टी-शर्ट काढायला लावून पोटासह छातीवर चाकूचे ६ वार करून खून; आरोपी भाजपचा पदाधिकारी

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:18:00 AM IST

जालना - काही दिवसांपूर्वी मित्राकडे ठेवलेले १ लाख २० हजार रुपये ताे परत करत नसल्याच्या रागातून त्या मित्राला एका मंदिरात नेले. तेथे तुझे टी-शर्ट चांगले आहे, ते मला दे असे म्हणून त्याला टी शर्ट काढायला लावले. त्याने टी शर्ट काढताच त्याच्या छाती, डोके, पोटावर चाकूने सहा वार करून खून केला. ही थरारक घटना बुधवारी मध्यरात्री किल्ला भागातील नदीला लागून असलेल्या श्री कालुंकादेवी मंदिराजवळ घडली. कुमार शरदचंद्र झुंजार (२२, मस्तगड, जालना) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासांतच खून करणाऱ्या विजय तुळशीराम मुंगसे यास ताब्यात घेतले आहे.


खून झालेला परिसर निर्जन स्थळ अाहे. या भागाकडे नागरिकांची जास्त वर्दळही नसते. दरम्यान गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक जण या मंदिराकडे गेला असता त्याला पोटात चाकू खुपसलेला मृतदेह दिसून आला. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीमचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झुंजारच्या मोबाइलवर आलेल्या काॅलवरून विजय मुंगसे यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता ठेवण्यासाठी दिलेले पैसे परत दिले जात नसल्याच्या कारणावरून हा खून केल्याची कबुली दिली.

छातीत, डोक्यावर सहा घाव
मस्तगड येथून अारोपी विजय मुंगसे याने कुमार झुंजार यास श्री कालुंकादेवी मंदिर परिसरात नेले. यानंतर त्याला तुझे टी शर्ट चांगले अाहे, असे म्हणत त्याला टी शर्ट काढण्यास सांगितले. त्याने टी शर्ट काढताच छातीवर, पोटावर, डोक्यावर असे सहा वार केले. या घावामुळे तो खाली काेसळताच आरोपीने पलायन केले.

आरोपी भाजपचा पदाधिकारी
चाकूने भोसकून केलेल्या या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची माहिती मिळताच सकाळपासूनच या परिसरात माेठ्या प्रमाणात वर्दळ झाली होती. आरोपी विजय मुंगसे हा भाजप ओबीसी मोर्चाचा जालना शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत होता.

पथकाचे परिश्रम
खुनाची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली. दोन तासांतच आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पैशाच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली, अशाी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.

X