जळगाव मतदारसंघातही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली

प्रतिनिधी

Apr 04,2019 11:14:00 AM IST

जळगाव | जळगाव लाेकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदलणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू हाेती. यासंदर्भात मुंबईत झालेल्या घडामाेडीनंतर रात्री उमेदवार बदलण्यावर खल सुरू होता. आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असून, ते गुरुवारी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जळगावातील भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदलाच्या हालचाली मंगळवारी सुरू झाल्या हाेत्या. बुधवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबईत पाेहाेचल्यानंतर या घडामाेडींना वेग आला. आमदार स्मिता वाघ या बुधवारी चाळीसगाव, पाराेळा तालुक्यात प्रचार दाैऱ्यावर हाेत्या. जिल्हाभरात उमेदवार बदलल्याच्या चर्चा सुरू असल्याने ‘दिव्य मराठी’ने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. दरम्यान, पक्षांतर्गत घडामाेडींविषयी कुणीही स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार जळगावात उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला असून, केंद्रीय पार्लमेंटरी बाेर्डाकडून त्याची अधिकृतपणे घाेषणा केली जाणार आहे. गुरुवारी आमदार उन्मेष पाटील यांना अर्ज दाखल करण्याची तयारी करून ठेवा, असा निराेप देण्यात आला आहे. त्यामुळे चाळीसगाव येथे आमदार उन्मेष पाटील यांच्या समर्थकांनी फटाके फाेडून आनंद साजरा केला. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. तर मंत्री महाजन यांनी कानावर हात ठेवले. मला अधिकृतपणे माहिती नसून, पक्षश्रेष्ठीच याबाबत बाेलू शकतील असे ते म्हणाले.

२०१४ मध्ये रावेर मतदारसंघात तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांची जाहीर झालेली उमेदवारी कापून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली हाेती. आता जळगावातही एेनवेळी उमेदवार बदलला असल्याची चर्चा भाजपच्या गाेटात हाेती. चाळीसगावात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली.

X
COMMENT