सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. गरज पडल्यास दुचाकी पार्किंग अंडरग्राऊंड होऊ शकते. तसेच चारचाकी पार्किंगमध्ये भूमीगत कॅमेरे लावले जातील. चारचाकीच्या खाली स्फोटके लावून घातपात घडवण्याचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी, गाड्यांचे प्रवेशद्वारातच स्कॅनिंग केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रुम तयार केले जाणार असून, २४ तास आरपीएफ जवान लक्ष ठेवून असतील. 
 

बातम्या आणखी आहेत...