आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट..!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सुधीर जोगळेकर

एक मार्चला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा वाढदिवस पाटण्यात साजरा झाला, आणि ती संधी साधून नितीशकुमारांनी गांधी मैदानावरील भरगच्च कार्यकर्ता संमेलनात, सहा महिन्यांनी येऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष मिळून ही निवडणूक लढवेल आणि २४३ पैकी २०० हून अधिक जागा प्राप्त करून सत्तेत येईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झालेल्या छोट्या-मोठ्या पक्षांमधले बिहार राज्यातील दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे नितीशकुमारांचे संयुक्त जनता दल आणि रामविलास पासवानांची लोकजनशक्ती पार्टी. बिहारच्या राजकारणातला तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजेच लालूप्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल. यातले रामविलास पासवान ७३ वर्षांचे, लालूप्रसाद यादव एकाहत्तर वर्षांचे तर नितीशकुमार सत्तरीत पदार्पण करणारे. 

रामविलासांनी गेल्याच वर्षी चिराग पासवान या आपल्या मुलाच्या हाती आपल्या पक्षाची सूत्रे सोपवली, लालूप्रसादांनी त्याच्याही आधी प्रथम आपल्या पत्नीच्या, राबडीदेवींच्या हाती, नंतर आपल्या मुलाच्या तेजस्वीच्या हाती आणि त्याच्याही नंतर मुलीच्या मिसा भारतीच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवली. या पार्श्वभूमीवर नितीशकुमारांनी मात्र आपल्या मुलाला, निशांतला, राजकारणात पुढे आणलेले नाही, आणि त्यालाही तशी रुची असावी असे दिसत नाही. 


चिराग पासवान यांनी गेल्या वर्षी लोकजनशक्ती पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि रामविलासांना पहिला धक्का दिला. तुम्ही मंत्री झालात, पण आपल्या पक्षाला बिहारच्या राजकारणात नितीशजींच्या पक्षाइतकं महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं नाहीत, अशी त्याची तक्रार होती. पण ती तितकीशी खरी नव्हती. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमारांचं संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नव्हतं. त्या निवडणुकीत भाजप, लोजपा आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी हेच तीन पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकत्र होते. बिहारमध्ये लोकसभेच्या चाळीस जागा, त्यातल्या ३१ जागा या तिघा पक्षांनी मिळून जिंकल्या. भाजपला २२ जागा मिळाल्या आणि १० जागांचा फायदा झाला, लोकजनशक्ती पक्षाला ६ जागा मिळाल्या आणि ६ जागांचा फायदा झाला तर राष्ट्रीय लोक समता पार्टीला ३ जागा मिळाल्या आणि ३ जागांचा फायदा झाला. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे यश त्यांना टिकवता आलं नाही. लोकजनशक्ती पक्षानं ४२ जागा लढवल्या आणि अवघ्या २ जागी त्यांना यश प्राप्त झालं. भाजपनं १५७ जागा लढवल्या आणि त्या पक्षाला ५३ जागी यश मिळालं. राष्ट्रीय लोक समता पार्टीनं २३ जागा लढवल्या, पण त्यांनाही अवघ्या दोन जागीच यश मिळालं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा चौथा घटक पक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चा. या पक्षानंही २१ जागा लढवल्या, परंतु त्यांना अवघी एक जागा जिंकता आली. त्यामुळे रालोआचं संख्याबळ झालं ५८. २४३ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत रालोआच्या ५८ जागांनी काहीच होणार नव्हतं. कारण संयुक्त जनता दलाला ७१ आणि राजदला ८० जागा मिळालेल्या होत्या. २०१५ ची विधानसभेची निवडणूक तीन आघाड्यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यातली पहिली आघाडी होती जनता परिवार या नावाने संबोधली गेलेली. त्या आघाडीत समाजवादी पार्टी, जद (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, जद (धर्मनिरपेक्ष), इंडियन नॅशनल लोक दल आणि समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) यांचा अंतर्भाव होता. आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीशकुमारच राहतील, अशी संयुक्त घोषणाही त्यांनी केली होती. या आघाडीत नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही सहभागी झाले होते. परंतु समाजवादी पार्टी, जद (धर्मनिरपेक्ष), इंडियन नॅशनल लोक दल आणि समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) यांनी जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला आणि या परिवाराचं नामकरण महागठबंधन असं झालं. त्यांचं सरकार सत्तेत आलं, ते जवळपास पावणेदोन वर्षं चाललं. परंतु उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं नाव भ्रष्टाचाराशी जोडलं गेलं, केंद्रीय गुप्तचर खात्याच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आणि नितीशकुमारांनी राजीनामा दिला. 

दुसऱ्याच दिवशी संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. नितीश पुन्हा सत्तेत आले. ३३ सदस्यांच्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात संयुक्त जनता दलाला १९ तर भाजपला १४ मंत्रिपदे मिळाली आणि रालोआत असूनही लोकजनशक्ती उपाशी राहिली. चिराग पासवान यांच्या मनात तो राग आहे, त्यामुळेच जागावाटपाचा मुद्दा निघालाच तर ११९ विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ ही त्यांची घोषणा राहणार आहे, येत्या १४ एप्रिलला गांधी मैदानात आपल्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा घोषित करण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

दुसरीकडे नितीशकुमारांनी आपण रालोआबरोबरच राहणार असल्याचे निःसंदिग्धपणे घोषित केले आहे, सीएए-एनपीआर-एनआरसी प्रकरणात नितीशकुमारांनी आपला संपूर्ण पाठिंबा केंद्र सरकारला राहणार असल्याचे जाहीर केले आहे, इतकेच नव्हे तर तसा ठराव संमत करणारे ते पहिले राज्य ठरले आहे. २४३ पैकी प्रत्येकी १०५ जागा संयुक्त जनता दल आणि भाजप लढणार आहेत, तर उरलेल्या ३३ जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. गेल्या काही महिन्यांत केंद्रात सत्तारूढ झालेल्या भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्ली ही राज्ये गमावली आहेत. तोच अनुभव बिहारमध्ये येऊ शकतो असा दावा विरोधक करताहेत, तर दिल्ली जशी ‘आप’ने राखली तसाच बिहार आम्ही राखू, असा दावा नितीश करताहेत. नेमकं काय होणार ते येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईलच.
 

बातम्या आणखी आहेत...