आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरींनी घेतली अहमद पटेलांची भेट, तर संजय राउत शरद पवारांच्या भेटीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेनेसाठी आत्मघाती ठरेल -आठवले
  • राज्यातील एकूणच अस्थिर राजकीय परिस्थितीवर पवारांनी चिंतीत -संजय राउत

मुंबई / नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना बुधवारी वेग आला. यात भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते संजय राउत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. अशात भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट का घेतली असावी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु, यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही राजकारणावर चर्चा झालेली नाही असे बैठकीनंतर अहमद पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

राज्यातील सद्यस्थितीवर पवारांना चिंता -राउत

शिवसेना खासदार संजय राउत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यात दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. "मी पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातील एकूणच अस्थिर राजकीय परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली." असे चर्चेनंतर राउत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत संजय राउत यांनी पुन्हा सीएम पदावर शिवसेना ठाम असल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पद वाटून घेणार असे ठरले होते असेही राउत म्हणाले.

युती तोडल्याचा निर्णय घेतल्यास शिवसेनेसाठी आत्मघातकी ठरेल -आठवले


महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली. परंतु, मुख्यमंत्री पदाच्या अटीवरून शिवसेनेेने भाजपसोबतची युती तोडल्यास तो निर्णय शिवसेनेसाठी आत्मघातकी ठरेल असे रिपाइंचे रामदास आठवले म्हणाले आहेत. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असताना शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरू नये. त्याऐवजी त्यांनी उप-मुख्यमंत्री पद घेऊन सत्ता स्थापित करावी असे आवाहन सुद्धा आठवलेंनी केले आहे.

स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेला विलंब


महाराष्ट्र विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागले आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले. परंतु, सरकार 50-50 आणि मुख्यमंत्री पदाबाबत अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. तर भाजपने मुख्यमंत्री पद सोडण्याबाबत स्पष्ट नकार दिला. दोन्ही पक्षांच्या वादामुळे सरकार स्थापनेला विलंब होत आहे. त्यातच शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचा पर्याय सुद्धा अजमावून पाहण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे, भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असा इशारा आधीच दिला आहे. याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटी-गाठी होत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...