आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा फडणवीसांचे नाव जाहीर केल्याने भाजप सत्तेपासून दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून सर्वात माेठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून दूर राहिल्याचे चित्र सध्या तरी आहे. याची कारणे शाेधण्याचे काम भाजपचे केंद्रीय नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातून सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भाजपच्या सत्तेपासून दूर राहण्याची पाच कारणे समाेर आली आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील, अशी घाेषणा केली, हीच पक्षाची माेठी चूक झाल्याचे मानले जाते. कारण फडणवीस यांचे नाव सुरुवातीलाच समाेर आल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी प्रचारकार्यात मर्यादितच सहभाग नाेंदवला. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात अपयश आल्यानंतर आता भाजपमधील फडणवीसविराेधी गट दबक्या आवाजात सांगत आहे की, निवडणुकीपूर्वीच जर फडणवीस यांचे नाव पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर केले नसते तर किमान मुख्यमंत्रिपदाच्या आशेने पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांनी मन लावून काम केले असते व पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणले असते.
 

या चुकांमुळे भाजपची पीछेहाट : भाजपचे केंद्रीय नेतृत्व व संघाच्या सर्वेक्षणात समाेर आलेले वास्तव
 
1 देेवेंद्र यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले. त्यासाेबतच पक्षाची दुसरी चूक म्हणजे भाजपचा प्रचार पूर्णपणे कलम ३७० हटवण्यावरच केंद्रित हाेता. पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात याच मुद्द्यांवर जाेर दिला. देश व राज्यात विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित असताना ते भाजपच्या भाषणातून दूरच राहिलेे.

2 राज्यातील भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते निवडणूक स्वबळावर लढण्यास इच्छुक हाेते. मात्र फडणवीस यांनी सेनेला साेबत घेतलेच पाहिजे ही गाेष्ट केंद्रीय नेतृत्वाकडे आग्रही मांडली व तसाच निर्णय घडवूनही आणला. युतीत लढल्यामुळे भाजपचा स्ट्राइक रेट वाढला असला तरी त्यांची आमदारसंख्या १२२ वरून १०५ पर्यंत घटली.

3 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज घेण्यास फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या गाेटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत हे भाजपने माहिती करून घेणे आवश्यक हाेते व त्यानुसार आपली रणनीती ठरवायला हवी हाेती. ही जबाबदारी फडणवीस यांचीच हाेती.
4 भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रचारात माेठी जबाबदारी देणे टाळले, ही पक्षाची तिसरी चूक. गडकरींचे कट्टर समर्थक तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापण्यामुळेही चुकीचा संदेश गेला. विदर्भात गडकरींचे महत्त्व अजूनही फडणवीस यांच्यापेक्षा जास्त आहे. जेव्हा प्रचारादरम्यान गडकरींना अलिप्त ठेवण्याचा संदेश विदर्भात पसरला तेव्हा हे डॅमेज कंट्राेल करण्यासाठीही पक्षाकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत.

शरद पवारांवर ईडी कारवाईचे फासे उलटले
1 शरद पवार हे मराठा समाजातील दिग्गज नेते आहेत. मात्र राज्यात मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे हा समाज पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, असा भाजपचा समज हाेता, ताे काही प्रमाणात सत्यही हाेता. मात्र, शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा व त्यानंतर चाैकशीसाठी स्वत: पवारांनी जाण्याची दाखवलेली तयारी या नाट्यामुळे वातावरण बदलले. मराठा समाजात यामुळे भाजपविराेधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
2 राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी २०१४ मध्ये भाजपला सहकार्याची भूमिका जाहीर केली हाेती. मात्र, याच पटेल यांच्याविराेधात ईडी चाैकशीची ससेमिरा लागला, त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी पसरली. अशा काही चुका केल्यामुळेच १०५ जागा मिळवून सर्वात माेठा पक्ष ठरलेला भाजप सत्तेपासून मात्र दूर राहिल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.