आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे 'ईडी' शस्त्र बूमरँग होईल, राजकारण काँग्रेसचेे नेते माजी खासदार राजीव सातव यांचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : राज्यात सत्ता स्थापनेसाठी हपापलेल्या भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी चौकशीचा दबाव आणून त्यांचा पाठिंबा मिळविल्याची शक्यता असून भाजपचे 'ईडी' शस्त्र बूमरँग होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी खासदार राजीव सातव यांनी केला आहे.

राज्यात सत्ता स्थापनेच्या घडलेल्या राजकीय घडामोडींवर बोलताना सातव म्हणाले की, भाजपकडून राज्यात सत्ता स्थापनेसाठी साम, दाम, दंडाचा वापर केला जात आहे. त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. इतर राज्यांत त्यांनी केलेला बळाचा वापर यशस्वी झाला तरी महाराष्ट्रात मात्र भाजप नेते तोंडघशी पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बहुमत सिद्ध करता येणार नाही


महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध लढा देण्याची परंपरा आहे, स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर त्याला उत्तर देण्याची परंपरा आहे हे भाजप नेत्यांनी विसरून चालणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाठिंब्यासाठी 'ईडी'चे शस्त्र वापरून दबाव आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणार नाही. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून भाजपचे प्रयत्न उधळून लावले जातील. तर, भाजप नेत्यांचे 'ईडी'चे शस्त्र बूमरँग होणार असल्याचा दावाही सातव यांनी केला आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे स्थिर सरकार स्थापन होणार होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काँग्रेस नेते वेणूगोपाल, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांसोबत बैठक घेत असल्याचेही काँग्रेसचे नेते माजी खासदार सातव यांनी स्पष्ट केले.

उस्मानाबाद पालकमंत्री म्हणून आमदार राणाजगजितसिंहांच्या नावाच्या पोस्ट व्हायरल


भाजपने रात्रीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही झपाट्याने बदलली आहेत. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना सोशल मीडियावर कालपर्यंत ट्रोल केले जात होते. मात्र, भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करताच त्याच नेत्यांच्या बाजूने सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी (दि.२३) शहरात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर, भावी पालकमंत्री म्हणून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.राज्याच्या राजकारणात महिनाभरापासून अस्थिरता व अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच शनिवारी सकाळी राज्याला धक्कादायक बातमी पाहायला मिळाली. भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सत्ता स्थापन केल्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर विविध स्वरूपांच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. या पोस्टमध्ये स्थानिक राजकारणाचे भवितव्य सांगणाऱ्या पोस्टही महत्त्वाच्या होत्या.

परभणीत भाजपच्या समर्थकांचा जल्लोष


मुख्यमंत्रिपदी देवेंंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी शपथ घेताच शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या समर्थकांनी शहरातील विविध भागांत फटाक्यांची अातषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण केली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी चौकात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

लोहारा लोहाऱ्यात जल्लोषामध्ये भाजपमधील गटबाजीचे दर्शन


मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याने लोहारा शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु एका गटाने आधी तर दुसऱ्या गटाने त्यानंतर त्याच ठिकाणी मोठा जल्लोष केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात ५ ते ६ वर्षांपूर्वी भाजपचे मोजकेच सक्रिय कार्यकर्ते होते.दरम्यान, राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी शहरातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाचे जुने कार्यकर्ते व नवीन आलेले कार्यकर्ते असे दोन गट निर्माण झाल्याचे दिसून आले.

नांदेड भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव


भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पुतळ्यासमोर सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात जमा झाले. ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी भांगडा नृत्य करत नागरिकांना पेढे वाटले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी जि. प. सदस्य प्रवीण चिखलीकर, दिलीप ठाकूर, भाजयुमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजय कोडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख व श्रावण भिलवंडे आदी उपस्थित होते.

नांदेड अजित पवारांचा निर्णय स्वागतार्ह : खासदार चिखलीकर


गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महाआघाडीला जनादेश दिल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडून दिल्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. स्थिर सरकार देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.

पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या एक महिन्यापासून जे राजकीय नाट्य सुरू होते, त्यावर पडदा टाकण्याचे काम अजितदादा पवार यांनी करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा धाडसी निर्णय घेतला. येत्या ३० तारखेला विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार यांचे सरकार बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊन शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचे काम या सरकारच्या हातून घडेल असा मला विश्वास असल्याचेही खा. चिखलीकर यांनी म्हटले आहे.

लातूर जनतेच्या विश्वासावर स्थापन झालेले सरकार : निलंगेकर


महाराष्ट्रातील जनतेने भाजपला जनादेश दिला होता. हा जनादेश आणि जनतेच्या विश्वासावर हे सरकार स्थापन झाले आहे. मागच्या पाच वर्षांत भाजप सरकारने जी विकासकामे हाती घेतली होती ती या नव्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील, असा दावा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

लातूर राष्ट्रवादीचे दोन आमदार कुणासोबत?


उदगीरमधून निवडून आलेले संजय बनसोडे व अहमदपूरमधून दुसऱ्यांदा आमदार झालेले बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे लातूर जिल्ह्यात दोन आमदार आहेत. शनिवारी सकाळी जेव्हा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी हे दोन्ही आमदार अजित पवारांसोबत होते. या दोघांपैकी कुणीही शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती आहे.