आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवक कुलभूषण पाटलांवर प्राणघातक हल्ला; दोघे पसार, हल्लेखोरांचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-पिंप्राळ्यातील कुंभारवाड्यात राहणाऱ्या महिलेला मारहाण करीत चोरट्यांनी घरात घुसून १ लाख १० हजारांसह मोबाइल चोरून नेला होते. सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली होती. मात्र, ते सीसीटीव्ही फुटेज प्रभाग क्रमांक १०चे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी दिले असल्याच्या संशय दोघा अारोपींना होता. त्याचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वाजता सोमाणी मार्केटमधील संपर्क कार्यालयात घुसून शिवीगाळ करीत दोघांनी मारहाण करून हल्ला चढवत पाटील यांना कुऱ्हाडीने मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. 


पिंप्राळ्यात कुंभारवाड्यातील महिलेसह तिच्या घरातील पाहुण्याला मारहाण करीत १० जुलै रोजी तिघांनी १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणात रामानंदनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. त्याबाबत महिलेने सहायक पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अखेर १५ जुलै रोजी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. छाया पीतांबर बैरागी (रा. कुुंभारवाडा, पिंप्राळा) ही महिला १० जुलै रोजी रात्री मुलगा व अनिल चांगरे या व्यक्तीसह घरात होती. त्या वेळी काही एक कारण नसताना बैरागी, त्यांचा मुलगा यश व चांगरे यांना अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, विशाल भिकन कोळी व बंटी तिघांनी घरात घुसून मारहाण केली होती. त्यानंतर बैरागी या रामानंदनगर पोलिस ठाण्यात अाल्या. या प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार िदली. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन बघितले. त्यांच्या घरातून ३५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, दुचाकी विक्रीतून मिळालेले ४० हजार व अार्थिक व्यवहाराचे ३५ हजार असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणात कुंभारवाडा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे रामानंदनगर पोलिसांनी विशाल कोळी व अक्षय धोबी या दोघांना १५ जुलै रोजी अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना शुक्रवारीच जामीन मिळाला. पोलिसांना हे सीसीटीव्ही फुटेज नगरसेवक पाटील यांनी दिले असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री विशाल कोळी व अक्षय धोबी हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन पाटील यांना मारण्याच्या उद्देशाने पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट येथे गेले. कुलभूषण पाटील हे मित्रांसोबत त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर बसलेले होते. यावेळी या दोघांनी संपर्क कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारून अात प्रवेश करून मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली. 


जामिनावर सुटताच काढला वचपा; परिसरातील लोक गोळा होताच काढला पळ 
नगरसेवक पाटील यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुजेट दिले होते. त्यामुळे जामिनावर सुटल्यानंतर शुक्रवारी रात्री विशाल कोळी व अक्षय धोबी हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन पाटील यांना मारण्याच्या उद्देशाने पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट येथे गेले. तुम्ही मातले अाहात, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज का दिले, तुला कुऱ्हाडीने मारून टाकतो, अशी धमकी देत विशाल कोळी याने पाटील यांना िशवीगाळही केली. तर अक्षय धोबी याने शिवीगाळ करून याला मारून टाका, असे म्हणाला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. नगरसेवक पाटील यांनी विशालच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली. यात त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर नगरसेवक पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विशाल कोळी व अक्षय धोबी या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४५२, ५०४, ५०६, ५१० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला. दरम्यान, या घटनेनंतर दोघे संशयित फरार झालेले अाहेत. पोलिसा या दोघांचा कसून शोध घेत आहेत.