आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायप्रॉडक्ट्स करिअर फॅक्ट्रीचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थ्री इडियट्समधल्या रँचोचा मूलमंत्र अंगीकारला तर आपलं आयुष्य फार सुकर होईल. काय आहे तो मंत्र ? "बेटा काबील बनने के लिये पढो, कामयाबी झक मारके पीछे भागेगी." दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या असून काही बोर्डांचे निकाल लागले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचे आज-उद्या निकाल लागतील. त्यानंतर खरी रॅट रेस चालू होईल. ही रेस चालू होण्याआधी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही ‘कोटा फॅक्ट्री' सिरीज आवर्जून पाहायला हवी म्हणजे कोटासारख्या ठिकाणांची जवळून ओळख होईल. 

 

कोटा शहरात असं म्हटलं जातं की, ‘अगर आप आसमान में  पत्थर फेकोगे तो वो  जमीन पे आते आते एक तो किसी कुत्ते पे गिरेगा नहीं  तो आयआयटी  के लिये प्रिपरेशन करनेवाले  बच्चे पे गिरेगा।’ कोटाला  जाणं  हेच मुळात प्रतिष्ठेचं होऊन बसलंय, त्यात तिथल्या ठराविक टॉपच्या क्लासेससाठी नंबर लागण्यातसुद्धा मोठेपणा आहे. 
 

वो लोग बहुत ख़ुशक़िस्मत थे 
जो इश्क़ को काम समझते थे, 
या काम से आशिक़ी करते थे ।
हम जीते जी मसरूफ़ रहे,
कुछ इश्क़ किया कुछ काम किया ।
- फैज अहमद फैज

 

कामाशी आशिकी करणं सगळ्यांनाच जमत नाही, किंबहुना ही जालीम दुनिया ते जमवूच देत नाही. आशिकी करण्यासाठी काम आवडीचं असायला हवं हे जरी सत्य असलं तरी आपल्याकडे काम किती आवडीचं आहे यापेक्षा ते किती प्रतिष्ठेचं आणि किती पैसे कमावून देणारं आहे यावरच त्याची निवड अवलंबून असते. आपल्या एकंदरच खासगी-सार्वजनिक जगण्यावर समाजाने स्वतःचा सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवलाय आणि आपण सदासर्वकाळ त्याच्या निगराणीत आहोत. त्यामुळे तो कॅमेरा आपल्या कामावरही लक्ष ठेवून असतो. मुळात कुणी उदरनिर्वाहासाठी काही ‘काम' करतो तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आणि तो “करिअर' करत असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात बराच फरक आहे.  ‘काम' आणि “करिअर'मध्ये असा काय नेमका फरक असेल? कामाला जेव्हा कुणी करिअर म्हणतो तेव्हा  ते म्हणणाऱ्याने ‘सामाजिक प्रतिष्ठेचा’ मुकुट त्यावर चढवून ठेवलेला आहे असं समजावं. वेठबिगारी-मजुरी हे झालं 'काम' आणि इंजिनिइरिंग करून मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणं म्हणजे ‘करिअर'. मालकाची मर्जी सांभाळत ठरलेल्या वेळेत बौद्धिक-शारीरिक मेहनत दोन्हीकडे आलीच, पण सामाजिक प्रतिष्ठा ज्या कामाला मिळाली ते झालं ‘करिअर'.


दोन आठवड्यांपूर्वीची घटना, हैदराबादमध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका एकवीस वर्षांच्या  मुलाला मार्क्स कमी पडले म्हणून रात्री आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या एकवीस वर्षांच्या तरुण मुलाने आपलं जीवन संपवण्याचं धाडस केलं म्हणजे त्यावरचा मानसिक ताण किती प्रचंड मोठा असेल याचा विचार नक्कीच करायला हवा. 


सौरभला लहानपणापासून फिल्म्सचं आकर्षण. पण घरात वडिलांचा प्रचंड दरारा असल्यामुळे त्याला व्यक्त होता आलंच नाही. मजबुरीमध्ये इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेतलं, रडत खडत दोन वर्षे काढली, पण आतला आवाज शांत बसू देईना. शेवटी आईच्या मदतीने वडिलांसमोर इंजिनिअरिंग सोडून फिल्म मेकिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी बरीच तणतण केली, पण सरतेशेवटी आईच्या आग्रहामुळे मांडवली करत निर्णय इथपर्यंत आला की फिल्म मेकिंग कर, पण बॅकअप म्हणून इंजिनिअरिंग चालूच ठेवायची. न-पेक्षा काही तरी सकारात्मक घडतंय याचा विचार करून त्याने ती अट  मान्य  केली. आज अशी परिस्थिती आहे की अर्धा दिवस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, अर्धा दिवस फिल्म मेकिंग आणि उरलासुरला वेळ दोन्हीकडच्या असाइनमेंट्स पूर्ण करण्यात जातो. झालं नीटनेटकं तर ठीक नाही तर सरतेशेवटी दोन्हीकडच्या अपयशाचं खापर त्याच्या फिल्म मेकिंगच्या आवडीवरच फोडलं जाईल यात शंकाच नाही. 


क्रिएटिव्ह फिल्ड काय किंवा इतर प्रोफेशनल, टेक्निकल फिल्ड्स काय विद्यार्थिदशेत असताना करिअरचे ऑप्शन्स काय काय आहेत हे तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीत. जर कपडे खरेदी करण्यासाठी आपल्याला ढीगभर ऑप्शन्स लागत असतील तर आपल्या मुलांच्या करिअरच्या वेळी केवळ इंजिनिइरिंग, मेडिकलसारख्याच गोष्टींचे ऑप्शन्स आपण का ठेवत असू? माध्यमांमुळे, सिनेमामुळे आपल्याला नवनव्या जगाची ओळख होतच असते. अशातूनच मुलांच्या भावविश्वात करिअरच्या बाबतही असंच काही तरी घडताना आढळतं. बॉर्डर पाहून आर्मी, अग्निपंख पाहून एअर फोर्स, कल्पना चावलाच्या बातम्या पाहून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, यह जवानी है दिवानीसारखा सिनेमा पाहून विदेशांत फिरणारा व्हिडिओ जर्नलिस्ट किंवा ट्रॅव्हल शो करणारा फिल्ममेकर अनेकांना बनायचं होतं. वेक अप सीड  पाहून कुणाला फोटोग्राफर तर कुणाला रायटर बनण्याची इच्छा झालेली. पण या सर्व इच्छा दहावीनंतर शाखा निवडतानाच धूसर होऊ लागल्या. सायन्स म्हणजे उच्चभ्रू, कॉमर्स म्हणजे अॅव्हरेज आणि आर्ट््स म्हणजे तर अगदीच क्षुद्र शाखा असं चित्र उभं केलं गेल्याने सोशल सायन्सेसमध्ये आवड असणारेही बळजबरी बायो-फिजिक्सच्या गराड्यात अडकले जातात. एक काळ  असा की लाखोंच्या पॅकेजला भुलून इंजिनिअरिंगला अॅडमिशन्स घेतले जायचे पण आता त्या पॅकेजच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याचं  ठायी ठायी दिसत असल्याने इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडू लागली आणि त्याची जागा घेतली आयआयटीची प्रवेश परीक्षा म्हणजे IIT -JEE ची तयारी करून घेणाऱ्या क्लासेसने. 


ही स्पर्धा एवढी जोरदार होऊ लागली की परीक्षेची तयारी करून घेणारे क्लासेस उभे राहू लागले. त्यांच्यात चढाओढ निर्माण झाली. प्रत्येक जण आपापली ब्रँडिंग करू लागला. यातूनच निर्माण झालं राजस्थानातील कोटाचं मार्केट. कोटा शहरात असं म्हटलं जातं की ‘अगर आप आसमान  में  पत्थर फेकोगे तो वो  जमीन पे आते आते एक तो किसी कुत्ते पे गिरेगा नहीं  तो आयआयटी  के लिये प्रिपरेशन करनेवाले  बच्चे पे गिरेगा’ आपल्याकडे जसा लातूर पॅटर्नचा बोलबाला होता तसा देशभरात आयआयटीच्या तयारीसाठी कोटाचा बोलबाला आहे. इथे येणारे विद्यार्थी स्वतःच्या मर्जीने आले आहेत, काही बळजबरी पाठवले गेलेत आणि काही स्वतःच्या प्रतिष्ठेचा डंका पिटवून घेण्यासाठी तिथे गेले आहेत. कोटाला  जाणं  हेच मुळात प्रतिष्ठेचं होऊन बसलंय, त्यात तिथल्या ठराविक टॉपच्या क्लासेससाठी नंबर लागण्यातसुद्धा मोठेपणा आहे. लाखो रुपयांची फी, पालकांविना राहण्या खाण्याची अॅडजस्टमेंट, आयआयटीसारख्या संस्थेसाठी परीक्षा म्हणजेच तिची तेवढ्या उंचीची काठिण्यपातळी आणि प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तयार झालेली जीवघेणी स्पर्धा अशा सर्व गोष्टींना झगडा देत तारुण्यसुलभ वयात तिथे जाऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असेल याचा विचार करायला हवा.
विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनपासून तिथे राहण्याखाण्याच्या स्ट्रगल पर्यंत. क्लासेसच्या पॉलिटिक्सपासून बिझनेस मॉडेलपर्यंत प्रत्येक गोष्टीवर नजर टाकणारी एक वेब सिरीज नुकतीच रिलीज झालीय. टीव्हीएफ या ऑनलाइन कंटेंट निर्माण करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसने ‘कोटा फॅक्ट्री' या नावाने वेब सिरीज प्रदर्शित केली आहे. यूट्यूबवर या सिरीजचे आजवर ४ भाग प्रदर्शित झाले आहेत. यात विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला या स्पर्धात्मक युगात कसे रंगहीन करून टाकले आहे हे दर्शवले आहे. कलरफुल व्हीएफएक्सद्वारे निर्माण केलेल्या अव्हेंजर्स एंडगेमला तरुणाईने प्रचंड डोक्यावर उचलून धरलं आहे त्याच वेळी ती तरुणाई ब्लॅक अँड व्हाइट शेडमधून दाखवलेल्या ‘कोटा फॅक्ट्री'च्याही प्रेमात पडलेली आहे. कारण प्रत्येक जण अशाच कुठल्या ना कुठल्या कलरलेस ‘करिअर फॅक्ट्री’चा प्रॉडक्ट आहे.


थ्री इडियट्स, फालतू, पाठशाला, तारे जमीन पर  यांसारख्या हिंदी आणि शिक्षणाच्या आईचा घोसारख्या मराठी चित्रपटाने आपल्या शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षणाबाबत तयार झालेल्या समाजमनावर भाष्य केले आहे. थ्री इडियट्समधल्या रँचोचा मूलमंत्र अंगीकारला तर आपलं आयुष्य फार सुकर होईल. काय आहे तो मंत्र ? "बेटा काबील बनने के लिये पढो, कामयाबी झक मारके पीछे भागेगी.’ दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या असून काही बोर्डांचे निकाल लागले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचे आज-उद्या निकाल लागतील. त्यानंतर खरी रॅट रेस चालू होईल. ही रेस चालू होण्याआधी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही ‘कोटा फॅक्ट्री' सिरीज आवर्जून पाहायला हवी म्हणजे कोटासारख्या ठिकाणांची जवळून ओळख होईल. 


एका सर्व्हेनुसार भारतात दर एका तासाला एका विद्यार्थ्यांची आत्महत्या होत आहे. जगात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणापैकी तब्बल सतरा  टक्के प्रमाण आपल्या देशातील आत्महत्यांचे आहे. ही बाब अतिशय भयावह आहे. अंगातल्या कलागुणांना, आवडी-निवडींना विचारात घेऊन करिअर निवडीचं स्वातंत्र्य यावं असा कदाचित आपल्या प्रशासनाचाही मनसुबा असावा. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या मुलांची ‘कल चाचणी’ घेतली जाते. यात त्या मुलाला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून त्याला योग्य असणारी करिअर शाखा सुचवली जाते. हा उपक्रम स्तुत्य आहे पण केवळ ‘कागदावरच’ अमलात आणला गेल्याचे दिसत आहे.  आजवर पर्यावरण, शारीरिक शिक्षण, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास या अशा विषयांना शाळांमधून निरस प्रतिसाद आला तसाच केवळ कागदोपत्री प्रतिसाद या कल चाचण्यांसाठी येताना दिसत आहे. या चाचण्या अधिकाधिक उत्तमरीत्या गांभीर्याने पार पडल्या तर कदाचित आताचं चित्र नक्कीच आशादायी स्वरूपात बदललेलं दिसेल आणि कामासोबत आशिकी करणाऱ्या पिढ्या तयार होऊ लागतील. नाहीतर कोटासारख्या फॅक्ट्ऱ्या चालूच आहेत ज्यातून मानसिक खच्चीकरण झालेले बायप्रॉडक्ट्स दर वर्षी बाहेर पडत आहेत जे ना नीटसं  इश्क करू शकताहेत ना काम. 

 

महेशकुमार मुंजाळे
maheshmunjale@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७