आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकांमध्ये वाद नाही, पक्षात अतिशय उत्तम वातावरण- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता
  • अर्थकारणावरून थेट आरोप करणाऱ्या निमसेंसह गटबाजी करणाऱ्यांचा मुंबईत फैसला

नाशिक- महापालिकेत स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे निर्माण होऊन पक्षनेतृत्वावरच आरोप केले जात असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र रविवारी भाजप नगरसेवकांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसून सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्तम वातवरण असल्याचे सांगितल्याने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, बंद दाराआड झालेल्या चर्चेत आर्थिक आरोपांची शहानिशा करण्याबरोबरच निमसे यांच्याविरोधात नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची चाैकशी करण्यासाठी सर्व संबंधितांना मुंबईत बोलावल्याचे वृत्त आहे.

पाटील रविवारी (दि. १) नाशिकमध्ये आले असता पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. गेल्या महिन्याभरापासून महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्य पदाच्या निवडीपासून सभापती निवड आणि वादग्रस्त कोट्यवधींचे विषय मंजूर करण्यावरून राजकारण तापले आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपत महापाैरांसह इतर पदाधिकारी विरुद्ध स्थायी समिती सभापती असे चित्र निर्माण झाले होते. त्यातच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांच्या अधिकारात सभापतीपदी मनसेच्या सदस्याची हंगामी निवड घोषित करून पक्षाला घरचा आहेर दिला. एवढ्यावरच न थांबता निमसे यांनी पक्षाच्या नेत्याकडून काही दिवसांपासून अवास्तव मागण्या केल्या जात असल्याने व त्या आपण पूर्ण न करू शकल्याने षडयंत्र रचल्याचा जाहीरपणे आरोप केला. या पार्श्वभूमीवर रविवारी पाटील नाशिक दाैऱ्यावर आल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पत्रकारांशी वार्तालापादरम्यान पाटील यांना नगरसेवकांमध्ये निर्माण झालेली गटबाजी व आर्थिक आरोपांबाबत छेडले असता, त्यांनी नगरसेवकांमध्ये कुठलेही वाद अथवा गटबाजी नसल्याचे सांगत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले.


त्याही पुढे जाऊन नगरसेवक एकमेकाविरोधात बोलले म्हणजे ते जिवंतपणाचे लक्षण असून मत व्यक्त करण्यात मतविभिन्नता असू शकते; पण मतभेद नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.बैठकीस खासदार डाॅ. भारती पवार, महापाैर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रा. सुहास फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, सुनील बागूल, देवदत्त जोशी आदी उपस्थित होते.


पाटील यांनी पक्ष कार्यालयात शहरातील तिन्ही आमदार, महापाैरांसह स्थायीचे सदस्य व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बंद दाराआड चर्चेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच बसू दिले. तासभर झालेल्या बैठकीत पाटील यांनी निमसे यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली. तर त्यांच्या अनुपस्थितीत आमदार व नगरसेवकांची मते जाणून घेतली. यामध्ये बहुतांश नगरसेवकांनी निमसे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. पक्षाच्या नेत्यांविरोधात झालेल्या आरोपांबाबत विचारले असता जिल्ह्याच्या राजकारणात पाच वर्षांपासून ‘पालकत्व’ स्वीकारलेल्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांकडून कुठलीही निवडणूक असो की महापुररुषांच्या जयंती-पुण्यतिथी, मेळावे, अधिवेशन आले की केवळ खर्च करण्याचे आदेश दिले जायचे, त्याची अंमलबजावणी करूनही पदरात काहीच पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही बाजू एेकून घेत अखेर पाटील यांनी निमसे व कोअर कमिटीच्या सदस्यांना मुंबईत पक्षकार्यालयात चर्चेसाठी बोलविले. पक्षात बेशिस्तीचे दर्शन घडविणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी निष्ठावंतांनी लावून धरल्याने त्यावरही मुंबईत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.