आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळागावात प्लास्टिक भंगार मालाच्या गाेदामाला भीषण आग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


  नाशिक- वडाळागाव येथील सादिकनगर भागात असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या गाेदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी दाट लोकवस्ती असल्याने आगीवर नियंत्रणात मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
वडाळागावातील अतिक नबी शेख यांच्या मालकीच्या प्लास्टिक भंगार मालाच्या गाेदामाला आग लागल्याचे स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मुख्यालयात संपर्क साधून कळविले. स्थानिकांनी गाेदामाकडे धाव घेत माेठी गर्दी केली हाेती. अनेकांनी आग विझविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 

अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर काही मिनिटांत बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील युवकांनी पाण्याचा मारा करण्यासाठी मोकळी जागा करून दिल्याने अग्निशमन दलास माेठी मदत झाली. परिसरातील घरे खाली करण्यात आली तसेच घरातील गॅस सिलिंडरच्या टाक्याही सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्या हाेत्या. शुक्रवारी नमाज असल्याने गोदामात कोणीही कामगार नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, गुदामातील अनेक साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सिडको, बिटको, मुख्य अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी घटनास्थळी दाखल हाेत आग आटाेक्यात आणली. 


दाट लोकवस्ती असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात वारंवार अडथळे निर्माण हाेत होते. परंतु, अग्निशमन दलाच्या २० ते २५ जवानांनी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. 


स्थानिक युवकांची अग्निशमन दलास माेठी मदत 
आगीची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी एकत्र येत बचावकार्यास सुरुवात केली. काहींनी घरांतून बादल्या आणल्या तर काहींनी घरे खाली करण्यास मदत केली. तर काही युवकांनी अग्निशमन दलाच्या बंबाला घटनास्थळावर पोहोचण्यास अडथळा येऊ नये म्हणून रस्ता मोकळा करून दिला. तसेच परिसरातील लोखंडी गेटदेखील तातडीने कापण्यात आले. यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास माेठी मदत झाली. 
 

बातम्या आणखी आहेत...