अश्लील चित्रफीत ते मंत्र्यांसमक्ष हाणामारीमुळे जळगावात भाजप जेरीस

त्र्यंबक कापडे

Apr 14,2019 10:14:00 AM IST

जळगाव - जळगाव तसं ‌‌उन्हाळ्यात तापणारं शहर. एप्रिल-मे महिन्यात तर पारा ४१ अंशांच्या खाली येत नाही. एवढ्या कडक उन्हात या मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण शांत असेल, लोक बाहेर निघत नसतील, असे कुणालाही वाटत असेल; पण लोकांच्या वाटण्याला इथे काहीही अर्थ नाही. जळगाव राजकीयदृष्ट्याही तितकंच तापतं. या वेळेस तर ते निवडणूक जाहीर होण्याआधीच तापलं होतं. त्याची सुरुवात अश्लील चित्रफितीने झाली. त्यानंतर थेट भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी तुडवल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. ही हाणामारी दाेन विराेधी पक्षांत नव्हे, तर भाजपतील दाेन विराेधी गटात घडली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचा प्रचार शांतपणे सुरू आहे. उमेदवार खूप आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली आहे. नेमके याउलट चित्र भाजपत दिसले.


जळगाव तसा भाजपचा गड. या मतदारसंघातूनच सन २०१४ च्या निवडणुकीत ए. टी. पाटील हे तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. मात्र यंदा त्यांना पुन्हा तिकीट मिळू नये म्हणून त्यांचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करण्यात आले. त्यांच्याशी संबंधित एक अश्लील चित्रफीत व्हायरल करण्यात आली. हे जेव्हा घडले तेव्हा लोकसभा निवडणुकीची फक्त हवा होती. पण पाटील यांना त्यांच्या विरोधकांनी नियोजनबद्ध उघडं पाडलं. खरं तर कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी हा धडाच म्हटला पाहिजे. पाटलांचे तिकीट कापले जाऊन विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना ते जाहीर झाले. इच्छुकांची संख्या अधिक असताना आमदार वाघ यांना तिकीट मिळाले कसे? याबद्दल जिल्ह्यातील भाजप नेते, मंत्री, आमदार हेही अवाक‌ झाले होते. नेत्यांना विश्वासात न घेता वाघ यांना उमेदवारी मिळाल्याने जळगावात तिसरी शक्ती निर्माण होण्याचा साक्षात्कार अनेकांना झाला. त्यामुळे सुप्त शक्ती कार्यरत होऊन त्यांनी रातोरात वाघ यांचे जाहीर झालेले तिकीट रद्द करून आणले आणि नवीन उमेदवार म्हणून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचे नाव जाहीर झाले. तिकीट कापण्यापासून ते जाहीर झालेले तिकीट रद्द करून आणण्यापर्यंतचे शह-काटशहाचे राजकारण भाजपत सुरू असताना राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा प्रचार मात्र सुप्तपणे सुरू आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? हेच त्यांना कळत नसल्यामुळे सरकारवर टीका हाच त्यांचा प्रचाराचा अजेंडा होता. भाजपने दुसरा उमेदवार जाहीर केला आणि त्यांच्या अमळनेरच्या प्रचारसभेत मंत्री महाजनांसमोर जिल्हाध्यक्षांच्या समर्थकांनी माजी आमदारालाच बदडले. भाजपमध्ये सुरू असलेल्या धुसफूसमुळे या मतदारसंघात उमेदवार प्रचारात मागे पडताना दिसत आहे.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजप उमेदवारासोबत असले तरी शिवसैनिकांनी अद्याप प्रचारात पूर्णपणे ताकद लावलेली नाही. भाजपअंतर्गत सुरू असलेल्या दुफळीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे सर्वांनाच भेटून आपल्याला मदत करण्याचे आवाहन करीत आहेत. देशात आणि राज्यात निवडणूक विकास, विनाश आणि भ्रष्टाचारावर गाजत असली तरी जळगावात मात्र मुद्दे बाजूला पडून गुद्द्यांची भाषा सुरू आहे. यामुळे निवडणुकीची पातळी घसरली की काय? असे आता मतदारांनाच वाटू लागले आहे.

भाजपचे नवे उमेदवार उन्मेष पाटील हे उच्चशिक्षित आहेत. मतदारसंघाचा विकास आणि मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन करत ते प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत अाहेत. मात्र पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे त्यांचे मुद्दे बाजूला पडून चित्रफीत, हाणामारी, तिकीट मिळवण्याच्या खेळाचीच मतदारांत चर्चा अाहे. देवकर व उन्मेष पाटील प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. विधानसभानिहाय ताकद पाहिली तर राष्ट्रवादीचा एकमेव तर भाजप-सेनेचे पाच अामदार असा सामना अाहे. पण या वेळेस कोणतीही लाट नाही. त्यामुळे याेग्य लोकप्रतिनिधी निवडताना मतदारांचीच कसोटी लागणार आहे.

जळगाव मतदारसंघातील रस्ते, पाण्याचे प्रश्न अद्यापही रखडलेलेच
जळगाव हा मतदारसंघ जळगाव शहर, ग्रामीण, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव, पारोळा-एरंडोल आणि अमळनेर-धरणगाव असा विखुरलेला आहे. शहर सोडले तर संपूर्ण मतदारसंघ हा ग्रामीणबहुल आहे. जळगाव शहरातून जाणारा सुरत-नागपूर हा महामार्ग मृत्यूचा मार्ग झाला आहे. गेल्या काही वर्षांत शेकडो बळी त्याने घेतले. त्याविराेधात नागरिकांनी आंदोलन केले. पण आश्वासनांपलीकडे काहीच झाले नाही. त्यामुळे जळगावकरांची सरकारवर नाराजी आहे. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे आणि जळगाव तालुक्यातील शेळगाव हे प्रकल्प अनेक वर्षांत पूर्ण होऊ शकले नाहीत, ते पूर्ण झाले असते तर हजारो एकर शेती सिंचनाखाली येऊन शेकडो शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली असती. पण शेती सिंचन तर सोडाच, अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार देवकरही सरकारवर टीका करताना या मुद्द्यांना हात घालत आहेत.

X
COMMENT