आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी स्थापन केल्याच्या 11वर्षांनंतर फ्लिपकार्टचे दोन्ही संस्थापक बाहेर; सचिन यांच्या 6 महिन्यांनंतर बिन्नी बन्सल यांचाही राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन (उजवीकडे) व बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये कंपनी सुरू केली. - Divya Marathi
सचिन (उजवीकडे) व बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये कंपनी सुरू केली.

नवी दिल्ली -  ११ वर्षांपूर्वी फ्लिपकार्टची स्थापना करणारे दोन्ही संस्थापक कंपनीतून बाहेर पडले आहेत. सहसंस्थापक आणि समूहाचे सीईओ बिन्नी बन्सल यांनी ‘वैयक्तिक दुर्व्यवहारा’च्या आरोपानंतर मंगळवारी राजीनामा दिला.  अमेरिकेच्या वॉलमार्टने मे महिन्यात फ्लिपकार्ट खरेदी करत असल्याची घोषणा केली होती. त्या वेळी कंपनीचे दुसरे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी त्यांच्या भागीदारीची विक्री करून ते स्वतंत्र झाले होते.

 

मात्र, बिन्नी कंपनीत कायम राहिले होते. फ्लिपकार्टमधून दोन्ही बन्सल बाहेर झाल्यामुळे कंपनीच नाही, तर स्टार्टअप इकोसिस्टिमसाठी मोठा झटका मानला जात आहे. सचिन आणि बिन्नी यांनी मिळवलेले यश नवीन पिढीतील हजारो लोकांना उद्योजक बनवण्याची प्रेरणा देते. दाेघांनी २००७ मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती.  


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिन्नी यांचे हे प्रकरण २०१६ चे आहे. वॉलमार्टला याची तक्रार जुलैमध्ये मिळाली होती. त्यानंतर त्याचा तपास झाला. बिन्नी यांनी सर्व आरोप फेटाळले असून राजीनामा देण्याचा निर्णय त्यांचाच असल्याचे वॉलमार्ट कंपनीने म्हटले आहे.  

 

लैंगिक शोषणाच्या आरोपाने आश्चर्य  : बिन्नी  

मी काही दिवसांपासून फ्लिपकार्ट समूहाच्या सक्रिय भूमिकेतून बाहेर पडण्याचा विचार करत होतो. मात्र, योग्य वेळ येण्याची प्रतीक्षाही करत होतो. वाॅलमार्टसोबतच्या करारानंतरचे सर्व व्यवहार पूर्ण होण्यासाठी आणखी काही तिमाहींपर्यंत समूह सीईओ पदावर कायम राहण्याची माझी योजना होती. मात्र, अलीकडच्या काळातील काही वैयक्तिक घटनांमुळे मला लवकर निर्णय घ्यावा लागला. माझ्यावर दुर्व्यवहाराचा आरोप करण्यात आला असून स्वतंत्र संस्थेने केलेल्या तपासात तो निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्यावरील आरोप आश्चर्यचकित करणारे होते. मी ते पूर्णपणे फेटाळत आहे. मी या प्रकरणात पारदर्शकता ठेवली नसल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. मी आणि माझ्या कुटुंबासाठी हा आव्हानात्मक काळ आहे.(-फ्लिपकार्ट कर्मचाऱ्यांना बिन्नी बन्सल यांचा ई-मेल)  

 

 सचिन बन्सल यांनाही बाजूला केले होते
फ्लिपकार्टची खरेदी करतानाच वाॅलमार्टने सचिन यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका वक्तव्यात सचिन यांनी सांगितले होते की, “अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, दहा वर्षांनंतर येथे माझे काम संपले आहे. आता बाहेर जाण्याची वेळ आली आहे.’ 

 

१.१५ लाख कोटींत वॉलमार्टने केली फ्लिपकार्टची खरेदी
वॉलमार्टने मे महिन्यातच फ्लिपकार्टची १६ अब्ज डॉलरमध्ये (१.१५ लाख कोटी रुपयांत) खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा जगातील सर्वात मोठा ई-कॉमर्स क्षेत्रातील करार होता. यामध्ये फ्लिपकार्टचे मूल्य २० अब्ज डॉलर (१.४ लाख कोटी रुपये) निश्चित करण्यात आले होते. वॉलमार्टने यामधील ७७ टक्के शेअर खरेदी केले होते. 

बातम्या आणखी आहेत...