आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडीत भाजपला मतभेदच भोवले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सुरुंग लावून एकापाठोपाठ एक संस्था आणि सत्ताकेंद्रे ताब्यात घेणाऱ्या भाजपचा वारू कसा रोखायचा असा प्रश्न काँग्रेसजनांना पडला होता. परंतु भाजपतील अंतर्गत मतभेदांमुळे भाजपलाच आपोआपच सुरुंग लागला आहे. भाजपच्या दाेन नगरसेवकांनी बंडखाेरी केल्याने विक्रांत गाेजमगुंडे महापाैरपदी तर भाजपचे बंडखाेर चंद्रकांत बिराजदार उपमहापाैर बनले.


पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर लातूरचे पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंकडे होते. पुढे दीड वर्षांनंतर निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना लातूरचे पालकमंत्री करून जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर झालेल्या नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीत १० पैकी ७ नगर पालिकांवर भाजपची सत्ता आली. जि. प.तही स्पष्ट बहुमत मिळवले. १० पैकी ८ पंचायत समित्याही ताब्यात घेतल्या. विशेष म्हणजे एकही नगरसेवक नसणाऱ्या लातूर मनपात भाजपने ३६ नगरसेवक निवडून आणत सत्तांतर घडवून आणले. मात्र त्याचवेळी लातूरमधील रमेश कराड, उदगीरचे माजी आ.सुधाकर भालेराव, माजी खा. सुनील गायकवाड हे निलंगेकरांच्या विरोधात गेले. फडणवीसांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांनी औशातून लढण्याची तयारी दाखवताच त्यांनाही निलंगेकर गटातून विरोध झा. लोकसभेला केंद्रातील नेत्यांनी तंबी दिल्यामुळे सगळे नेते एक झाले आणि लातूरमध्ये भाजपचा खासदार निवडून आला. मात्र ही एकी विधानसभेत पार धुळीला मिळाली. सुधाकर भालेरावांचे तिकीट कापण्यात आले. रमेश कराडांचा लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सोडला. औशात पवारांच्या विरोधात जि.प.त कृषी सभापती असलेल्या भाजपच्या बजरंग जाधव यांनी बंड केले. त्याचा फटका बसून जिल्ह्यातील ४ पैकी केवळ दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यातच राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे पुढच्या निवडणुकांत भाजपला फटका बसणार असे चित्र दिसत होते. त्याची प्रचिती लातूरच्या महापौरपदाच्या निवडीत झाली. भाजपने शैलेश गोजमगुंडेंना उमेदवारी दिली. ते निलंगेकर गटाचे समजले जातात. मात्र त्याचवेळी आमदार अभिमन्यू पवारांचे निकटवर्तीय असलेले चंद्रकांत बिराजदार यांनी बंड केले. हे बंड शमवण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसले नाहीत.

'हमे तो अपनो ने लुटा'


'हमे तो अपनों ने लुटा, गैराें मे कहाँ दम था, मेरी कश्ती ही डुबी वहाँ, जहाँ पानीही कम था' या चित्रपटातील एका गाण्याच्या ओळींचा दाखला देत माजी मंत्री संभाजी निलंगेकरांनी भाजपतील बंडखोरी अधोरेखित केली. निलंगेकरांनी 'एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यात त्यांनी वरील गाण्याच्या ओळीचा संदर्भ दिला. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अभिमन्यू पवारांकडे होता. आपल्याच माणसांनी दगा दिल्यामुळे भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस निवडून आली असे त्यांना कदाचित सूचवायचे होते. त्याचबरोबर काँग्रेसकडून लोकशाहीचा खून झाल्याचे ते म्हणाले.

बंडखोर दुसऱ्या पक्षातून आलेले


लातूर मनपात बहुमत असतानाही भाजपला महापौरपद गमवावे लागले. यासाठी कारणीभूत ठरले ते चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड हे भाजपचे दोन बंडखोर नगरसेवक. या दोघांनी विरोधात मतदान केले. बिराजदारांनी काँग्रेसशी संधान साधून उपमहापौरपद मिळवले. अडीच वर्षांपूर्वी हे दोघेही भाजपत आले होतेे. बिराजदार मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली होती. तर गीता गौड या मूळच्या मनसेच्या. आपण मनसेतून निवडून येऊ शकत नाही हे लक्षात आल्यने त्या भाजपत गेल्या.
काँग्रेस अपेक्षा पूर्ण करेल- आ. अमित देशमुख : अडीच वर्षांच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाची लातूर मनपात सत्ता आली आहे. नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूरकर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील, अशी प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे.

बंडखोरांवर कारवाई आ. अभिमन्यू पवार


आमदार अभिमन्यू पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या नगरसेवक चंद्रकांत बिराजदार यांनी बंडखोरी केल्यामुळे लातूर मनपात भाजपचा पराभव झाला. याबाबत अभिमन्यू पवारांनी मनपात नगरसेवकांनी बंडखोरी करायला नको हीत. जे झाले ते चुकीचे झाले. बहुमत असल्यामुळे भाजपाचा उमेदवार जिंकणे अपेक्षित होते. परंतू निकालात तसे घडले नाही. पक्षाच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे मत आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.