आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूषण गगराणी सर्वात श्रीमंत आयएएस, आयपीएसमध्ये संजयकुमार वर्मा अव्वल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मालमत्ता व संपत्तीचा तपशील दरवर्षी शासनास कळवणे बंधनकारक आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि प्रशासनातील कारभारात पारदर्शकता राहावी, हा या नियमामागचा हेतू आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध पळवाटा काढून मालमत्तेचा खरा तपशील दडवण्याकडेच बहुतांश आयएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा कल दिसून आला आहे. 


महाराष्ट्र केडरच्या आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) आणि आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे त्यांच्याच विवरणपत्रांवरून समोर आले आहे. ही विवरणपत्रे अधिकाऱ्यांच्या सहीनिशी केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग म्हणजे डीओपीटीच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेली आहेत.  


वर्ष २०१८-१९ मधील आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची शेवटची मुदत होती. महाराष्ट्र केडरच्या बहुतांश आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला. मात्र तो देताना मालमत्तेची सध्याची किंमत किंवा मूल्यही नमूद करणे आवश्यक आहे. मात्र अनेकांनी केवळ खरेदीची किंमत दिली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची संपत्ती नेमकी किती आहे, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही.


मालमत्ता खरेदीच्या किमती दिल्या, मात्र त्यांचे सध्याचे मूल्य नाही दाखवले नाही
मालमत्तांचा पुरेसा तपशील न दिलेले अनेक अधिकारी आहेत. उदा. प्रताप दिघावकर यांनी १३ मालमत्तांच्या तपशिलांत बहुतांश मालमत्ता या पत्नी व स्वत:च्या नावे, तर एका मालमत्तेच्या तपशिलात भावंडांसह सहमालकी असल्याचे नमूद केले. मात्र एकाही मालमत्तेची खरेदीच्या वेळची किंमत व सध्याचे मूल्य याचा उल्लेख नाही. परिणामी, अशा अधिकाऱ्यांच्या एकत्रित मालमत्तेची किंमत काढता आलेली नाही.


काय आहे कायदा
- सनदी अधिकाऱ्याने मालमत्तेचा तपशील जाहीर करण्यासंबंधी भारतीय प्रशासकीय सेवा नियमावली १९६८ हा कायदा अस्तित्वात आहे. 
- नियम १६(२) नुसार प्रत्येक अधिकाऱ्याने नियमितपणे आयकर भरणे आवश्यक आहे. {आपल्या किंवा आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील दरवर्षी जाहीर करणे आवश्यक आहे.  


सीएमच्या मर्जीतील अधिकाऱ्यावर बड्या दूरसंचार कंपनीचे कृपाछत्र?
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एका बड्या आयएएस अधिकाऱ्याने मोबाइल कंपनीच्या टॉवरसाठी ४०० वर्गमीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे तब्बल ११ भूखंड अगदी नाममात्र किमतीत खरेदी केले. ते सर्व त्याने दूरसंचार क्षेत्रातील बड्या कंपनीचे टॉवर उभारण्यासाठी तगड्या दराने भाड्याने देत कोट्यवधींच्या कमाईची साेय लावली आहे. 


हे आहेत पाच श्रीमंत आयएएस अधिकारी 
1. भूषण गगराणी
, प्रधान सचिव, सीएमओ (1990 मध्ये रुजू) 15.97 कोटी रुपये
९ मालमत्ता : मुंबईत २, नवी मुंबईत १ सदनिका. मुंबईत १ गाळा. ४ भूखंड व कोल्हापुरात वडिलोपार्जित घर. 
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या नावे, काही पत्नी, बहीण, आई आणि मुलासह सहमालकी आहे.


2. प्रवीण दराडे अतििरक्त अायुक्त, मुंबई मनपा (1998 पासून सेवेत) 13.49 कोटी रुपये
एकूण १५ मालमत्ता : १४ भूखंड आणि १ व्यावसायिक वापरासाठीचा गाळा. पैकी २ भूखंड वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिश्शापोटी मिळाले. 
मालकी : सर्व मालमत्ता त्यांच्या स्वत:च्या नावे आहेत.


3. प्रवीणसिंह परदेशी अतिरिक्त मुख्य सचिव, सीएमओ (1985) 12.5 कोटी रुपये
६ मालमत्ता : परदेशात १, पुण्यात २ आणि मुंबईत १ सदनिका आहे. मध्य प्रदेश व सोलापुरात २ भूखंड. 
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या तर काही पत्नीच्या नावे आहेत. 


4. व्ही. राधा सहसचिव, स्वच्छता मंत्रालय (1994) 11.42 कोटी रुपये
६ मालमत्ता : मुंबईत २ सदनिका, पुणे, रायगड व तामिळनाडूतील प्रत्येकी १  सदनिका. पुण्यात १ भूखंड 
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या नावे, तर काही मालमत्तांत दीर आणि पतीची सहमालकी आहे.


5. मनोज सौनिक प्रधान सचिव, सा.बां. (1987 पासून सेवेत) 10.90 कोटी रुपये
६ मालमत्ता : मुंबई, नवी मुंबई व हरियाणात प्रत्येकी १ सदनिका. पुणे व रायगड येथे शेतजमीन. बिहारमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या नावे, तर काहींत पत्नीची सहमालकी.


हे आहेत पाच श्रीमंत आयपीएस अधिकारी 
1. संजयकुमार वर्मा
अतिरिक्त महासंचालक म्हाडा (1990) 11.65 कोटी रुपये
७ मालमत्ता : पुण्यात ४ सदनिका, मुंबई व नवी मुंबईत प्रत्येकी १ सदनिका. पुण्यात १ अकृषक भूखंड. 
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या नावे, तर काहींत पत्नी व सासूची सहमालकी आहे. 


2. परमबीर सिंग महासंचालक, एसीबी (1988 पासून सेवेत) 11.10 कोटी रुपये
४ मालमत्ता :  मुंबई व नवी मुंबई येथे प्रत्येकी १ सदनिका, हरियाणात जमीन व चंदिगडमध्ये १ घर.
मालकी : काही मालमत्ता स्वत:च्या नावे, तर काही मालमत्तांमध्ये पत्नी व भावांची सहमालकी आहे. 


3. जे.व्ही. जाधव (2004 पासून रुजू) 10.95 कोटी रुपये
११ मालमत्ता : कोल्हापुरात १ सदनिका, पुण्यात ३ सदनिका व १ फार्म हाऊस, कोल्हापूर, सांगली, पुणे येथे ६ भूखंड असल्याचे नमूद आहे. 
मालकी : यापैकी काही मालमत्ता स्वत:च्या नावे, तर काही मालमत्तांमध्ये पत्नी, मुलगा व पत्नीच्या भावाची सहमालकी आहे.


4. दिलीप पाटील भुजबळ, पोलिस अधीक्षक, बुलडाणा 10.63 कोटी रुपये
१६ मालमत्ता : पुण्यात ४ घरे, १ सदनिका व १ गाळा, ९ भूखंड. २ मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिश्शापोटी मिळाल्या. 
मालकी : काही स्वत:च्या, काहींत पत्नी, मुली व सासऱ्यांची सहमालकी.


5. विनीत अगरवाल विशेष संचालक, ईडी (1994 पासून सेवेत) 9.10 कोटी रुपये
८ मालमत्ता : गाझियाबादेत ४ गाळे, १ भूखंड. नोयडात १ भूखंड, १ निवासी भूखंड व वडिलोपार्जित मालमत्ता.
मालकी : काही मालमत्ता स्वत: खरेदी, काही कुटुंबाच्या वाटणीद्वारे तसेच आईकडून मिळालेल्या आहेत.


अधिकाऱ्यांवर अशी होईल कारवाई
तपशील न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधीचे पत्र सर्व राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना ७ फेब्रुवारीला पाठवले आहे. अशा अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती, अतिमहत्त्वाच्या पदावर नियुक्ती, मूळ केडरमध्ये परतण्यासंबंधीची परवानगी, तसेच सक्तीचे प्रशिक्षण वगळता इतर प्रशिक्षण कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...