आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती झाल्यास खैरे \'कसे\' निवडून येतात ते पाहू, न झाल्यास स्वत:ही निवडणूक रिंगणात उडी घेऊ : तनवाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पूर्ण तयारी झाली आहे. बूथपर्यंत यंत्रणा सज्ज आहे. युती न झाल्यास औरंगाबादेतून भाजपचाच खासदार राहील. मी स्वत: इच्छुकही आहे. तसेच युती झाल्यास विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे 'कसे' निवडून येतात हे पाहू, असे माजी आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केले. 


रस्त्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी ते शुक्रवारी मनपा मुख्यालयात आले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तनवाणी म्हणाले, भाजप जिल्ह्यात मजबूत झाला आहे. त्यामुळे युती झाली नाही तर आम्ही येथे एकतर्फी जिंकू शकतो, हा आम्हाला विश्वास आहे. युती झाली नाही तर भाजपला काहीही फरक पडणार नाही. आम्ही सहज विजय मिळवू, असा दावा त्यांनी केला. उमेदवार कोण असेल यावर ते म्हणाले, आम्ही कोणाचेही नाव सुचवलेले नाही. परंतु, पक्षाने संधी दिल्यास मी स्वत: इच्छुक आहे. चार वेळा खासदार असल्याने खैरे यांच्याविरोधात असंतोष (अँटी इन्कम्बन्सी) आहे. त्यामुळे युती झाली तरी खैरेंना ही निवडणूक अवघड जाईल. त्यामुळे सेनेने हा मतदारसंघ आमच्याकडे द्यावा, अशी आमची मागणी असून तशा भावना श्रेष्ठींकडे कळवल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही येथे मैत्रीपूर्ण लढतीचीही परवानगी मागितली आहे. मैत्रीपूर्ण लढतीतही आमचाच खासदार जिंकून येईल. अर्थात आमची मागणी मान्य झाली नाही आणि युती झालीच तर खासदार खैरे हे 'कसे' निवडून येतील यासाठी 'एक नंबर' प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. 


शिवसैनिकच खैरेंना पाडण्याचा प्रयत्न करतील 
युती झाल्यानंतर खैरे 'कसे' निवडून येतील ते आम्ही 'पाहू', याचा खुलासा करताना ते म्हणाले, युतीत खासदार खैरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच राहणार आहे. कारण खैरे यांना पाडण्यासाठी शिवसेनेचेच पदाधिकारी प्रयत्न करतील, असा दावा त्यांनी केला. अर्थात ते पदाधिकारी कोण हे त्यांनी सांगितले नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला खासदारांची गरज आहे. 


अमुक एका नावाची शिफारस नाही : 
जालन्यात झालेल्या समितीच्या बैठकीत स्थानिकांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी काही नावांची सूचना केल्याची चर्चा आहे. तनवाणी म्हणाले, कोणाच्याच नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, लोकसभा लढण्यास इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे ते म्हणाले. 
 

 

बातम्या आणखी आहेत...