Arrest / बिलोलीच्या एसडीओंना दोन लाखांची लाच घेताना पकडले; तेलंगणातील पकडलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी घेतली लाच

दोनच घाटांचा लिलाव, तरी सर्वच घाटांवर वाळू उपसा

Sep 03,2019 07:46:00 AM IST

नांदेड - बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांच्यासह दोन जणांना २ लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. या कारवाईने जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांच्या संमतीने चालत होता यावर शिक्कामोर्तब झाले.


बोलिली तालुक्यातील मांजरा नदीच्या पात्रात वाळू उपसा करणारे तेलंगणातील दोन हायवा ट्रक महसूल प्रशासनाने पकडले. हे ट्रक सोडवण्यासाठी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी आपल्या दोन साथीदारामार्फत ट्रक मालकाकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या पथकाने या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर शनिवारी बिलोली येथील बसस्थानक परिसर सापळा रचण्यात आला. त्यावेळी श्यामकुमार बोनगे याने तक्रारदाराचे नावावर असलेले दोन ट्रक सोडवण्यासाठी २ लाख रुपये घेतले. एसीबीने लाचेच्या रकमेसह त्यास रंगेहाथ पकडले. भोसले यांनी त्यांचे दोन खासगी माणसांमार्फत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. बोनगे याने लाचेची रक्कम स्वीकारली. श्रीनिवास जिनकला यांनी तक्रारकर्ता व भोसले यांच्यात लाचेची रक्कम देवघेवीसाठी मध्यस्थी केल्याचे आढळून आले.


बिलोली पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले (वय ३७) मूळ राहणार इंदापूर, श्यामकुमार बोनगे (३४) रा. निजामाबाद व श्रीनिवास जिनकला (वय ४३) रा. मिरयालगुडा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. बिलोली जिल्ह्यात तर वाळूचा बेसुमार उपसा झाला. बिलोली, धर्माबाद, नांदेड तालुक्यात प्रमाणाबाहेर वाळू उपसा झाला.

दोनच घाटांचा लिलाव, तरी सर्वच घाटांवर वाळू उपसा
जिल्ह्यात वाळूचे एकूण ३५ घाट आहेत. त्यापैकी एकदोनच घाटांचा लिलाव झाला. तथापि वाळू उपसा जवळपास सर्वच घाटांवर सुरू होता. यामागे शासकीय अधिकारी व वाळू कंत्राटदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप अनेकदा झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तर जाहीर भाषणात प्रशासनाचे व वाळू तस्कराचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर वाळू तस्कराकडूनच दोन लाखाची लाच घेताना पकडल्याने त्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले.

X