आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील धरणे हा मोठा भ्रष्टाचार, कॅगचेही ताशेरे; साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या संशोधक परिणिता दांडेकरांशी साधलेला संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तिवरे धरणफुटीमुळे कोकणातील धरणांंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या संशोधक परिणिता दांडेकरांनी २ वर्षांपूर्वीच कोकण खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील धरणांचा अभ्यास करून मांडलेल्या अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कोकणातील ९० धरणांपैकी फक्त १३ धरणांची कामे पूर्ण झाली. तर अनेकांची कामे रखडली असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या निमित्ताने परिणिता दांडेकर यांच्याशी  साधलेला हा संवाद.
 

 

प्रश्न : कोकणातील मोठ्या धरणांबाबतच्या अभ्यासाचे निष्कर्ष काय होते?

>  १९९७ मध्ये कोकण खोरे विकास महामंडळाकडे कोकणातील ९० सिंचन प्रकल्प वर्ग केले. त्यासाठी आजवर ६ हजार कोटी खर्च झाले. अजून ११ हजार कोटी लागणार आहे. मात्र, ३३ वर्षांनंतरही त्यातील एकही धरण सर्वार्थाने पूर्ण झालेले नाही आणि कोकणातील सिंचन क्षेत्रात एका टक्क्याचीही वाढ झालेली नाही. 

 

प्रश्न : धरणांवरील खर्च व सिंचन क्षेत्राबाबत प्रश्न उठवले जातात?
>  महामंडळातील ४ मोठी, ११ मध्यम आणि ४ बीओटी धरणांची कामे ३३ वर्षांनंतरही पूर्ण झाली नाहीत. २०१०मध्ये कॅगने ३० पैकी १० धरण दुरुस्तीची शिफारस केली. ६४ धरणांसाठी ६८३ कोटींची मान्यता असताना ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला. तरीही कामे अपूर्णच. धरणांसाठी पर्यावरण व वन खात्याच्या परवानग्याच नसतांनाच कामांना सुरुवात केली होती. हा गुन्हाच आहे. 
 

 

प्रश्न : कोणकोणत्या धरणांबाबत तुम्ही अहवाल दिला आहे?
> मी टाळंबा, सरमळा इत्यादी धरणांचा अभ्यास केला. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील १४ मोठ्या धरणांचे अपयश सिद्ध केले. टाळंबाला २०१५पर्यंत जल आयोगाचे इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स नव्हते. विरदीच्या बांधकामासाठी परवानग्या बाकी आहेत. सरमळाचा फायदा २२ गावांना दाखवला. प्रत्यक्षात लाभक्षेत्रात १५ गावे आहेत. या धरणामुळे खाण उद्योगांचाच फायदा होऊन अधिवास धोक्यात आला. 

 

प्रश्न : तुमच्या शिफारशी काय आहेत?
> सरासरी ३ हजार मिमी पाऊस, उंच-सखल, उतारावरची शेती, संवेदनशील जैवविविधतेचा पश्चिम घाट व सह्याद्री पर्वतरांगा या कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता मोठी धरणे सिंचनाचे उत्तरच नाही. सिंचनाची गरज आहे, पण धरणांची नाही. त्यामुळे सर्व धरणांची तत्काळ कॉस्ट, बेेनिफिट व इम्पॅक्ट असेसमेंट करावी, वातावरणानुसार स्थानिक सिंचनाच्या पद्धतींचे पुनरुज्जीवन करावे, अशा आमच्या शिफारशी होत्या. 

 

प्रश्न : पश्चिम महाराष्ट्रीयन धरणे म्हणजे? 
> पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी तेथील कल्पना डोक्यात ठेवून कोकणातील प्रकल्पांच्या केलेल्या आखणीस कोकणातील स्थानिक व तज्ज्ञांचा आक्षेप आहे. पश्चिम महाराष्ट्रासारखा सपाटीचा प्रदेश नाही. लाभक्षेत्रापेक्षा धरणात गेलेली जमीन अधिक आहे. कालवे काढण्यास जागा नाही. स्थानिक सिंचन पद्धतींचे पुनरुज्जीवन हेच यावरील उत्तर आहे. मात्र, हे वारंवार मांडूनही उर्वरित महाराष्ट्राचे धरणांचे मॉडेल कोकणावर लादले गेले. त्यातून फायदा शून्य व  नुकसानच अधिक आहे.

 

प्रश्न : विद्युत निर्मितीसाठी धरणे आवश्यक आहेत?
> मग ती तरी कुठे होतेय? महाडचे काळकुंभ जलविद्युत केंद्र हे याचे उदाहरण आहे. १५ मेगावॅटसाठी ५५ मीटरचे महाकाय धरण अर्धवट बांधून ठेवले. या धरणावर ३०० कोटी खर्चूनही ५-६ वर्षांपासून काम बंद आहे. २०१६मध्ये एसीबीने १२ धरणांची चौकशी लावली. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाईंच्या मते, कोकणातील धरणे हा मोठा बौद्धिक भ्रष्टाचार आहे. ठेकेदार, अधिकारी, नेते आणि बागायती माफियांसाठी ती बांधली जाते. 

बातम्या आणखी आहेत...