आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने मित्रपक्षांना ‘जागा’ दाखवली! उद्धव ठाकरेंचा टोला; विविध समाजनेत्यांसोबत साधला संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘निवडणूक म्हणजे लोकशाहीतील युद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे सर्व मावळे एकजुटीने युद्धात उतरत असत त्याचप्रमाणे आपण सगळे आता या निवडणुकीच्या युद्धाला सामोरे जाऊ आणि भगवा फडकवू,’ असे अावाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात विविध समाजातील नेत्यांना केले. धनगर समाजाच्या अारक्षणाचा प्रश्नही नवे सरकार सोडवेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 
 

युतीत भाजपच मोठा भाऊ ठरला व शिवसेना व इतर मित्रपक्षांना कमी जागा मिळाल्या, याविषयी जोरदार चर्चा सुरू अाहे. हा धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही (शिवसेना) १२४ जागा लढवतोय. बाकी जागा भाजप आणि मित्रपक्ष लढवताहेत. वेळ कमी आहे. १२४ मतदारसंघांत प्रचार करणे महत्त्वाचे आहे. भाजपने मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवली आहे म्हणजे जागा दिली आहे,’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
 

ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजाच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रंगशारदा सभागृहात एक बैठक झाली. या वेळी यवतमाळचे हरिभाऊ राठोड आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे या दोन नेत्यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांचे त्यांनी काठी आणि घोंगडे देऊन स्वागतही केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, निवडणुकीचे अर्ज भरून झाल्यानंतर शिवसेनेला समर्थन देण्यासाठी तुम्ही आला हे खूप महत्त्वाचे आहे. नाही तर प्रत्येक जण स्वतःसाठी काहीतरी मागून घेण्यासाठी येतो, परंतु आज तुम्ही समाजासाठी मागितले. आजच नव्हे तर इतकी वर्षे आमच्यासोबत काही जण आहेत, परंतु त्यांनीही स्वतःसाठी कधीही काहीही मागितले नाही. आपले सरकार आता पुन्हा येणार असून या मागण्यांचा पाठपुरावा आता तुम्हाला करावा लागणार नाही तर मी स्वतः पाठपुरावा करेन. दिलेल्या शब्दाला जागायचे हे शिवसेनेचे तत्त्व आहे. तुमच्या मागण्यांसाठी मी वचनबद्ध आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
 

‘प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला तुम्ही जात लावू नका. जर माझे सरकार असेल तर माझे कर्तव्य आहे की राज्यात कुणीही भुकेला राहता कामा नये. समाजाचे नेते हे जागांसाठी शिवसेना महायुतीबरोबर आलेले नाहीत, ते आमचे मित्र आहेत,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
सर्व जाती-पाती व समाजाचे लोक माझ्याबरोबर आहेत. या अगोदरच्या युतीच्या सरकारमध्ये सरमिसळ होती, कारण सुरूवातीला आम्ही निवडणुकीत बरोबर नव्हतो. आम्ही निवडणूक स्वतंत्र लढलो. नंतर आम्ही एकत्र आलो. यामुळे त्यांनी काही दिलेली आश्वासने असतील, काही आम्ही दिलेली वचने असतील या सगळ्यांची सांगड घालत घालत गेली पाच वर्षे कारभार झाला. या काळात मराठा, धनगर या समाजांच्या मागण्या पूर्ण करून त्या अंमलात कशा आणायच्या यासाठी पावले टाकली गेली. धनगरांना आरक्षण देताना आम्ही आदिवासींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, त्यामुळे यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत, असेही ठाकरेंनी सांगितले.