आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे १२ सवर्ण, जदयूचे १३ आेबीसी-एससी उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - भाजपने शुक्रवारी रात्री व शनिवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणखी तीन याद्या जाहीर केल्या. त्यात सर्व ६४ नावांचा समावेश आहे. अशा प्रकारे पक्षाने आतापर्यंत एकूण ५ याद्यांद्वारे २४९ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने तिसऱ्या यादीत ३६ उमेदवारांचा समावेश केला. यात आंध्र प्रदेशातील २३ उमेदवार, महाराष्ट्रातील ६, आेडिशातून ५ व आसाम तसेच मेघालयातील प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली. पक्षाची चौथी यादी बिहारमधून जाहीर झाली. पाचव्या यादीत ११ उमेदवारांची नावे आहेत. त्यात तेलंगणातील ६ उमेदवार, उत्तर प्रदेशातील तीन तर पश्चिम बंगाल व केरळमधील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातून प्रदीप चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या जागेवरील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत होण्याची वेळ आली होती. भाजपने आंध्र प्रदेशातील २५ जागांवरील उमेदवारांचीही घोषणा केली आहे.

 

तेलंगणातील १७ पैकी १६ जागांवरील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित मानली जातात.  दुसरीकडे शनिवारी रालोआने बिहारमधील ४० पैकी ३९ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. खगडियाच्या लोजप उमेदवाराची घोषणा नंतर होणार आहे. भाजपने हुकूमदेव नारायण यादव यांचे पुत्र अशोक यादव यांना मधुबनीचे तिकीट दिले आहे. कीर्ती आझाद यांच्या जागी गोपालजी ठाकूर यांना दरभंगा मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे.   
काँग्रेसची सातवी यादी : पक्षाने ३५ उमेदवारांची नावे जाहीर केली. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राज बब्बर यांच्या मतदारसंघातही बदल करण्यात आला आहे. मुरादाबादऐवजी ते फतेहपूरमधून निवडणूक लढवतील.  

 

 

बिहार : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ३९ उमेदवारांत ७ राजपूत, ३ भूमिहार

बिहारमध्ये रालोआच्या ३९ उमेदवारांपैकी ७ राजपूत , ३ भूमिहार, ७ अति मागास, ३ कुशवाह, ३ वैश्य, ५ यादव समुदायाचे आहेत. तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी एका महिलेला जागा दिली आहे. भाजपने सवर्णांना, जेडीयूने आेबीसी व अति मागास वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे १७ पैकी १२ उमेदवार सवर्ण आहेत. यादव समुदायातील दोन उमेदवार, अनुसूचित जातीतील एकास तिकीट दिले. रालोआच्या ३९ चेहऱ्यांमध्ये एक मुस्लिमदेखील आहे. जेडीयूने आपल्या कोट्यातील १७ जागांपैकी १३ जागी आेबीसी व मागास वर्गातील लोकांना उमेदवारी दिली आहे. किशनगंजमधून महमूद अशरफ रिंगणात असतील. लोजपने ६ पैकी ३ जागी पासवान समुदायाचे उमेदवार उतरवले आहेत.  

 

 

भाजपने गिरिराज यांना बेगुसरायला पाठवले, गतवेळी नवादातून विजयी  

२०१४ मध्ये २२ जागी विजय मिळवणाऱ्या भाजपने यंदा १७ जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजपने २८ जागांवर निवडणूक लढवली होती. आघाडीमुळे भाजप खासदार सतीशचंद्र दुबे, वीरेंद्रकुमार चौधरी, जनकराम, आेमप्रकाश यादव, हरी मांझी यांच्या जागा सहकारी पक्षाला दिल्या आहेत. नवादामधून भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांना बेगुसरायचे तिकीट दिले आहे. २०१४ मध्ये बेगुसरायमधून भाजपचे भोला सिंह विजयी झाले होते. नवादा भाजपने लोजपला दिले . भाजप यंदा विजय मिळवलेल्या १६ जागांशिवाय अररियामधूनही निवडणूक लढवणार आहे. पूर्व चंपारणमधून राधामोहन, सारणमधून रुडी, अश्विनी चौबे (बक्सर) तर पूर्व चंपारणमधून राधामोहन सिंह लढतील.