आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती तुटली तरी भाजपकडून दावा नाही; मुंबईत महापाैर शिवसेनेचाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महापाैरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर व इतर नेतेमंडळी. - Divya Marathi
मुंबई महापाैरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर व इतर नेतेमंडळी.

मुंबई - पुढील अडीच वर्षांसाठी मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी  शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचेच सुहास वाडकर यांची नावे निश्चित झाली अाहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या दाेघांचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे २२ नाेव्हेंबर राेजी त्यांची बिनविराेध निवड हाेण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. 

२२७ सदस्य संख्या असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ (नंतर मनसे व अपक्षांच्या मदतीने ९४), भाजपचे ८२, काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वबळावर लढले. दाेन्ही पक्षांच्या सदस्य संख्येत केवळ २ जागांचा फरक हाेता. मात्र, राज्याच्या सत्तेत युती असल्यामुळे त्या वेळी भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली हाेती. मात्र, आता भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या महापाैरपद निवडणुकीत भाजप दावा करेल, अशी शक्यता हाेती, मात्र ती फाेल ठरली. भाजपने महापौरपदाचा उमेदवार न दिल्याने शिवसेेनेची चिंता दूर झाली. दुसरीकडे, राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेशी जवळीक वाढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अर्ज भरणार नसल्याचे जाहीर केले हाेते.माताेश्रीवर ठिय्या


महापौर पदासाठी मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विशाखा राऊत, बाळा नर, रमाकांत रहाटे तसेच राजुल पटेल हे इच्छुक होते. या सर्वांनी ‘माताेश्री’वर ठाण मांडले हाेते. अर्ज भरण्याची वेळ ३ ते ६ वाजेपर्यंत होती. मात्र, संध्याकाळी सव्वापाच वाजता ‘मातोश्री’वरून अंतिम नावे जाहीर करण्यात आली.यशवंत जाधव, रमाकांत रहाटेंचे नाव मागे पडले

सकाळपर्यंत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेच नाव महापौर पदासाठी आघाडीवर होते. तर अर्ज भरण्याच्या पाऊण तास आधी उपमहापौर पदासाठी रमाकांत रहाटे यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचे पक्षातून अभिनंदनही सुरू झाले असतानाच अचानक त्यांचे नाव मागे पडले व सुहास वाडकर यांच्या नावाचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे सांगितले जाते. वाडकर हे  पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.
 

वरळीतून पाचवा महापौर

वरळी मतदारसंघातून आतापर्यंत पाच जणांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी दत्ताजी नलावडे, नंदू साटम, महादेव देवळे, स्नेहल आंबेकर यांनी शिवसेनेकडून महापौरपद भूषवले होते. किशोरी पेडणेकर यांना या वेळी संधी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले आहेत. त्यांच्या विजयासाठी पेडणेकर यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्याची बक्षिसी त्यांना मिळाली.

शिवसेनेत गटबाजी  

यंदा महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा महापौर दालनातच नगरसेवकांनी पालिकेतील सेनेचे कारभारी आमदार अनिल परब यांच्यासमोरच विरोध दर्शवला. त्यामुळे महापौर पदाचे नाव जाहीर होण्यास सायंकाळचे साडेपाच वाजले.
 बातम्या आणखी आहेत...