आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रालोआमध्ये सर्व आलबेल नाही: केंद्रात जेडीयू, बिहारात भाजपला डच्चू; नितीश मंत्रिमंडळ विस्तारात आठ नवे मंत्री, भाजप दूरच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमधील घडामोडींवरून रालोआत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. आधी मोदी सरकारमध्ये जेडीयूतून एकाही मंत्र्याला स्थान मिळू शकले नाही. आता बिहारमधील नितीश सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला डच्चू देण्यात आला. रविवारी नितीश यांच्या ८ नव्या मंत्र्यांना राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली. हे सर्व जेडीयूच्या कोट्यातील आहेत. नितीश यांनी भाजपला एकही मंत्रिपद दिले नाही. वास्तविक जुलै २०१७ मध्ये महाआघाडी सोडून नितीशकुमार रालोआमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर सरकारने दुसऱ्यांदा कॅबिनेटचा विस्तार केला. शपथविधीनंतर जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी म्हणाले, केंद्रात आम्हाला एक मंत्रिपद मिळणार होते. ही गोष्ट मान्य नव्हती. हा निर्णय अंतिम आह.े भविष्यातही एनडीएमध्ये सहभागी होणार नाही, , असे जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी स्पष्ट केले. 

 

संकट नाही, सर्वकाही ठीक : नितीश 
रालोआमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नाला नितीश यांनी बगल दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळात जेडीयूच्या कोट्यातील काही जागा रिक्त होत्या. त्यामुळे आम्ही पक्षनेत्यांचा समावेश केला. भाजपसोबत काहीही अडचण नाही. सर्वकाही ठीक चाललेय.

 

२०० टक्के ठीक : सुशील मोदी 
बिहारचे भाजप नेते व उपमुख्यमंत्री सुशील माेदी म्हणाले, रालोआत २०० टक्के सर्वकाही ठीक आहे. आमचे अगोदरच १३ मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजप कोट्यातून एक मंत्रिपद भरण्यासाठी भाजपला ऑफर दिली होती. परंतु आम्ही त्यावर नंतर विचार करू. 

 

नवीन मंत्र्यांमध्ये ३ विधान परिषद, ५ विधानसभा सदस्य
नवीन ८ मंत्र्यांमध्ये ३ विधान परिषद तर ५ विधानसभा सदस्य आहेत. त्यात काँग्रेसमधून जेडीयूमध्ये आलेले अशोक चौधरी, श्याम रजक, रामसेवक सिंह, नीरज कुमार, बीमा भारती, नरेंद्र यादव, संजय झा व लक्ष्मेश्वर राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नवीन मंत्र्यांना खात्यांची जबाबदारी सोपवतानाच जुन्या ५ मंत्र्यांच्या विभागात बदल करण्यात आला. कृषिमंत्री प्रेमकुमार यांना पशू व मत्स्य विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपवला.

 

जदयूचे ३ मंत्री निवडणूक जिंकून खासदार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जदयू कोट्यातून तीन व लोजपच्या कोट्यातून एक मंत्रिपद रिक्त झाले होते. नितीश यांचे ३ मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह, दिनेशचंद्र यादव व पशुपतीकुमार पारस खासदार झाले. मुजफ्फर शेल्टर होम प्रकरणात तुरुंगात गेल्यामुळे मंजू वर्मा यांना काही महिन्यांसाठी मंत्रिपदावरून हटवण्यात आले होते. भाजपच्या कोट्यातून तूर्त नितीश सरकारमध्ये १३ मंत्री आहेत. 
 

एकाच वेळी चौघांची शपथ

राज्यपाल लालजी टंडन यांनी ८ मंत्र्यांच्या दोन गटांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दोन टप्प्यांत हा छोटेखानी समारंभ झाला.