आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी, सोन्याची अंगठी विकून घेतला बोअर, ‘माउली’मुळे भागतेय पाडळीकरांची तहान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - सातत्याने अवर्षणाचा सामना करणारे पाडळी (ता.शिरुर) हे गाव. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण. हे बेचैन करणारे चित्र पाहून माऊली सिरसट या युवकाने ४ वर्षापूर्वी हातातील सोन्याची अंगठी व दुचाकी विकून ३५ हजार जमवले व बोअर घेतला. आज भर दुष्काळातही या बोअरला चांगले पाणी येत असून पाडळीकरांची तहान भागत आहे.

 

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा उत्तरोत्तर अधिक तीव्र होत आहेत. प्रशासनाकडून हजारांवर टँकर सुरु असले तरी कित्येक गावांत आजही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर येतेयं. पाडळी या पाच हजार लोकसंख्या असलेल्याही गावातही अशीच स्थिती आहे. मात्र, याठिकाणी माऊली सिरसट या युवकाने घेतलेल्या बोअरमुळे सध्या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. ४ वर्षांपूर्वी  ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबावेत तसेच गाव परिसरात लावलेले झाडं जगावेत, या दुहेरी उद्देशातून माऊलीने पाडळी वेस परिसरात बोअर घेतला. त्यासाठी त्याला हातातील सोन्याची अंगठी विकून १० हजार रूपये व स्वत:ची दुचाकी विकून २५ हजार रूपये जुळवले. सुदैवाने या बोअरला मोठ्या प्रमाणात पाणी लागले. तेव्हापासून हा बोअर ग्रामस्थांची तहान भागवत आहे. आज गाव परिसरातील सर्व विहीरी, हातपंप कोरडे पडलेत. टँकरचे पाणी येते पण ते पिण्यालायक नाही. अशा स्थितीत माऊली यांनी घेतलेला बोअर गावासाठी मोठा दिलासा ठरला आहे. या बोअरच्या ठिकाणी नियमित हंडे, घागरी घेऊन महिला, ग्रामस्थ रांगा लावून असतात. माणसांसाठी पाण्याची सोय करतानाच माऊली सिरसट व मित्रमंडळी गाव परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणवठे उभारत असून हे काम मुक्या जीवांनाही मोठा दिलासा देणारे ठरतेय.
 

ग्रामस्थ करणार होते मानपान
सध्या हंडाभर पाणी मिळणेही मुश्किल आहे. अशा स्थितीत माउली सिरसट या युवकामुळे किमान पिण्याचे पाणी तरी बिनदिक्कत मिळतेयं. आपले कष्ट हलके करणाऱ्या माऊलीचं कौतुक म्हणून ग्रामस्थ महिला एक अंगठी व कपडे करण्याच्या विचारात होत्या. परंतु, माऊलीने नम्रपणे हा प्रस्ताव नाकारला.

 

सेवेतच समाधान, सेवाव्रत कायम जपणार         
दुष्काळात ग्रामस्थांचे तसेच वन्यप्राण्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी उपक्रम राबवला जात आहे. बोअरच्या पाण्यामुळे महिलांची वणवण दूर झालीये. ही सेवा घडत असल्याचेच समाधान वाटते. हे सेवाव्रत कायम जपणार आहोत.
- माउली सिरसट, सामाजिक कार्यकर्ता, पाडळी, ता.शिरुर

बातम्या आणखी आहेत...