आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर ओव्हरटेक करताना कारने उडवले, रिंगणगावचा दुचाकीस्वार ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाहनांना ओव्हरटेक करीत राँग साइडने जळगावकडे येत असलेल्या भरधाव कारने महामार्गावर दादावाडीजवळ पाळधीकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात रिंगणगावचा युवक घटनास्थळी ठार झाला तर दुसऱ्या युवकाचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झाला.

 

भूषण जितेंद्र शिंदे (वय २३, रा. रिंगणगाव, ता. धरणगाव) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रशांत सुरेश पाटील (वय २५, रा. एकलग्न) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृत योजनेंतर्गत खोटेनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तेथे एकनाथ पाटील यांच्या जेसीबीवर भूषण शिंदे हा चालक होता. प्रशांत हादेखील अमृत याेजनेच्या कामावर आहे. रविवारी सकाळी जेसीबीचे टायर पंक्चर झाले होते. त्यामुळे मालक पाटील यांनी त्याला पंक्चर काढून आणायला सांगितले होते. 


कामानिमित्त भूषण व प्रशांत यांची मैत्री झाली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास भूषण हा प्रशांतच्या दुचाकीवर (क्रमांक एमएच-१९, सीटी ३२३६) जळगाव शहराकडून पाळधीकडे घरी जात होते. तर पाळधीकडून भरधाव कार (क्रमांक एमएच-१९, बीजे ७८८०) जळगावकडे येत होती. कारचालक वाहनांना ओव्हरटेक करीत येत होता. त्याने कार राँग साइडने चालवून जैन मंदिरासमोर महामार्गावर युवकांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण हा मागच्या बाजूने जोरात खाली फेकला गेला. रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. तर प्रशांतचा पाय फ्रॅक्चर झाला. अपघातात कार व दुचाकीसमोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. 

 

दाेन वर्षांपूर्वी भूषणचा झाला हाेता विवाह 
भूषणचे दोन, तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले असून, त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. तो सतत आजारी राहत होता. भूषणने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च केला असे त्याचा मालक पाटील यांनी सांगितले. त्याच्या पश्चात सहा महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. अपघातानंतर पोलिसांनी कार व दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात आणली. 

 

अपघातग्रस्त युवकांच्या मदतीला धावले रिक्षाचालक 
अपघातानंतर चालक कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला. या वेळी अपघातग्रस्त युवकांच्या मदतीला रिक्षाचालक धावले. भूषणला रिक्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जखमी प्रशांतला धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजू पाटील यांच्या कारमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाने भरधाव कार चालवत वाहनाना ओव्हरटेक केले. त्यानंतर राँग साइडने येऊन दुचाकीला धडक दिल्याचे जखमी प्रशांतने सांगितले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन ते चार महिन्यांत अपघाताच्या घटना वाढल्या अाहेत. साइडपट्ट्याही खचल्याने अरुंद रस्त्यामुळे अपघात हाेत असल्याने चिंता व्यक्त हाेत अाहे. 
अपघातात दुचाकीचे झालेले नुकसान.
 
रुग्णालय आवारात नातेवाइकांचा आक्राेश 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून भूषणच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नातेवाइकांनी कारच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती कार पंकज योगराज पवार यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर दुपारी ४ वाजता भूषणच्या नातेवाइकांनी रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह बघून आक्राेश केला. 

बातम्या आणखी आहेत...