विधानसभा 2019 / भाजप सरकारने सर्वाधिक फसवणूक सुशिक्षित बेरोजगारांची केली, जालन्यातील मेळाव्यात धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

'माझ्यासारखे नेते आहेत, तोपर्यंत पक्ष संपणार नाही'

Sep 20,2019 09:13:53 PM IST

जालना- केंद्रातील नरेंद्र मोदी असो की राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार. या दोन्ही भाजपा सरकारांनी मेगा नोकरभरती, महा पोर्टल, ऑनलाइन भरतीच्या नावाखाली सर्वात मोठी फसवणूक राज्यातील तरुण बेरोजगारांची केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत जालनामध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, "तरुणांना रोजगार नाही, कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. सरकारची फसवी नोकरभरती ही मुळात तरुणांसाठी नव्हतीच. ती तर त्यांच्या पक्ष भरण्याची जाहिरात होती, हे आता सिद्ध झाले आहे. खोट्या आश्वासनांची गाजरं देत मोदींनी तरूणांना येडं करून सोडलं होतं. आतातरी शहाणे व्हा. डोळे उघडा. सोडा त्या मोदींचा नाद. हे सरकार बरखास्त केल्याशिवाय आता आपल्याला शांत राहायचं नाही असा निर्धार करा.

भगवान की लाठी जब चलती है तब... साहेबांचही तसंच आहे... मारत नाही पण मार बसला की तो पुन्हा उठत नाही. म्हणूनच पवार साहेबांचा नाद कधी करायचा नाही. राष्ट्रवादीला संपवणे काही सोपे नाही," असे मुंडे म्हणाले.

'माझ्यासारखे नेते आहेत, तोपर्यंत पक्ष संपणार नाही'

धनंजय मुंडेंनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांसह भाजपवरही सडकून टीका केली. शिवाय "माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी कधीही संपणार नाही", असे ते म्हणाले. विशेष म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी टीका केली. "छत्रपती घराण्यात फूट पाडणाऱ्या अण्णाजी पंतांना उदयनराजे शरण गेले", असे ते म्हणाले.

'प्रकाश आंबेडकरांना पवारांनी निवडून आणलं'
"सध्या कुणीही उठतंय आणि साहेबांवर टीका करतंय. प्रकाश आंबेडकर सुद्धा साहेबांवर टीका करतात. पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात खुल्या जागेवरून निवडून आणलं, रामदास आठवले हे सुद्धा साहेबांवर टीका करतात. त्यांना सुद्धा खुल्या मतदारसंघातून निवडून आणलं. बाबासाहेबांचं समतेचं खरं तत्व पवार साहेबांनी प्रत्यक्षात आणलं," असेही मुंडें म्हणाले.

'तर...राज्यातील जनतेसमोर फाशी घेईन'
"मुख्यमंत्री म्हणतात, आमच्यावर पाच वर्षात कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. मुख्यमंत्री साहेब, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. मी तुमच्या 22 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर सांगा, या राज्यातील 12 कोटी जनतेसमोर फाशी घेईन", असे आव्हानही मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पोलिसांना दिली समज

मागील काही दिवसात पोलिसांवरील तणाव खूप वाढला आहे. आमच्या सभेत पोलिस तरुणांना डी सर्कलमध्ये येण्यासाठी अडवत होते. पोलिसांना माझी विनंती आहे की आमच्या या सभेतील जनता साहेबांच्या प्रेमापोटी आलेली आहे. महाजनादेश यात्रेची गोष्ट वेगळी आहे तिथे मुख्यमंत्री रोषाचे धनी आहेत, अशा शब्दात पोलिसांना समज दिली आणि सरकारला चिमटा लगावला.

X