आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराचा नारळ फुटला ; देश चालवण्यास ५६ पक्ष नाही, ५६ इंच छाती लागते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आघाडीला टाेला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर - ‘माेदी सरकारविराेधात महाआघाडीत ५६ पक्ष एकवटले असल्याचा दावा विराेधक करत आहेत. मात्र देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची नव्हे तर ५६ इंचांची छाती लागते,’ असा टाेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला लगावला. देशातील जनतेनेच ठरवले आहे की पुढचा पंतप्रधान पण नरेंद्र माेदीच हाेणार आणि लवकरच ते दिसूनही येईल. विराेधकांना आता उमेदवारही मिळेनासे झाले आहेत.  आता त्यांच्या कॅप्टननेसुद्धा (शरद पवार) माघार घेतली आहे. त्यांच्या पक्षाकडून तिकिटे परत केली जात आहेत. नुसता नावामध्ये राष्ट्रवाद असून चालत नाही, तर मनातून असावा लागतो,’ अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.  

 


शिवसेना-भाजप युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा रविवारी काेल्हापुरातील तपाेवन मैदानावर झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदी उपस्थित हाेते. मुख्यमंत्री म्हणाले, 'आमची हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे. हे हिंदुत्व संकुचित नाही. केवळ नावात राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नसतो. आठवलेंची भीमशक्ती व शिवशक्ती हीच देशभक्ती आहे. आमचे काँग्रेस-राष्ट्रवादीला खुले आव्हान आहे, त्यांनी गेल्या १५ वर्षांतील कामाचे आकडे घेऊन आमच्यासमाेर यावे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आमच्यावर इव्हेंट मॅनेजमेंट पार्टी म्हणून टीका करतात. पण राष्ट्रवादी, काँग्रेस हे 'भ्रष्टाचार व्यवस्थापन' पक्ष आहेत, त्यांनी आजवर खाल्लेला पैसा ओकायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

 


राज ठाकरे, राजू शेट्टींचा समाचार :

'हल्ली बारामतीचा पोपट जास्तच बोलू लागलाय. स्वतःला बोलता येत नाही म्हणून त्यांनी पोपट ठेवला. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. तुमचे कपडे काही शिल्लक राहणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत,' असा टाेलाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. त्यांचे वस्त्रहरण झाल्याने त्यांनी दुपारी शांत घरी बसून मोदी कसे पंतप्रधान होतात हेच पाहावे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत शिरले आहेत. कालपर्यंत शिव्या घालत होते आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याची टीकाही त्यांनी राजू शेट्टींवर केली. 

 

 

युतीविराेधात एकत्र ५६ पक्षांचे हातात हात आणि पायात पाय : उद्धव ठाकरेंचा विराेधकांना टाेला

‘शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे अशी जनतेची इच्छा होती. युती होण्यापूर्वी आम्ही संघर्ष केला, पण तो खुलेपणाने केला. लाेकांच्या प्रश्नांसाठी अाम्ही भांडलाे. पाठीत खंजीर खुपसणारे आम्ही नाही. आम्हाला सत्तेचा माेह नाही, सत्ता हवी ती जनतेसाठी,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभेत म्हणाले.  ‘युतीच्या विरोधात ५६ पक्ष एकत्र आले असून त्यांचे हातात हात आणि पायात पाय अशी अवस्था झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी एक क्रिकेटपटू  विराजमान होतो, पण शरद पवार अजून पंतप्रधान बनले नाही, तर क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर पोहोचले. त्यांना दरवेळी फक्त खुर्ची हवी असते. आमच्याकडे नरेंद्र माेदी हे पंतप्रधानपदाचे चेहरा आहेत. मात्र विराेधकांकडे या पदावर दावा करणारे शरद पवार, मायावती यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली,’ असे ठाकरे म्हणाले.

 

 

पवारांना मात्र पक्षात घेऊ नका : उद्धव ठाकरे
शरद पवारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपमध्ये अनेक नेते येत अाहेत. अाजकाल गिरीश महाजन दिसताच विरोधकांची धाकधूक वाढत आहे. पवारांना मात्र तेवढे पक्षात घेऊ नका.’
 

 

नरेंद्र पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी
या सभेच्या व्यासपीठावरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना साताऱ्यातून उदयनराजेंविराेधात उमेदवारी जाहीर करण्यात आली.

 

 

बातम्या आणखी आहेत...