आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांप्रमाणे माघार घेऊन राज्यसभेतच थांबलो नाही, चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत उडवली खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- जनतेमधून निवडून न येणाऱ्यांच्या सल्ल्यावर राज्याचा कारभार चालवला जातोय, या शरद  पवारांच्या वक्तव्याचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत खिल्ली उडवली. "मला 5 जिल्हे, 58 विधानसभा मतदारसंघ तसेच 10 लोकसभा मतदारसंघातील 6 लाख मतदारांनी विधान परिषदेवर पाठवले आहे. उगीच शरद पवारांप्रमाणे माढ्यातून माघार घेऊन राज्यसभेतच थांबलो नाही', अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली.

 

बारामतीत भाजप प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते. यंदा आम्हाला बारामतीची बाजी मारायचीच आहे. मागच्या वेळी आमचा फक्त 76 हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी जानकर कमळ चिन्हावर लढले नाहीत. भाजपने देशभरात कमाल केली आहे. त्यात आता कमळ चिन्हावर बारामती जिंकता येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन बारामतीतून भाजपच्या उमेदवार आहेत.

 

धनगड व धनगर यातील साम्य सांगणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यातून धनगर आरक्षण देण्याच्या प्रक्रियेस गती येईल. सध्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण नसले तरी अनुसुचित जमातीच्या सोयी सवलती लागू केल्या आहेत. आघाडी सरकारने धनगर आरक्षणासाठी पाठवलेला अहवाल त्रुटी आढळल्याने फेटाळला गेला. म्हणून टीसच्या मदतीने योग्य अहवाल पाठवत आहोत, असेही ते म्हणाले.

 

माढ्यात संजय शिंदेंनी गद्दारी केली...
भाजपच्या 19 जिल्हा परिषद सदस्याच्या पाठिंब्यावर संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन भाजपच्या उमेदवारीवर माढा लोकसभा लढवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी गद्दारी करत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

 

महायुतीच्या नेत्यांच्या बारामतीला भेटी वाढल्या
राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघाबरोबर 46 वी बारामती लोकसभा जिंकण्याचा निर्धार फडवणीस यांनी केला आहे. त्यामुळे सरकार व पक्ष कार्यकारणीतील नेतेमंडळीच्या बारामतीला भेटीगाठी वाढल्या आहेत. मंगळवारी पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे, निलम गोऱ्हे यांनी बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेतला. तर बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी बारामती येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले.

बातम्या आणखी आहेत...