आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे व दुसऱ्या दिवशीपर्यंत याबाबत पक्षाकडून काहीही निराेप नसल्यामुळे एकनाथ खडसे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. “तुम्ही अपक्ष लढाच’, असा आग्रह समर्थकांनी सुरू केला आहे. स्वत: खडसे हे मुलगी अॅड. राेहिणी खडसे व पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवरच हाेते. घराबाहेर दिवसभर समर्थक आणि कार्यकर्त्यांचा ठिय्या हाेता. 

दिवसभर समर्थक, विविध पक्षांचे पदाधिकारी त्यांना भेटून गेले. कार्यकर्त्यांनी मुंबई-नागपूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मंदाकिनी खडसे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. खडसेंच्या स्नुषा सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या हाेत्या. दरम्यान, नाराज एकनाथ खडसेंना जाळ्यात ओढण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 
 

सायंकाळपर्यंत वाट पाहा, असा दिला होता सल्ला
उमेदवारी न मिळाल्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत खडसे यांनी २ आॅक्टाेबर राेजी सायंकाळपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला हाेता. दुसरी यादी येणार असल्याने खडसे सकाळपासून मुक्ताईनगरमध्येच हाेते. खा. रक्षा खडसे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला गेल्या हाेत्या. मात्र, दुसऱ्या यादीतही खडसे यांचे नाव आले नाही. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात याबाबत पत्रकारांशी बोलताना गोल-गोल उत्तर दिले. 
 

बुधवारी सायंकाळपर्यंत वाट पाहिली; पक्षाचा निरोप नाही, दुसऱ्या यादीतही नाव नाही
फार्महाऊसवर मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर येथील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, भुसावळचे राष्ट्रवादीचे सतीश घुले आदींनी खडसे यांची भेट घेतली. माजी आमदार शिरीष चाैधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसाेबत आमदार खडसे यांनी बंद खोलीत दहा मिनिटे चर्चा केली. खडसेंची भिस्त त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यावर हाेती. मंत्रिपद गेले तेव्हा रक्षा खडसे यांनी खडसेंसाठी दिल्लीत शिष्टाई केली हाेती, या वेळीदेखील खडसेंसाठी त्याच महत्त्वाच्या दूत बनल्या आहेत. मात्र, गेल्या दाेन दिवसांपासून त्या माध्यमांपासून लांब राहिल्या आहेत. 
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसेंच्या संपर्कात
जळगाव - भाजपने दुसऱ्या यादीतही खडसेंची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज खडसेंना जाळ्यात आेढण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीने बुधवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात मुक्ताईनगरमधून उमेदवार दिला नाही. अॅड. रवींद्र पाटील हे येथील संभाव्य उमेदवार हाेते. त्यांनाही तूर्त अर्ज दाखल करू नये, अशी सूचना दिल्याचे समजते.
 

औरंगाबाद पश्चिममधून काँग्रेसचे रमेश गायकवाड, सिल्लोडमधून पालोदकर
काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पश्चिममधून रमेश गायकवाड, सिल्लोडमधून  प्रभाकर पालोदकर तर परभणीतून रविराज अशोक देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 
 

...इकडे दादांची गाडी अडवण्याचा प्रयत्न
मुंबई - भाजपच्या पहिल्या यादीत उदगीरचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचे नाव नसल्यामुळे समर्थक संतापले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी भालेराव समर्थकांनी बुधवारी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी धडक मारली. ताेपर्यंत पाटील गाडीतून पुण्याकडे निघाले हाेते. यामुळे संतप्त समर्थकांनी पाटील यांच्या विरोधात घाेषणाबाजी करून   गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशिरा भाजपने उदगीरमधून अनिल कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली.