आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-७ परिषद बिअॅरित्झ-फ्रान्स : मोदींंची १५ नेत्यांशी भेट, तिघांशी केली द्विपक्षीय चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिअॅरित्झ - फ्रान्सच्या बिअॅरित्झमध्ये ४५ व्या जी-७ शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील १५ नेत्यांची भेट घेतली. ३ देशांच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. परिषदेच्या एका सत्राला संबोधितही केले. त्याआधी मोदींचे परिषदेसाठी आगमन झाल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वागत केले.

मोदींनी यूएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मोदींनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल, जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली. त्यादरम्यान मोदींनी ट्विट केले की, सरचिटणीसांशी अनेक मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली. आम्ही हवामान बदल रोखण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याबाबतही चर्चा केली. जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची त्यांच्याशी प्रथमच चर्चा झाली. मोदी म्हणाले की, ब्रिटनशी व्यापार, संरक्षण आणि नव्या संशोधनावर चर्चा झाली. भारत आणि ब्रिटनचे संबंध आगामी काळात आणखी मजबूत होतील. त्याशिवाय सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सेल यांच्याशी पंतप्रधान मोदींनी विकास आणि दहशतवादाच्या विरोधात काम करण्याबाबत चर्चा केली.
 

काश्मीरमधून ३७० हटवल्यानंतर प्रथमच जगातील अव्वल नेत्यांची मोदींनी घेतली भेट
काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जी-७ मध्ये मोदींनी प्रथमच जगातील अव्वल नेत्यांची भेट घेतली. मोदींनी या नेत्यांना काश्मीरबाबतचा भारताचा दृष्टिकोन सांगितला. त्यामुळे काश्मीर मुद्दा अजेंड्यातून बाहेर राहिला. परिषदेला जगातील २० देशांचे राष्ट्रप्रमुख हजर होते, पण कोणी त्याचा साधा उल्लेखही केला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनीही कुठलेही वक्तव्य जारी केले नाही.
 

परिषदेत काय-काय झाले?

ट्रम्प परिषदेदरम्यान हवामान बदल सत्रात आलेच नाहीत
> जी-७ परिषदेत एक सत्र हवामान बदलासाठी ठेवले होते. त्यात जी-७ च्या सर्व सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी भाग घेतला, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले नाहीत.
> सत्राचे नेतृत्व मॅक्रॉन यांनी केले, त्यांनी रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेले हाताचे घड्याळ सर्व नेत्यांना दिले.
> ब्रेक्झिटवर ब्रिटिश पीएम जॉन्सन यांची ईयू अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांच्याशी चर्चा झाली. जॉन्सन म्हणाले की, काहीही झाले तरी ब्रिटन ३१ ऑक्टोबरच्या आधी ईयूमधून बाहेर पडेल.
> अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अखेरच्या दिवशी इजिप्त, जर्मनी, भारत, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. 
> जी-७ चे सर्व सदस्य देश अॅमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये लागलेली आग लवकरात लवकर विझवण्याच्या मुद्द्यावर सहमत झाले. ते ब्राझील सरकारला आग विझवण्यास मदत करतील.
> २०२० मध्ये ४६ वी जी-७ परिषद अमेरिकेत होऊ शकते. ट्रम्प यांनी पुढील परिषद मियामीत घेण्याची इच्छा व्यक्त केली.
 

इराणी परराष्ट्रमंत्री परिषदेत, मॅक्रॉननी बोलावले; अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केली नाही चर्चा
 जी-७ मध्ये इराणला बोलावण्यास ट्रम्प तयार नव्हते, तरीही इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद जारिफ फ्रान्सला पोहोचले. फ्रान्सच्या  एका ज्येष्ठ नेत्यानुसार, आम्ही पूर्ण पारदर्शकतेसह अमेरिकेसोबत काम करत आहोत. त्यात आमचे युरोपमधील इतर भागीदारही सहभागी आहेत, सध्या अमेरिका आणि इराणमध्ये बैठकीची योजना नाही. इराणचे मंंत्री मॅक्रॉन यांच्या पुढाकारामुळे आले. मात्र, परिषदेत ट्रम्प तर सोडाच, अमेरिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने त्यांच्यांशी चर्चा केली नाही. इराणला सूट देणार नाही, असे ट्म्प यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...