Crime / भाजप नेत्याच्या बसने कपलला दिली धडक; पोलिसांनी बस अडवणे सोडून पीडित दांपत्यालाच झोडपले

एका अधिकाऱ्यासह हेड काँस्टेबलचे निलंबन, दोन पोलिस कर्मचारी फरार

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 11:12:00 AM IST

इंदूर - मध्य प्रदेशात भाजप नेत्याकडून ऑटो ड्रायव्हरला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच ठिकाणचा आखी एक भाजप नेता चर्चेत आला आहे. यावेळी स्थानिक नेत्याच्या बसने बाइकवर जाणाऱ्या एका दांपत्याला धडक दिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. परंतु, पोलिस कर्मचाऱ्यांनी जखमी दांपत्याची विचारपूस करणे सोडून बसला वाट मोकळी करून दिली. यावर जखमी व्यक्तीने पोलिसांना जाब विचारला. त्यावरच पोलिस इतके भडकले की भर रस्त्यावर पीडित दांपत्यालाच मारहाण सुरू केली. कारण एवढेच की त्या बसवर भाजप नेत्याचे नाव लिहिले होते.


नेमके काय घडले...
इंदूरच्या एका कंपनीत अभियंते असलेले सुदीप बंसल आपल्या पत्नी शोभासह सोमवारी संध्याकाळी बाइकवरून घरी येत होते. त्याच दरम्यान पोलो ग्राउंड परिसरात एका बसने दांपत्याच्या बाइकला धडक दिली. ते दोघेही बाइकसह रस्त्यावर पडले. कसे-बसे स्वतःला सावरून जागेवरून उठले आणि बाइक उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात काही पोलिस कर्मचारी पोलिस निरीक्षक सुरेश यादवच्या नेतृत्वात घटनास्थळी पोहोचले. मदत करणार तेवढ्यात एका हवालदाराची नजर धडक देणाऱ्या बसच्या टॅगलाइनवर गेली. त्यावर भाजप नेत्याचे नाव लिहिले होते. त्याने आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले आणि सर्वांनी मिळून बसला वाट मोकळी करून दिली. जखमी झालेला सुदीप हे सर्व आश्चर्याने पाहत होता. त्याला वेळीच संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्याने पोलिसांना जाब विचारला आणि बसचा क्रमांक लिहण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिस हेड काँस्टेबल सुरेश भदौरिया सुदीपवर तुटून पडला. पोलिस असून सामान्य जनतेची जबाबदारी सोडून नेत्यांची नोकरी करता का? असे सुदीपने विचारले. त्यावर पोलिस आणखी भडकले आणि सर्वांनी मिळून सुदीपला मारहाण सुरू केली. पत्नीने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिला हवालदारांनी तिला देखील मारहाण केली.


सजग नागरिकांनी पोलिसांना पळवून लावले
सुदीपने सांगितल्याप्रमाणे, पोलिसांनी मारहाण सुरू केल्यानंतर आम्ही रस्तायवर आरडा-ओरड सुरू केली. आमची अवस्था पाहून काही सजग नागरिक आप-आपली वाहने सोडून आमच्या बचावासाठी आले. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला. लोकांचा संताप आता आपल्यावर उमटणार हे पोलिसांच्या लक्षात आले आणि सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. यानंतर दोघांना उपचार देऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एएसआय सुरेश यादव, हेड काँस्टेबल भदौरियाचे तडकाफडकी निलंबन केले. तर उर्वरीत आरोपी पोलिस अजुनही फरार आहेत. या घटनेचा तपास करून सर्वांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

X
COMMENT