Home | Maharashtra | Mumbai | BJP ask about Raj Thackeray rally

‘राज’सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात मांडाल? भाजपचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 14, 2019, 09:58 AM IST

राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय, राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच

  • BJP ask about Raj Thackeray rally

    मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उभा नसताना अध्यक्ष राज ठाकरे प्रचारसभा घेत आहेत. त्यांच्या जाहीर प्रचारसभा कोणासाठी आणि त्यांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवायचा, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांना याबाबत पत्र पाठवले.

    राज ठाकरे हे या सभांमधून मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या-शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. या सभांचा खर्च कोणताच उमेदवार निवडणूक प्रचार खर्चात दाखवत नाही. आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखवला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही, असे तावडे यांनी पत्रात म्हटले आहे.

    पत्रानुसार, या सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नाव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परंतु राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. तसेच राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचे स्पष्टीकरण घ्यावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Trending