आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील तात्पुरत्या नियुक्तीचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; घरी परतताना अपघात, वरणगावचा वायरमन ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- कामावरून घरी पतरणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याच्या दुचाकीला आयशरने मागून धडक दिल्याची घटना, बुधवारी दुपारी २.२० वाजेच्या सुमारा महामार्गावरील सुभाष गॅरेजजवळ घडली. दुचाकीला धडकल्यानंतर आयशरने समोरून येणाऱ्या इनोव्हालादेखील धडक दिली. अपघातात आयशर आणि इनोव्हाच्या या वाहनांच्या मध्ये सापडल्याने दुचाकीस्वार वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२ रा.वरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे म्हसावद (ता.जळगाव) येथे नियुक्तीवर असलेल्या धनगर यांना जळगावात तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती. जळगावातील नियुक्तीनंतर बुधवारी त्यांचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवसाचे काम आटोपून वरणगावकडे घरी येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. अपघातात इनोव्हाचा चालक जखमी झाला आहे.

 

बुधवारी दुपारी आयशर (क्र.एमपी.०९-जी.ई. ७२९) वालचंदनगर येथून शुगर फॅक्टरीचे साहित्य घेऊन नरसिंगपूरकडे (मध्यप्रदेश) जात होती. वाटेत भुसावळातील महामार्गावर सुभाष गॅरेजजवळ अपघात झाला. आयशरने दुचाकीला (क्र.एम.एच.१९-सी.ई.७२७४) मागून धडक दिल्यानंतर समोरून येणाऱ्या इनोव्हालादेखील (क्र.एम.एच.१९-ए.एम.३१३२) धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांमध्ये सापडल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. तर दुचाकीवरील वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक सचिन माळी (रा.तुळशीनगर, भुसावळ)जखमी झाला. आयशरचालकाने वाहन सोडून पळ काढला. मृत धनगर यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. याप्रकरणी संदीप सावळे यांनी शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अायशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पाेलिस उपनिरीक्षक के.टी. सुरळकर पुढील तपास करत अाहेत.

 

वरणगाव ग्रामीण रुग्णालयात झाले शवविच्छेदन
महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच शहर पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के.टी. सुरळकर, हवालदार शंकर पाटील, प्रवीण ढाके, संजय बडगुजर यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून धनगर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला. यावेळी ग्रामीण रूग्णालयात गर्दी झाली हाेती.

 

दुचाकीचा चुराडा
आयशर आणि इनोव्हा या वाहनांच्या मध्ये आलेली दुचाकी ओळखणे कठीण झाले होते.

 

तात्पुरत्या नियुक्तीचा पहिलाच दिवस दुर्दैवी
वायरमन धनगर यांची म्हसावदला (ता.जळगाव) येथे नियुक्ती होती. त्यांची जळगावात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात अाली हाेती. बुधवारी नवीन नियुक्तीवर त्यांचा पहिलाच दिवस होता. काम आटोपून ते जळगावातून वरणगावकडे परत येत होते. मात्र, अपघाताने त्यांना हिरावून नेले. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी उसळली होती.

 

जखमी कारचालकाला रुग्णालयात हलवले
अायशरच्या धडकेत इनाेव्हाचालक सचिन माळी गंभीर जखमी झाला अाहे. त्याला गाेदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात इनोव्हा कारचे नुकसान झाले आहे. आयशरच्या मालकाचा पोलिस शोध घेत असून त्या माध्यमातून पोलिस ट्रक चालकापर्यंत पोहोचणार आहेत. त्यादृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...