आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Government Does Not Bring Ujani Water For Latur MLA Amit Deshmukh Accuses BJP Of Inaction

भीषण टंचाईने होरपळलेल्या लातूरकरांसाठी भाजप सरकारने उजनीचे पाणी आणले नाही - अमित देशमुखांचा भाजपवर निष्क्रियतेचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूरला उजनीचे पाणी आणणार असे आश्वासन देऊन भाजपची मंडळी सत्तेवर आली. तीन वर्षांपूर्वी मांजरा धरण आटल्यामुळे लातूरकर पाणीटंचाईने होरपळले. मात्र त्यातून धडा न घेता निष्क्रीय भाजपा सरकारने उजनीहून पाणी आणण्याचे आश्वासन पाळले नाही, असा आरोप काँग्रेसचे लातूर शहराचे उमेदवार अमित देशमुख यांनी केला.

लातूर जिल्हा काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व सहा उमेदवारांची भूमिका मांडण्यासाठी लातूरमध्ये सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, उमेदवार धीरज देशमुख, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, अशोक पाटील निलंगेकर यांची यावेळी उपस्थिती होती.

अमित देशमुख पुढे म्हणाले की उजनी धरण भरून उलथत असले भाजपा शासनाच्या नाकर्तेपणामुळे तहानलेल्या लातूरकरांना त्यातला एकही थेंब मिळणार नाही. उजनीचे पाणी लातूरला न आणल्यामुळे सामान्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे हे राज्य शासनाचे अपयश आहे. लातूर जिल्हा आज सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीत अडकला आहे. लातूर मनपाच्या कारभाऱ्यांचा कहर सूरू आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा उचलला जात नसल्यामुळे शहर, जिल्ह्यात डेंग्यूची साथ आहे. आजघडीला शहरात ७०० ते ८०० डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्याविरोधात खटला भरणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या शपथपत्रावरील नोटरींची मुदत संपलेली आहे. असे शपथपत्र देणे ही शासनाची फसवणूक आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी अर्ज वैध ठरवून घेतला आहे. मात्र याविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार असल्याचे अमित देशमुख यावेळी म्हणाले.