आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयूत प्रशांत किशोर एकाकी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नाराजीचा उपाध्यक्षांना फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकत्व नोंदणी याबाबत पक्षाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारे जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नाराजीचा फटका बसला आहे. मंगळवारी पाटण्यात झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपासून प्रशांत किशोर आणि राज्यसभेचे माजी खासदार पवनकुमार वर्मा यांना लांब ठेवण्यात आले. या दोघांना बैठकीपासून लांब ठेवण्यास नितीशकुमार यांची नाराजी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. गेल्या एक महिन्यापासून प्रशांत किशोर सोशल मीडियातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मते मांडत आहेत. ते भाजप नेत्यांवर सतत टीका करत आहेत. यामुळे पक्षात त्यांचे महत्त्व कमी केले जाईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. प्रशांत किशोर यांनी भाजपचे माजी अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही लक्ष्य केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जदयू आणि भाजप यांनी आघाडी केली आहे. तर प्रशांत किशोर सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी रणनीती ठरवत आहेत. प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांना प्रशांत किशोर बैठकीत नसण्याबाबत आणि पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, या बैठकीत संघटना व इतर मुद्यांवर चर्चा आहे. यात त्यांची काही गरज नाही. तर जदयु नेते अजय आलोक म्हणाले की, प्रशांत किशोर व पवनकुमार वर्मा ‘कोरोना’ विषाणू आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नितीशकुमार यांचे मात्र मौन, प्रशांत किशोर यांच्या पक्षातील भूमिकेबाबत चर्चा
विशेष म्हणजे नितीशकुमार यांनी अनेकदा अप्रत्यक्षरीत्या प्रशांत किशोर यांची वक्तव्ये नाकारली आहेत. मात्र, उघडपणे त्यांनी काहीही वक्तव्य केलेले नाही. नागरिकत्व कायद्याविरोधात बोलणारे माजी खासदार पवनकुमार वर्मा यांना नितीशकुमार यांनी सरळ इशारा दिला असला तरी प्रशांत किशोर यांच्याबाबत काहीच बोलत नाहीत. पक्षाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खा. ललन सिंग प्रशांत किशोर यांच्या वक्तव्यांवर सतत प्रतिक्रिया देत त्यांची वक्तव्य नाकारत आहेत. तसेच प्रशांत किशोर यांच्या पक्षातील भूमिकाही दाखवत आले आहेत. मात्र, नितीशकुमार जोपर्यंत काही बाेलत नाहीत तोपर्यंत प्रशांत किशोर यांचे जदयुतील भूमिका संपली आहे, असे मानता येणार नाही.